You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
BBC ISWOTY: 'बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवूमन ऑफ द इयर' का महत्त्वपूर्ण आहे हा पुरस्कार?
- Author, वंदना
- Role, टीव्ही एडिटर, भारतीय भाषा
26 वर्षीय भवानी देवी हिने फेन्सिंग (तलवारबाजीचा एक प्रकार) खेळप्रकारात आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक पटकावण्याची किमया केली. अशी कामगिरी करणारी ती पहिलीच भारतीय खेळाडू ठरली आहे.
सध्या भवानी देवी टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जोरदार तयारी करत आहे.
या स्पर्धेत आपली जागा निश्चित करण्यासाठी तिने कठोर मेहनत करण्याचा निर्णय घेतला आहे.
फेन्सिंग हा खेळ भारतात जास्त खेळला जात नाही. त्यामुळे भारतात या खेळात कारकीर्द घडवणं ही खरं तर आव्हानात्मक गोष्ट होती.
कोरोना संकटाच्या काळात तर सगळी सराव शिबिरं रद्द झाल्यामुळे या अडचणीत तर जास्तच भर पडली.
अशा स्थितीत आपला सराव वेगळ्या पद्धतीने करायचं असं भवानी देवीने ठरवलं. तिने सरावासाठी वापरलेल्या युक्तीचा व्हीडिओ देशभरात सर्वत्र व्हायरल झाला होता.
तिने विटा आणि कीट बॅगच्या मदतीने घरच्या गच्चीवरच एक डमी बनवलं. त्याच्या मदतीने तिने आपला सराव आणि व्यायाम सुरू ठेवला.
"जिम सुरू झाल्यानंतर मी माझा वेळ माझी सहकारी दिव्या काक्रान हिच्यासोबत मिळून सराव करायचे. जॉर्जियातील माझे प्रशिक्षक मला व्हीडिओ कॉलवर खेळाचं प्रशिक्षण देऊ लागले," असं भवानीदेवी सांगते.
अशा पद्धतीने कोरोना संकटाच्या काळातही शांत न बसता भवानी देवीने आपला सराव सुरूच ठेवला. तिने आपल्या खेळाप्रती प्रामाणिक राहत त्यामध्ये स्वतःला पूर्णपणे झोकून दिलं आहे.
सध्या तिची नजर फक्त आणि फक्त टोकियो ऑलिंपिकवरच आहे.
भवानीदेवी यांच्यासारख्या अनेक खेळाडू देशाचं नाव उज्ज्वल करण्यासाठी झटत आहेत. त्यांची कहाणी सर्वांसमोर आणण्यासाठी बीबीसीने इंडियन स्पोर्ट्सवूमन ऑफ द इयर हा उपक्रम राबवला आहे.
यावर्षी बीबीसीच्या इंडियन स्पोर्ट्सवूमन ऑफ द इयर पुरस्कारांचं दुसरं वर्ष आहे. याची घोषणा आज 8 फेब्रुवारी रोजी करण्यात येत आहे.
भारतात विविध खेळांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या महिला खेळाडू तसंच पॅरा-अॅथलीट्सना प्रकाशझोतात आणणं, त्यांचा गौरव करणं हा या पुरस्कारांचा प्रमुख उद्देश आहे.
भारतीय महिला खेळाडूंचा उदय
2016 मध्ये रिओ येथे झालेल्या ऑलिंपिक स्पर्धेत भारताला दोन पदकं मिळाली. ही दोन्ही पदकं भारताच्या महिला खेळाडूंनीच पटकावली होती. यंदाच्या वर्षी बऱ्याच महिला खेळाडू टोकियो ऑलिंपिक स्पर्धेसाठी पात्र ठरल्या आहेत.
कोरोना संकटामुळे एक वर्ष पुढे ढकलण्यात आलेली ही स्पर्धा भारतासाठी खास असणार आहे. बरोबर 20 वर्षांपूर्वी पहिल्यांदा भारतीय महिला खेळाडूने ऑलिंपिक पदक पटकावलं होतं.
2000 साली सिडनीमध्ये झालेल्या ऑलिंपिक स्पर्धेत वेटलिफ्टर कर्नम मल्लेश्वरी हिने हा इतिहास घडवला होता. कर्नम हिला त्या स्पर्धेत कांस्यपदक मिळालं होतं. 19 सप्टेंबर 2000 चा तो दिवस होता. ती तारीख आजही मला लक्षात आहे.
त्यानंतर सायना नेहवाल, साक्षी मलिक, मेरी कोम, मानसी जोशी आणि पी. व्ही. सिंधू या महिला खेळाडूंनी ऑलिंपिक पदकाला गवसणी घातली. या खेळाडूंनी ऑलिंपिक पदकांसोबतच जागतिक चॅम्पियनशीप स्पर्धांमध्येही पदकांची कमाई केलेली आहे.
गेल्या वर्षी अनेक क्रीडा स्पर्धा होऊ शकल्या नाहीत. यंदाच्या वर्षीचं स्पर्धांचं वेळापत्रकही मर्यादित स्वरुपातच ठेवण्यात आलं आहे. अशा स्थितीतसुद्धा आशियाई स्पर्धा, जागतिक कुस्ती स्पर्धा, चेस ऑलिंपियाड तसंच ऑलिंपिक पात्रता फेरीत महिला हॉकी स्पर्धेत भारतीय महिला खेळाडूंनी उल्लेखनीय यश मिळवलं आहे.
अशा प्रकारे कठिण प्रसंगातही घवघवीत यश प्राप्त करणाऱ्या महिला खेळाडूंचा गौरव बीबीसी स्पोर्ट्सवूमन ऑफ द इयर पुरस्कारांमध्ये करण्यात येईल. या निमित्ताने त्यांचा संघर्ष आणि त्यांची लढाई जगासमोर आणण्याची संधीही आम्हाला मिळेल.
लैंगिक समानतेच्या दिशेने
गेल्या वर्षी मार्च महिन्यात महिला क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेत भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये झालेला सामना तुम्ही पाहिलाच असेल.
आजपर्यंतच्या महिला क्रिकेट इतिहासात या सामन्यात सर्वाधिक प्रेक्षक संख्या नोंदवण्यात आली होती.
कोणत्याही महिला क्रीडा स्पर्धेत सर्वाधिक गर्दीचा विश्वविक्रम त्यावेळी थोडक्यात हुकला होता.
पण, एकीकडे महिला खेळाडूंना असा भरघोस प्रतिसाद मिळत असताना, त्यांच्याकडून आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदकांची कमाई होत असतानासुद्धा डिजिटल विश्वात या खेळाडूंचं अस्तित्व अत्यल्प आहे.
विकिपीडियामध्येही, या महिला खेळाडूंची माहिती अत्यंत कमी स्वरुपात आहे. पुरुष खेळाडूंच्या तुलनेत हे प्रमाण तर जवळपास शून्यच म्हणावं लागेल.
बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवूमन ऑफ द इयर अंतर्गत बीबीसीने एक उपक्रमसुद्धा हाती घेतला आहे. याला 'स्पोर्ट्स हॅकेथॉन' असं नाव देण्यात आलं असून यामध्ये विकिपीडियावर या खेळाडूंची माहिती भरण्यात येईल.
भारतातील विविध ठिकाणचे विद्यार्थी या खेळाडूंची माहिती विकिपीडियावर भरतील. त्या निमित्त त्यांचीही ऑनलाईन ओळख होण्यास मदत होईल. लैंगिक समानतेच्या दिशेने ही वाटचाल असेल.
बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवूमन ऑफ द इयर पुरस्कार हा बीबीसीच्या महिलांकडे लक्ष वेधण्याच्या उपक्रमाचा एक भाग आहे. विशेषतः टोकियो ऑलिंपिक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर महिला खेळाडूंवर प्रकाशझोत टाकणं हे महत्त्वाचं ठरणार आहे.
विजेता कसा निवडणार?
बीबीसी ज्येष्ठ क्रीडा पत्रकार, क्रीडा तज्ज्ञ, लेखक यांची एक ज्युरींची समिती बनवली होती. या ज्युरींनी सर्वोत्कृष्ठ पाच भारतीय महिला खेळाडूंची नावे यासाठी नामनिर्देशित केली आहेत.
या पाच खेळाडूंना ज्युरींकडून सर्वाधिक पसंती मिळाल्याने त्यांचा पुरस्कारासाठी स्पर्धेत विचार करण्यात आला.
बीबीसीने निवडलेल्या या पाच खेळाडूंपैकी आवडीच्या खेळाडूंना तुम्हीसुद्धा आपलं मत देऊ शकता.
त्यासाठी 8 फेब्रुवारी ते 24 फेब्रुवारी 2021 दरम्यान मतदान करता येऊ शकतं.
यासोबतच बीबीसीचे ज्युरी यावर्षी बीबीसी इमर्जिंग प्लेयर ऑफ द इयर (सर्वोत्कृष्ट उद्योन्मुख खेळाडू) हा पुरस्कारही देणार आहेत. शिवाय, बीबीसीच्या संपादकीय मंडळाकडून यावर्षीच्या जीवनगौरव पुरस्कारसुद्धा दिला जाणार आहे.
गेल्यावर्षी बीबीसीच्या स्पोर्ट्सवूमन ऑफ द इयर पुरस्कारांचं पहिल्यांदाच वितरण झालं होतं. हा पुरस्कार रिओ ऑलिंपिक पदकविजेती पी. व्ही. सिंधू हिला मिळाला होता. तर धावपटू पी. टी. उषा यांना जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला होता.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)