उत्तराखंड : वाढणारं पाणी, बोगद्यातला अंधार आणि ते जीवघेणे 7 तास

    • Author, ध्रुव मिश्रा
    • Role, बीबीसी हिंदीसाठी जोशीमठ, उत्तराखंडहून

उत्तराखंडमध्ये झालेल्या हिमस्खलनात बारा लोकांची टीम तपोवनाच्या वरच्या भागातील भुयारात अडकली होती.

त्या सर्वांना सुखरूप बाहेर काढण्यात आयटीबीपीला यश मिळालं. या बारा जणांपैकी तिघा जणांशी बीबीसीनं संवाद साधला. त्यांनी या सुटकेच्या अनुभवाबद्दल आम्हाला सांगितलं.

बसंत बहादूर

बसंत बहादूर तपोवन जलविद्युत प्रकल्पात मजूर म्हणून काम करतात. ते इथं आउट फॉलमध्ये काम करायचे. ते मूळचे नेपाळचे. हिमस्खलनामुळे जेव्हा पूर आला, तेव्हा ते इथल्या बोगद्यात जवळपास 300 मीटर खोल अडकले होते. तब्बल सात तास ते इथं अडकून पडले होते. आतमधलं वातावरण किती भयानक होतं, हे त्यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं.

"आम्ही बोगद्यात काम करत असतानाच अडकलो होतो. बांधकाम स्थळी पोहोचण्यासाठी ज्या सळ्या लावल्या होत्या, त्याच्या आधारे आम्ही हळूहळू बाहेर आलो. बाहेरून लोकांचे आवाज येत होते. ते आम्हाला बाहेर येण्यासाठी प्रोत्साहन देत होते."

पण बाहेर आल्यावर आम्ही अधिकच मोठ्या संकटात सापडणार नाही ना अशी भीती आम्हाला वाटत होती. कारण नेमकं बाहेर काय झालंय हे आम्हाला माहितीच नव्हतं, असं बसंत सांगत होते.

सिलेंडर फुटल्यामुळे स्फोट झालाय, अशीच इथल्या मजुरांना शंका होती. त्यामुळेच बाहेर येण्याच्या प्रयत्नात करंट वगैरे लागला तर ही धास्ती होती.

दुर्घटनेनंतर बसंत बहादूर आणि त्यांच्या साथीदारांना नेमकं काय जाणवलं हे सांगताना बसंत यांनी म्हटलं, "आम्ही जिथे काम करत होतो, तिथून मागे पाहिलं तर भयंकर धूर दिसत होता आणि आमच्या कानांना प्रचंड दडे बसले. काहीतरी गडबड झालीये, हे आम्हाला जाणवलं. त्यानंतर पाण्याचा प्रचंड लोंढा आमच्या दिशेनं आला. आम्ही खूप घाबरलो. सगळ्यांनी जवळच उभ्या असलेल्या जेसीबीवर चढलो आणि त्यावरच बसून राहिलो."

भुयाराचं काम सकाळी 8 वाजता सुरू होतं आणि दुपारी 12.30 वाजता जेवणासाठीच बाहेर येतो, असं बसंत सांगत होते.

त्यानंतर त्यादिवशी सगळे मजूर नऊ तासांनी बाहेर आले. जवळपास 10.30 वाजता पूर आल्यापासून संध्याकाळी 5.30 वाजेपर्यंत बसंत आणि त्यांचे सहकारी तिथेच अडकून पडले होते. त्यांच्याजवळ जी काही रोख रक्कम आणि बाकी सामान होतं, ते खराब झाल्याचं बसंत सांगत होते.

त्यांनी म्हटलं, "त्या भुयारात सात तास घालवणं हे अतिशय कठीण काम होतं. पण आम्हीही हार मानली नाही आणि एकमेकांना प्रोत्साहन देत राहिलो."

बसंत आणि त्यांच्या साथीदारांना आयटीबीपीच्या जवानांनी बाहेर काढलं. पण हे जवान त्यांच्यापर्यंत पोहोचले तरी कसे?

वसंतने सांगितलं, "या कठीण प्रसंगी मोबाईलची मदत झाली. मी माझ्या मोबाईल फोनवरून एनटीपीसीच्या अधिकाऱ्यांना सातत्यानं फोन करत होतो. या अधिकाऱ्यांनीच आयटीबीपीच्या जवानांना आमच्याबद्दल सांगितलं. त्यानंतर आम्हाला सुखरूप बाहेर काढण्यात आलं."

श्रीनिवास रेड्डी

श्रीनिवास रेड्डी एक जिओलॉजिस्ट आहेत. ते एनटीपीसीमध्ये काम करतात.

बीबीसी हिंदीशी बोलताना रेड्डी यांनी या घटनेबद्दल सांगितलं, "ज्यावेळी ही दुर्घटना घडली त्यावेळी आम्ही बोगद्यातच होतो. आम्ही 350 मीटर खोल आतमध्ये काम करत होतो. 'बाहेर चला, नदीला पूर आलाय' असं ओरडत बाहेरून एक माणूस आला."

रेड्डी आणि त्यांचे सहकाऱ्यांना वस्तुस्थिती लक्षात येईपर्यंत गोष्टी हाताबाहेर जाऊ लागल्या होत्या.

रेड्डी यांनी सांगितलं, "पाणी एकदम बोगद्यात घुसले. त्यानंतर आम्ही लोखंडाच्या सळ्यांच्या आधारे थोडं वर सरकलो. या सळ्यांची मदत घेत आम्ही हळूहळू वर सरकत होतो. नंतर आम्ही वाट पाहत राहिलो. मग थोड्या वेळानं पाणी थांबलं."

पण बोगद्यात प्रचंड अंधार असल्यामुळे आमचे प्रयत्न हळूहळू सुरू होते. कारण पुरामुळे विद्युत पुरवठा बंद करण्यात आला होता.

काही लोकांना आतमध्ये श्वास घ्यायला त्रास होत होता. पण अचानक बोगद्याच्या वरच्या भागातून माती पडायला लागली आणि आतमध्ये प्रकाश येऊ लागला. त्यानंतर लोकांना आजूबाजूचं दिसायला लागलं आणि लोकांना श्वास घेता यायला लागला.

रेड्डी सांगतात की, पण अडचणी होत्याच. आम्ही गार पाण्यात होतो. आमचे पाय थंड पडत होते. लोकांच्या बुटात पाणी आणि चिखल गेला होता. त्यामुळे पाय जड झाले होते, सुजायला लागले होते."

अशा अडचणींमध्ये अडकलेल्या लोकांचं मनोधैर्य वाढविण्यासाठी रेड्डी गाणी गायला लागले.

ते सांगतात, "मी गात होतो, कविता ऐकवत होतो. मधूनच थोडे हात-पाय हलवायला लावत होतो. सर्वांच मन गुंतून राहावं हीच माझी इच्छा होती. हालचालींमुळे बाहेर निघायला मदत होईल, असंही मला वाटत होतं."

दरम्यान आम्ही बाहेर संपर्क करण्याचाही सातत्यानं प्रयत्न करत होतो. पण भुयारात नेटवर्क मिळत नव्हतं, असं रेड्डी सांगत होते.

शेवटी एकदा नेटवर्क मिळालं आणि आयटीबीपीच्या जवानांनी त्यांना सुखरुप बाहेर काढलं.

वीरेंद्र कुमार गौतम

जे लोक बोगद्यात अडकले होते, त्यांच्यापैकी वीरेंद्र कुमार गौतम हे सर्वांत शेवटी बाहेर पडले.

बाहेर पडल्यावर वीरेंद्र कुमार गौतम यांनी आपला आनंद ज्यापद्धतीनं व्यक्त केला, त्याचा व्हीडिओही खूप व्हायरल झाला होता.

वीरेंद्र गौतम सांगतात, "पाणी आत घुसल्याबरोबर वीजपुरवठा बंद करण्यात आला आणि सगळीकडे अंधार झाला. बाहेर आवाज येत होते. गुडूप अंधारात तो बोगदा अतिशय भयानक वाटत होता.

ढगफुटी झाली असून त्याचं पाणी बोगद्यात शिरलं आहे, असं गौतम यांना वाटलं होतं. जवळपास पंधरा मिनिटं पाण्याची पातळी वाढतच होती. त्यानंतर कुठे पाणी वाढणं थांबलं.

गौतम सांगतात, "पाण्याची पातळी वाढायची थांबल्यावर संकट टळल्याचं आम्हाला जाणवलं. मी माझ्या साथीदारांचंही मनोधैर्य वाढवलं आणि आपण इथून बाहेर पडू शकतो, हा विश्वास त्यांच्या मनात निर्माण केला."

त्यानंतर गौतम आणि त्यांचे साथीदार बोगद्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करू लागले. खूप धडपडीनंतर त्यांच्या फोनला नेटवर्क मिळालं.

गौतम यांनी बीबीसीला सांगितलं, "मी माझ्या सहकाऱ्यांना आमच्या प्रकल्प संचालकांचा नंबर दिला. त्यानंतर त्यांनी आयटीबीपीला फोन केला आणि त्यांचे जवान आमच्या मदतीसाठी इथपर्यंत आले."

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)