You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मुंबई लोकल आजपासून सर्वांसाठी खुली, हे आहे वेळापत्रक
मुंबई लोकल सेवा आज म्हणजेत 1 फेब्रुवारीपासून सर्वसामान्यांसाठी सुरू झाली आहे.
लोकलमधून सामान्य नागरिकांना दुपारी 12 ते 4 आणि रात्री 9 नंतर प्रवास करता येणार आहे. मधल्या वेळेत अत्यावश्यक वस्तू सेवा कर्मचाऱ्यांना प्रवास करता येईल.
पण, लोकल सरसकट सगळ्यांसाठी सुरू करायला हवी, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे.
त्यांनी म्हटलं, "लोकल सरसकट सर्वांना सुरू करायला हवं. वेगवेगळ्या वेळा ठेवलं तर कुणी पाळत नाही. एकाच वेळी जास्त गर्दी होण्याची शक्यता आहे. कामकाजाच्या वेळा बदलण्याची व्यवस्था आस्थापनांमध्ये आहे का, हा पण एक मुद्दा आहे."
तर मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं, "काही प्रवासी संघटना उच्च न्यायालयात गेल्या होत्या. त्याठिकाणी आम्ही कसं नियोजन करणार आहोत, याची माहिती दिली होती. पण रेल्वे मंत्रालयाकडून प्रतिक्रिया आली नाही.
"सरसकट लोकल सुरू करावी, अशी लोकांची मागणी आहे. हळूहळू यामध्ये बदल करता येईल. लोकांनी शिस्त पाळली तर टप्प्याटप्प्याने सरसकट लोकल सुरू करता येऊ शकेल. येत्या आठवड्यात किंवा पंधरा दिवसात परिस्थिती पाहून हा निर्णय घेता येईल. वेळेबाबतचा निर्णय येत्या काही कालावधीत घेण्यात येईल."
रेल्वे प्रवास सुरू करण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या मदत व पुनर्वसन विभागाच्या वतीने मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना पत्र लिहिलं आहे.
पत्रात काय म्हटलं?
- 1 फेब्रुवारी 2021 पासून सर्वसामान्य प्रवाशांना लोकल प्रवास करण्यास परवानगी आहे. यामध्ये पहिली लोकल सुरू झाल्यापासून सकाळी 7 वाजेपर्यंत, दुपारी 12 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत आणि रात्री 9 ते शेवटच्या लोकलपर्यंत सर्वसामान्यांना लोकल प्रवास करता येईल.
- सकाळी 7 ते दुपारी 12 आणि सायंकाळी 4 ते रात्री 9 पर्यंत फक्त अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांनाच लोकल प्रवासाची परवानगी असेल.
- दुकानं/आस्थापना रात्री 11 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी आहे. तसंच रेस्टॉरंटही रात्री 1 वाजेपर्यंत सुरू ठेवता येतील. कार्यालयांमध्ये फक्त 30 टक्के कर्मचाऱ्यांनाच ठेवण्याचा नियम यापुढेही सुरू राहील.
- सर्व सरकारी कार्यालयांनी आपल्या वेळावरील वेळेनुसार सुरू ठेवाव्यात. सर्वसामान्य प्रवाशांना या वेळेत येणं जाणं सोयीस्कर होण्याच्या दृष्टीने कार्यालयांनी आपलं कामकाज करावं.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)