सोशल : मुंबई लोकल कशी सुधारावी? 'रेल्वेचे दरवाजे स्वयंचलित करा'

मराठी अभिनेता प्रफुल्ल भालेराव याचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला. धावती लोकल पकडण्याच्या नादात प्लॅटफॉर्मवरून खाली पडून त्याच्या डोक्याला दुखापत झाली आणि त्यातच त्याचा जीव गेला.

या अपघातामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मुंबई लोकल अपघातात जीव गमावलेला प्रफुल्ल एकटा नाही. या आधीही काही घटना प्रवाश्यांच्या जीवावर बेतल्या आहेत.

या पार्श्वभूमावर बीबीसी मराठीने त्यांच्या वाचकांना प्रश्न विचारला होता की, मुंबईचा लोकल प्रवास सुरक्षित करण्यासाठी काय पावलं उचलली जायला हवीत? त्यावर वाचकांच्या अनेक प्रतिक्रिया आल्या. त्यातल्याच या काही प्रातिनिधिक प्रतिक्रिया.

रुकेश बडेकर म्हणतात, "गाड्या पुरेशा आहेत पण त्या वेळेवर येत नाहीत. त्यामुळे गर्दी वाढते. जर सिग्नल यंत्रणा सुधारली तर नक्कीच गर्दीवर नियंत्रण येईल."

"गर्दीच्या स्थानकांदरम्यान खुर्च्यांशिवाय गाड्या सोडा. आणखी करायचं म्हटलं तर लोकलला पर्याय उपलब्ध करुन द्या. गर्दीच्या ठिकाणी बस सेवा किंवा आणखी कोणतीही सार्वजनिक वाहतूक सुविधा उपलब्ध करुन द्या आणि त्यासाठी रस्ते मार्गावरील गर्दी कमी करा," असंही ते पुढे म्हणतात.

"रेल्वेचा फुटबोर्ड आणि फलाटामधील अंतर १सें.मी. इतके कमी करावे. जेणेकरून व्हीलचेअर पण जाईल आणि कुणाचा पाय अडकणार नाही," अशी सूचना विवेक एम. एन. यांनी केली आहे.

"दिल्ली मेट्रोच्या धर्तीवर फलाटावर ट्रेनचे दरवाजे येतील एवढीच मोकळीक सोडून बाकी फलाटाच्या किनाऱ्यावर रेलिंग बसवावे. फलाटावर दरवाजा येणार आहे त्या ठिकाणी रांगेत उभे राहण्यासाठी आणि चढण्यासाठी पट्ट्या आखून घ्याव्या. म्हणजे सगळे शिस्तीत चढतील आणि उतरतील," असंही विवेक लिहितात.

लोकल ट्रेन डबलडेकर करावी असं शकील सुलतान यांचं मतं आहे.

मधुकर पवार यांना वाटतं की, लोकलचे दरवाजे ऑटोमॅटिक करावेत.

"अपंगाच्या डब्यात गर्दीच्या वेळेस अनेकदा धडधाकट लोकही चढतात. मला असं वाटतं की, त्या डब्याला विशिष्ट असा रंग द्यावा. जेणेकरून इतरांना कळेल की हा अपंगांचा डबा आहे आणि ते त्यात चढणार नाहीत," अशी सूचना केली आहे महेंद्र बनसोडे यांनी.

रजनीश मेळेकर प्रवाशांच्या चुकीवरही बोट ठेवतात. प्रफुल्ल भालेरावच्या अपघाताविषयी बोलताना ते म्हणतात, की त्यात मध्य रेल्वेची काही चूक नाही.

"लोकल ट्रेनची फ्रिक्वेन्सी वाढवावी. सर्व ट्रेन 15 डब्यांच्या कराव्यात. प्रत्येक स्टेशनला दोन्ही बाजूने प्लॅटफॉर्म असावेत. आणि मुख्य म्हणजे ऑफिसच्या वेळा बदल्याव्यात," अशा प्रकारच्या अनेक सूचना केल्या आहेत सतीश पाटकर यांनी.

ऑफिसच्या वेळा बदलाव्यात अशी सूचना विद्याधर काकतकर यांनीही केली आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)