राकेश टिकैत कोण आहेत?

फोटो स्रोत, Ani
- Author, प्रशांत चाहल
- Role, बीबीसी प्रतिनिधी
गेल्या वर्षी देशात लागू करण्यात आलेले तीन कृषि कायदे मागे घेणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.
याआधी दिल्लीच्या गाझीपूर सीमेवर सुरू असलेल्या आंदोलनावेळी ते चर्चेत आले होते. मीडियाशी बोलताना त्यांच्या डोळ्यात आलेले अश्रू पाहून गाझीपूर बॉर्डरवर शेतकऱ्यांची मोठी गर्दी जमली होती.
नोव्हेंबर 2020 मध्ये या आंदोलनाची सुरुवात झाली होती. त्यावेळी टिकैत यांची भूमिका अत्यंत मर्यादित असल्याचं सांगितलं जात होतं. टिकैत हे बिकाऊ असल्याचा आरोप त्यावेळी करण्यात येत होता. तसंच त्यांच्यामुळे आंदोलनाचं नुकसान होईल, असंही काहीजण म्हणत होते.
देशाचा शेतकरी छातीवर गोळी झेलण्यास तयार आहे, पण आंदोलन मागे घेणार नाही, अशी घोषणा 52 वर्षीय राकेश टिकैत यांनी केली होती.
कृषि कायदे मागे घेतले नाही तर ते आत्महत्या करतील, पण आंदोलनस्थळ रिकामं करणार नाही, अशी भूमिका टिकैत यांनी घेतली होती.
त्यांच्या या भूमिकेमुळे लोकांना लोकप्रिय शेतकरी नेते महैंद्र टिकैत यांची आठवण आली.
महेंद्र टिकैत यांना उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागात बाबा टिकैत किंवा महात्मा टिकैत म्हणून संबोधलं जातं.

फोटो स्रोत, Getty Images
बाबा टिकैत यांचा वारसा
महेंद्र सिंह टिकैत उत्तर प्रदेशातील लोकप्रिय शेतकरी नेते होते. ते भारतीय किसान यूनियनचे अध्यक्षसुद्धा होते. सुमारे 25 वर्ष ते शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत संघर्ष करत होते.
त्यांना जवळून ओळखणारे लोक सांगतात, "1985 पर्यंत अनेकजण महेंद्र टिकैत यांना ओळखत नव्हते. पण त्यानंतर स्थानिक पातळीवर वीजदर आणि त्याच्याशी संबंधित समस्यांबाबत आंदोलनं झाली. त्यानंतर तरूण शेतकऱ्यांनी बाबा टिकैत यांना प्रशासनाविरुद्ध लढ्याचं नेतृत्व करण्याची विनंती केली. टिकैत संपूर्ण जबाबदारी स्वीकारत तरूण शेतकऱ्यांसोबत उभे राहिले.
ज्येष्ठ पत्रकार रामदत्त त्रिपाठी सांगतात, "महेंद्र सिंह टिकैत यांची सर्वात मोठी शक्ती म्हणजे ते अखेरपर्यंत धर्मनिरपेक्षता पाळत राहिले. त्यांच्या समाजाच्या (जाट) शेतकऱ्यांशिवाय मुस्लीम शेतकरीसुद्धा त्यांच्या एका हाकेने उभे राहायचे. याच बळावर त्यांनी लोकप्रिय शेतकरी नेते चौधरी चरण सिंह यांच्यानंतर निर्माण झालेली पोकळी भरण्याचं काम केलं."
स्पष्टवक्ते म्हणून ओळखले जाणारे महेंद्र सिंह टिकैत एक सामान्य शेतकरी नेते होते. त्यांचं संपूर्ण आयुष्य त्यांच्या गावातच गेलं. त्यांची शेतकरी आंदोलनं आणि त्यांच्या वक्तव्यांमुळे त्यांचा सरकारसोबत बऱ्याच वेळा संघर्ष झाला.

फोटो स्रोत, Getty Images
रामदत्त त्रिपाठी पुढे सांगतात, "उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांनी एकदा त्यांना अटक केली होती. माजी मुख्यमंत्री मायावती यांनीसुद्धा त्यांना अटक करण्यासाठी पोलीस पाठवले होते. पण टिकैत यांना अटक करण्यात पोलिसांना यश आलं नाही. अशा प्रकारच्या प्रत्येक घटनांनी या वयस्कर शेतकरी नेत्याच्या लोकप्रियतेत भर पडत गेली.
महेंद्र सिंह टिकैत यांचा उल्लेख ज्या-ज्या वेळी होतो, त्यावेळी दिल्लीच्या बोट क्लबमध्ये झालेल्या शेतकरी आंदोलनाची आठवण केली जाते. या आंदोलनानंतर बोट क्लबजवळ आंदोलन करण्यावरच बंदी घालण्यात आली होती.
ही आठवण सांगताना रामदत्त त्रिपाठी म्हणतात, "त्यावेळी सुमारे पाच लाख शेतकरी दिल्लीला आले होते. धोतर-कुर्ता घातलेल्या शेतकऱ्यांची एक संपूर्ण फौज बोट क्लबवर जमा झाली होती. या आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या नेत्यांमध्ये बाबा टिकैत हे प्रमुख चेहरा होते. शेतकऱ्यांनी दिल्लीकरांच्या निवांत फिरण्याच्या, आईस्क्रिम खाण्याच्या ठिकाणी कब्जा केल्यामुळे त्यांचा शेतकऱ्यांवर रोष निर्माण झाला होता. पण त्यावेळचं सरकार थोडं लवचिक होतं. विविध पक्षांचं म्हणणं ऐकून घेतलं जात होतं. पण आता परिस्थिती वेगळी आहे. यामुळेच राकेश टिकैत आणि इतर शेतकरी नेत्यांसमोर मोठं आव्हान आहे."
राकेश टिकैत भावनिक का झाले?
टिकैत कुटुंब मूळ शेतकरी कुटुंब आहे. महेंद्र सिंह यांचे लहान भाऊ भोपाल सिंह दिल्लीत प्राध्यापक होते. तर गावी आपल्या शेतीचं काम महेंद्र सांभाळत होते.

फोटो स्रोत, SM Viral Video Grab
टिकैत यांना चार मुलं आणि तीन मुली झाल्या. यामध्ये नरेश टिकैत सर्वात मोठे. नरेश यांना त्यांच्या तारूण्यात 100 आणि 200 मीटर धावण्याच्या शर्यतीचे चॅम्पियन म्हटलं जाईल.
नरेश हेच भारतीय किसान यूनियनचे विद्यमान अध्यक्ष आहेत. परिसरातील सर्वात मोठी खाप पंचायत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बालियान खापचे ते प्रमुखही आहेत. बालियान खाप मुजफ्फरनगर जिल्ह्यात 80 हून जास्त गावात आहे.
त्यानंतर राकेश टिकैत यांचा क्रमांक येतो. राकेश यांचा जन्म 4 जून 1969 रोजी मुजफ्फरनगर जिल्ह्यात सिसौली गावात झाला. सिसौली हेच टिकैत कुटुंबीयांचं मूळ गाव आहे.

फोटो स्रोत, Getty Images
राकेश टिकैत यांनी एम. ए. पर्यंतचं शिक्षण घेतलं. त्यांच्याकडे वकिलीची पदवी असल्याचंही सांगितलं जातं. ते भारतीय किसान यूनियनचे विद्यमान राष्ट्रीय प्रवक्ते आहेत. त्यांची संघटना शेतकऱ्यांच्या संयुक्त आंदोलनात सहभागी झाली आहे.
नरेंद्र टिकैत आणि सुरेंद्र टिकैत ही तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाची भावंडं. दोघेही स्थानिक साखर कारखान्यात काम करतात. तसंच शेतीविषयक कामकाज सांभाळतात.
टिकैत बंधूंनी गेल्या वीस वर्षात आपली शेती तसंच ओळख या दोन्ही गोष्टी वाढवल्या. चारी भावंडांमध्ये नरेश आणि राकेश हे सार्वजनिक जीवनात जास्त सक्रिय असतात. टिकैत कुटुंबीयांच्या मते, दोघेसुद्धा सरकारी नोकरीसाठी निवडण्यात आले होते. पण दोघांनी शेती करत आपल्या वडिलांचा वारसा पुढे नेण्याचं ठरवलं.
राकेश यांचे लहान भाऊ सुरेंद्र यांच्याशी बीबीसीने बातचीत केली.
त्यांना अशा प्रकारे टिव्हीवर त्रस्त झालेलं पाहून कुटुंबीय आणि संपूर्ण गाव विचलित झाला. पण आमच्यापैकी कुणीही घाबरलं नाही.
ते म्हणतात, "शेतकरी आंदोलनात सहभागी झाल्यामुळे जो व्यक्ती 43 वेळा तुरूंगात जाऊन आलेला आहे. त्याला 44 व्या वेळी तुरूंगात जाताना पाहून आश्चर्य वाटण्याचं कोणतंही कारण नाही. मात्र सध्याच्या परिस्थितीचा सामना आम्ही आधी कधीच केला नव्हता.
टिकैत यांच्या टीकाकारांच्या मते, "ते अडचणीत आले आहेत. त्यांच्याविरुद्धचा खटला तयार आहे. त्यांनी गाझीपूर सोडताच त्यांना अटक केली जाईल. तसंच आंदोलनस्थळसुद्धा रिकामं करण्यात येईल. नरेश टिकैत यांनीसुद्धा गुरुवारी गाझीपूर रिकामं करण्याबाबत म्हटलं होतं.
तर सिंघू बॉर्डरवर ठाण मांडून बसलेल्या पंजाबच्या शेतकरी संघटना टिकैत यांच्या हालचालींवर लक्ष ठेवून होते. तेसुद्धा व्ही. एम. सिंह आणि भानू प्रताप या नेत्यांप्रमाणे मागे हटण्याचा विचार तर करत नाहीत ना, याकडे त्यांचं लक्ष होतं. अशा स्थितीत टिकैत यांच्यासमोर पुन्हा पाठिंबा मिळवण्याचं आवाहन करण्याव्यतिरिक्त कोणताच पर्याय उपलब्ध नव्हता."
मात्र राकेश टिकैत यांचे समर्थक या कारणांवर विश्वास ठेवत नाहीत. त्यांचे भाऊ सुरेंद्र टिकैत यांच्या म्हणण्यानुसार, "गाझीपूरमध्ये बसलेल्या हजारो शेतकरी नेत्यांची जबाबदारी यूनियनची आहे. गुरुवारी भाजपचे दोन नेते काही कार्यकर्त्यांसोबत आंदोलनस्थळी दाखल झाले. त्यावेळी त्यांचं लक्ष्य राकेश टिकैत नव्हते. तर पोलिसांनी टिकैत यांना अटक करावी, त्यांनी आंदोलनस्थळ रिकामं करून घ्यावं, असं त्यांना वाटत होतं. त्यानंतर उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडच्या सीमाभागातून आलेल्या शेतकऱ्यांना देशद्रोही सिद्ध करून त्यांच्यावर निशाणा साधण्याचा त्यांचा विचार होता. यामुळेच राकेश टिकैत भावनिक झाले. शेतकऱ्यांना मारहाण करण्याचं षडयंत्र रचलं जात असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं."
राकेश टिकैत यांनी गुरुवारी कोणत्याही भाजप नेत्यांचं नाव न घेता त्यांच्यावर हेच आरोप केले होते. याबाबत भाजपने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
दिल्ली पोलिसांतील नोकरी सोडून बनले शेतकरी नेते
राकेश टिकैत यांचे भाचे देवेंद्र सिंह यांनी बीबीसीशी बातचीत करताना काही गोष्टी सांगितल्या.

फोटो स्रोत, Getty Images
त्यांच्या मामामध्ये आता महेंद्र सिंह टिकैत यांची प्रतिमा दिसू लागली आहे. त्यांच्या काही सवयींचा उल्लेख करताना देवेंद्र सांगतात, "राकेश टिकैत हे पूर्णपणे शाकाहारी आहेत. सुमारे पंधरा वर्षांपासून ते वेष्टनबंद पदार्थांचं सेवन करत नाहीत. कुटुंबातील सर्वांनाही ते हाच सल्ला देतात. ते अनेक प्रकारचे उपवास करतात. कधी-कधी पाणी न पिता 48 तास तसेच राहतात. ते वर्षातून चारवेळा रक्तदान करतात. वयाच्या 75 व्या वर्षापर्यंत रक्तदान करत राहण्याचं त्यांनी ठरवलं आहे. ते अत्यंत भावनिक व्यक्ती आहेत."
राकेश टिकैत हे राजकारण येण्याची कहाणीसुद्धा नाट्यमय असल्याचं त्यांचे भाचे देवेंद्र यांनी सांगितलं.
"1985 मध्ये दिल्ली पोलिसांत ते काँस्टेबल पदावर भरती झाले होते. काही वर्षांनंतर त्यांचं प्रमोशन होऊन ते पोलीस उपनिरीक्षक बनले. पण त्यादरम्यान बाबा टिकैत यांचं आंदोलन अत्यंत जोरदारपणे चालू होतं. शेतकऱ्यांचा वीजदर कमी करण्याची मागणी ते करत होते. त्यांना मोठा पाठिंबा मिळत असल्याने सरकार चिंताग्रस्त होतं. त्यावेळी राकेश टिकैत यांच्यावर आपल्या वडिलांचं आंदोलन थांबवण्याचा दबाव निर्माण करण्यात आला. पण राकेश टिकैत यांनी आपली नोकरी सोडून वडिलांच्या आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय घेतला."
राजकारणातील महत्त्वाकांक्षा
चौधरी महेंद्र सिंह टिकैत यांचं दीर्घशः आजाराने 2011 मध्ये निधन झालं. त्यांनी आपल्या काळात शेतकऱ्यांसाठी अनेक आंदोलनं केली. पण यादरम्यान राजकारणापासून अंतर राखून राहण्याचा त्यांनी प्रयत्न केला. ते फक्त शेतकऱ्यांच्या एका सामाजिक संघटनेचं नेतृत्व करतात, हेच ते नेहमी सांगायचे.
पण त्यांचे चिरंजीव राकेश टिकैत यांनी राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. 2007 मध्ये त्यांनी पहिल्यांदा मुजफ्फरनगरमध्ये बुढाना मतदारसंघातून निवडणूक लढवली. पण त्यांचा पराभव झाला. त्यानंतर 2014 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी चौधरी चरण सिंह यांच्या राष्ट्रीय लोक दल पक्षाकडून लोकसभेची निवडणूक लढवली. या निवडणुकीतही त्यांना पराभवाचा पत्करावा लागला.

फोटो स्रोत, Getty Images
राकेश टिकैत यांना आपली शक्ती शेतकरी आणि खाप पंचायत या दोन गोष्टींमध्ये असल्याचं माहीत आहे, असं त्यांचे निकटवर्तीय सांगतात.
भारतीय किसान यूनियन या शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नरेश टिकैत आहेत. पण ते फक्त मोठे भाऊ असल्यामुळेच या संघटनेचे अध्यक्ष आहेत, असं म्हटलं जातं. गेल्या काही वर्षात भारतीय किसान यूनियनचा प्रभाव वाढला आहे. या काळात राकेश टिकैत आपला राजकीय प्रभावही वाढवण्याचा प्रयत्न करताना दिसून आले.
2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी ट्रॅक्टर रॅलीचं आयोजन केलं होतं. त्यावेळी ही रॅली घेऊन ते दिल्ली गेटपर्यंत आले होते. त्यावेळी सुद्धा दिल्ली पोलिसांसोबत त्यांचे खटके उडाले होते.
त्यावेळी टीकाकारांनी टिकैत यांच्यावर जोरदार टीका केली. आपल्या राजकीय महत्त्वाकांक्षांसाठी राकेश टिकैत भोळ्या भाबड्या शेतकऱ्यांचा वापर करत असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. या रॅलीचे कोणतेही परिणाम दिसून आले नाहीत.
2019 मध्ये भाजपला मत दिलं
बालियान खाप पंचायतचे सदस्य असल्यामुळे भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री संजीव बालियान यांच्याशी टिकैत यांचे कौटुंबिक संबंध आहेत.
सुरेंद्र टिकैत यांनी बीबीसीशी बोलताना याबाबत माहिती दिली.
पण कालचा व्हीडिओ पाहून संजीव बालियान यांनी काही संदेश पाठवला का, या प्रश्नाला सुरेंद्र यांनी नकारार्थी उत्तर दिलं. पण राष्ट्रीय लोक दलचे नेते जयंत चौधरी यांच्या माध्यमातून चौधरी अजित सिंह यांचा संदेश टिकैत कुटुंबीयांपर्यंत जरूर पोहोचला. आता आपण सर्वांनी एकत्रित राहण्याची वेळ आली आहे, असं चौधरी अजित सिंह यांनी म्हटल्याचं ते सांगतात.अजित सिंह यांचं कुटुंब टिकैत कुटुंबाला आपला प्रतिस्पर्धी मानतो.
मुजफ्फरनगरचे लोक चौधरी चरण सिंह यांचे वारसदार चौधरी अजित सिंह हे 2019 च्या लोकसभा निवडणुकीत संजीव बालियान यांच्याकडून पराभूत झाले होते. राकेश टिकैत हे या पराभवामागचं कारण असल्याचं मानलं जातं. राकेश टिकैत यांनीच अजित सिंह यांच्याविरुद्ध बालियान यांची साथ दिली होती. गुरुवारी रडत-रडत राकेश टिकैत यांनी ही माहितीसुद्धा दिली होती.

फोटो स्रोत, Getty Images
2019 मध्ये आपण भाजपला मत दिलं होतं. हा दिवस पाहण्यासाठी मी हे मत दिलं का, हा पक्ष शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत आहे, असं राकेश टिकैत म्हणाले आहेत.
सध्या तरी केंद्र सरकारच्या अखत्यारित असलेल्या दिल्ली पोलिसांनी लाल किल्ल्यावर झालेल्या हिंसेनंतर राकेश टिकैत यांच्याविरुद्ध काही गंभीर कलमांअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी आपल्यावर कारवाई का करण्यात येऊ नये, असा प्रश्न दिल्ली पोलिसांनी पाठवलेल्या नोटीसमध्ये राकेश टिकैत यांना विचारण्यात आला आहे.
दुसरीकडे, राकेश टिकैत अजूनही गाझीपूर बॉर्डरवर ठाण मांडून बसलेले आहेत. सगळ्या पुराव्यांसह आपण दिल्ली पोलिसांना नोटीसचं प्रत्युत्तर पाठवणार असल्याची प्रतिक्रिया राकेश टिकैत यांनी दिली आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)










