You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अण्णा हजारे यांचा शिवसेनेला इशारा- 'तुमच्या मंत्र्यांनी काय केलं सांगू का?' #5मोठ्याबातम्या
आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा...
1. अण्णा हजारेंचा शिवसेनेला इशारा- 'तुमच्या मंत्र्यांनी काय केलं सांगू का?'
"गेल्या 40 वर्षात मी 20 वेळा विविध प्रश्नांवर सर्वच पक्षांच्या विरोधात छोटी-मोठी आंदोलनं केली आहेत. माझ्या आंदोलनातून आतापर्यंत 6 मंत्री घरी गेले आहेत. त्यात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचेही मंत्री आहेत.
तुमच्या सरकारच्या काळात मंत्र्यांनी काय केलं, कसा भ्रष्टाचार केला, त्यांना तुम्ही कसं पाठिशी घातलं, हे विसरलात का? या सगळ्या गोष्टी मी सांगू का?" अशा शब्दांत अण्णा हजारे यांनी शिवसेनेला प्रत्युत्तर दिलं आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर अण्णा हजारे यांनी आपलं नियोजित उपोषण स्थगित केलं होतं. यावरून शिवेसेनेचं मुखपत्र असलेल्या 'सामना' वृत्तपत्राने अण्णा हजारेंवर टीका केली होती. या टीकेवर प्रतिक्रिया देताना अण्णा हजारे यांनी शिवसेनेला त्यांच्या मंत्र्यांच्या कामकाजाची आठवण करून दिली.
"आपण कधीही पक्ष-पार्टी पाहून आंदोलन करीत नाही. समाज व देशाच्या हितासाठी आपण वेगवेगळ्या प्रश्नांवर आंदोलन करीत आलो आहोत.
दिल्लीतील भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारविरोधात 2014 पासून अनेकवेळा मी पत्रव्यवहार केला. तेव्हापासून या सरकारविरोधात आतापर्यंत आपली सहा आंदोलने झाली आहेत," असं अण्णांनी म्हटलं.
ही बातमी महाराष्ट्र टाईम्सने दिली आहे.
2. लाल किल्ल्यावर झेंडा फडकवणारा मोदींचा माणूस - बी. जी. कोळसे-पाटील
दिल्लीत प्रजासत्ताक दिनादिवशी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान मोठा गोंधळ उडाला होता. यावेळी एका आंदोलकाने लाल किल्ल्यावर चढून धार्मिक झेंडाही फडकवला. यावरून वाद सुरू असतानाच माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांनी याबाबत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आरोप केले आहेत.
ट्रॅक्टर रॅलीदरम्यान लाल किल्ल्यावर झेंडा फडकवणारा नरेंद्र मोदी यांचाच माणूस होता, असा आरोप माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांनी केला आहे.
पुण्यात आयोजित एल्गार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी सरकारच्या धोरणांवरही टीका केली.
'मोदींनी देशासाठी खूप काही केलं असं म्हटलं जातं. पण त्यांनी काहीही केलं नसून पठाणकोटमध्ये मुंगीसुद्धा प्रवेश करू शकत नसताना दहशतवादी कसे पोहोचले,' असा सवाल त्यांनी केंद्र सरकारला विचारला आहे.
ही बातमी लोकसत्ताने दिली आहे.
3. सीरम इन्स्टिट्यूटच्या दुसऱ्या लशीबद्दल अदर पूनावालांची घोषणा
सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची कोरोना व्हायरसवरची दुसरी लस लवकरच बाजारात येणार असल्याची माहिती कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी दिली आहे.
सीरमच्या 'कोव्हिशिल्ड' या लशीला आधीच परवानगी मिळालेली असून दुसऱ्या लशीचं नाव 'कोव्होव्हॅक्स' असं आहे. अमेरिकेच्या नोव्हाव्हॅक्स कंपनीने ही लस विकसित केली आहे. या लशीच्या भारतातील चाचण्यांसाठी सीरम इन्स्टिट्यूटने परवानगी मागितलेली आहे.
नुकतेच ब्रिटनमध्ये कोव्होव्हॅक्स लशीची चाचणी करण्यात आली होती. या चाचणीत ही लस 89.3 टक्के परिणामकारक असल्याचं निरीक्षण नोंदवण्यात आलं आहे. जून 2021 पर्यंत ही दुसरी लस बाजारात दाखल होईल, असा विश्वास अदर पूनावाला यांनी व्यक्त केला आहे. ही बातमी ई-सकाळने दिली.
4. जय शाह यांची आशियाई क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी नियुक्ती
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) सचिव जय शाह यांची आशियाई क्रिकेट परिषदेच्या (ACC) अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे चिरंजीव जय शाह यांनी शनिवारी (30 जानेवारी) आपल्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला.
जय यांना नजमुल हसन पापोन यांच्या जागी नियुक्त करण्यात आलं आहे. आशियाई क्रिकेट परिषदेकडे आशिया कप टुर्नामेंटचं आयोजन करण्याची जबाबदारी दिली जाते.
कोरोना संकटामुळे 2020 च्या जूनमध्ये नियोजित असलेली आशिया कप स्पर्धा होऊ शकली नाही. पाकिस्तानला या स्पर्धेचं यजमानपद हवं होतं, मात्र आता याचं आयोजन श्रीलंका किंवा बांग्लादेशात होण्याची शक्यता आहे.
ही बातमी न्यूज 18 लोकमतने दिली आहे.
5. जे कार्यकर्ते घर नीट चालवू शकत नाहीत, ते पक्ष काय चालवणार? - नितीन गडकरी
"पक्षासाठी मी जीवन समर्पित करतो, असं सांगणारे अनेक जण माझ्याकडे येतात. पण मी त्या लोकांना आधी आपलं घर नीट चालवण्याचा सल्ला देतो. जे कार्यकर्ते घर नीट चालवू शकत नाहीत, ते पक्ष काय चालवणार?" अशा स्पष्ट शब्दांत केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं.
नागपूर महानगरपालिकेने आयोजित केलेल्या कोरोना योद्धा सन्मान कार्यक्रमात नितीन गडकरी बोलत होते.
कोणत्याही कार्यकर्त्याने आधी आपली घरची जबाबदारी सांभाळणं गरजेचे असल्याचा सल्ला नितीन गडकरी यांनी दिला. ही बातमी टीव्ही 9 मराठीने दिली आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)