You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अमिताभ बच्चन हे गीता गोपीनाथ यांच्या 'सौंदर्याचं' कौतुक केल्यामुळे ट्रोल का होत आहेत?
"इतका सुंदर चेहरा...अर्थशास्त्राशी कोणीही त्यांचा संबंध जोडू शकत नाही." अभिनेते अमिताभ बच्चन यांनी आंतरराष्ट्रीय आर्थिक निधीच्या प्रमुख अर्थतज्ज्ञ आणि भारतीय वंशाच्या गीता गोपीनाथ यांच्याबद्दल केलेले हे विधान सध्या चर्चेत आहे.
'कौन बनेगा करोडपती' या शोदरम्यान एका महिला स्पर्धकाला गीता गोपीनाथ यांच्याबद्दल प्रश्न विचारला होता. त्यावेळी अमिताभ बच्चन यांनी गीता गोपीनाथ यांच्याबाबत ही प्रतिक्रिया दिली.
अमिताभ यांनी स्क्रीनवर गीता गोपीनाथ यांचा फोटा दाखवला आणि ते महिला स्पर्धकाला म्हणाले, "इतका सुंदर चेहरा...अर्थशास्त्राशी कोणीही त्यांचा संबंध जोडू शकत नाही."
ही व्हीडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झालीय.
गीता गोपीनाथ यांनी स्वत: केबीसीमध्ये त्यांच्याशी संबंधित प्रश्न विचारला जाण्याबाबत आणि अमिताभ यांचे विधान ऐकून आनंद व्यक्त केला आहे. त्यांनी हा व्हीडिओ ट्वीट करत म्हटलं आहे, "मला वाटत नाही मी हे कधी विसरू शकेन. महानायक 'बिग बी यांची जबरदस्त चाहती असल्याने माझ्यासाठी हे खूप विशेष आहे."
गीता गोपीनाथ यांनी अमिताभ यांचे हे विधान कौतुकास्पद मानले, पण सोशल मीडियावर अनेकांनी बिग बींचे विधान 'सेक्सिस्ट" असल्याचे म्हणजेच 'लिंगभेद करणारे आहे' याकडे लक्ष वेधले आहे.
भारतीय अर्थतज्ज्ञ रूपा सुब्रमण्यम यांनी लिहिले, "हे अत्यंत लिंगभेदी आणि मूर्खपणाचे आहे. याबाबत आनंद व्यक्त करण्यापेक्षा तुम्ही त्याचा निषेध कराल अशी आशा होती. कमेंट्सवर तुमची प्रतिक्रिया ज्या पद्धतीने व्हायरल होत आहे, त्यामुळे तुम्हाला लिंगभेदाची काहीच अडचण नाही असे दिसते."
रूपा सुब्रमण्यम यांच्याव्यतिरिक्त अनेक महिलांनी अमिताभ बच्चन यांच्या या वक्तव्यावर तीव्र आक्षेप घेतला.
नमिताने लिहिले, "मला 'ब्युटी विथ ब्रेन' ही टिपणी अजिबात आवडली नाही. सुंदर स्त्रिया अर्थतज्ज्ञ होऊ शकत नाहीत हा अमिताभ बच्चन यांचा इशारा मूर्खपणाचा आहे."
आणखी एका ट्विटर युजरने म्हटले, "खरं सांगायचं तर ही 'चीप' कमेंट होती. तुम्ही (गीता) विद्वान आहात आणि अमिताभ तुमच्याबद्दल बोलू शकले ते केवळ तुमच्या चेह-याबद्दल. आपण आपल्या पुढच्या पिढीला तुमच्या कामगिरीबद्दल सांगायला हवं, केवळ सुंदरतेविषयी नव्हे. बिग बींनी एक मोठी संधी गमावली."
ललिताने लिहिले, "अर्थतज्ज्ञ सुंदर असू शकत नाहीत असे अमिताभ बच्चन यांना वाटते. पडद्यावर समंजस दिसणारे प्रत्यक्ष जीवनातही असतीलच असे नाही हे त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले."
आणखी एका ट्विटर युजरने लिहिले, "मी या क्लिप्स जवळजवळ 10 वेळा पाहिल्या आणि महिला स्पर्धकाच्या चेह-यावरील हावभाव वाचले. तिने क्षणभर सुरुवात केली किंवा कदाचित तिला वाटलं की ती तितकी सुंदर नाहीये..."
सोशल मीडियावर आणखी एक मतप्रवाह दिसून येत आहे ज्यांना अमिताभ बच्चन यांचे विधान आक्षेपार्ह वाटत नाही. त्यांनी फक्त गीता गोपीनाथ यांचे कौतुक केले असे अनेकांना वाटते.
अमिताभ यांच्या वक्तव्यावर एवढा वाद करण्याची काहीच गरज नाही असेही अनेकजण म्हणत आहेत. एका ट्विटर युजरने लिहिले, "कदाचित अमिताभ यांना असे म्हणायचे होते की, अर्थतज्ज्ञांचे व्यक्तिमत्त्व गंभीर स्वरुपाचे दिसते पण गीता त्यापेक्षा वेगळी आहे."
महिलांसदर्भातील 'ब्युटी विथ ब्रेन' संदर्भातले वाद नवीन नाहीत. महिलांमध्ये याबाबत एक मतप्रवाह आहे. 'ब्युटी विथ ब्रेन' असं म्हणणं हे महिलांचे कौतुक नसून सुंदर महिला बुद्धीवान नसतात या महिलांबाबतच्या पूर्वग्रहाला प्रोत्साहन देणारं आहे.
जेंडर स्टडीजच्या क्षेत्रात या विषयांवर कायम चर्चा होत असते. महिलांचे कर्तृत्व आणि त्यांनी कमावलेले यश याऐवजी त्यांचा चेहरा आणि शरीरावरून त्यांच्याबाबत मत तयार केले जाते.
गीता गोपानाथ कोण आहेत?
2018 मध्ये हॉर्वर्ड विद्यापीठात भारतीय वंशाच्या प्राख्यात असलेल्या गीता गोपीनाथ यांची आंतरराष्ट्रीय नाणे निधीच्या (आयएमएफ) मुख्य अर्थतज्ज्ञ म्हणून नियुक्ती करण्यात आली.
गीता गोपीनाथ हॉर्वर्ड विद्यापीठात इंटरनॅशनल स्टडीज ऑफ इकॉनॉमिक्सच्या प्राचार्य होत्या. त्यांनी इंटरनॅशनल फायनान्स आणि मॅक्रोइकॉनॉमिक्समध्ये संशोधन केले आहे.
आयएमएफच्या प्रमुख क्रिस्टीन लॅगार्ड यांनी गीता गोपीनाथ यांच्या नियुक्तीबद्दल माहिती देताना म्हटलं होतं, "गीता जगातील सर्वोत्तम अर्थतज्ज्ञांपैकी एक आहे. त्याच्याकडे उत्तम शैक्षणिक ज्ञान, बौद्धिक क्षमता आणि व्यापक आंतरराष्ट्रीय अनुभव आहे."
आयएमएफमध्ये या पदावर पोहोचणाऱ्या गीता या दुसऱ्या भारतीय आहेत. यापूर्वी, आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन हेही आयएमएफचे मुख्य अर्थतज्ज्ञ होते.
केरळ सरकारमध्ये भूमिका
केरळ सरकारने गेल्या वर्षी गीता गोपीनाथ यांची राज्याच्या आर्थिक सल्लागार पदी नियुक्ती केली होती. गीताचा जन्म केरळमध्ये झाला.
केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी गीता यांची नियुक्ती केली तेव्हा त्यांच्या नियुक्तीवरून पक्षाचे काही लोक त्यावेळी नाराज होते.
इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या बातमीनुसार, गीता यांनी त्यावेळी बोलताना म्हटलं होतं की, सल्लागारपदी नियुक्ती करणे हा माझा सन्मान आहे असे मी मानते.
दिल्लीतून पूर्ण केलं पदवीचं शिक्षण
गीता गोपीनाथ यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण भारतात पूर्ण केले. गीता यांनी 1992 मध्ये दिल्ली विद्यापीठाच्या लेडी श्रीराम कॉलेजमधून अर्थशास्त्राची पदवी मिळवली. त्यानंतर त्यांनी दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून अर्थशास्त्राची पदव्युत्तर पदवी पूर्ण केली.
1994 मध्ये गीता वॉशिंग्टन विद्यापीठात दाखल झाल्या. 1996 ते 2001 या कालावधीत त्यांनी प्रिन्स्टन विद्यापीठातून अर्थशास्त्रात पीएचडी पूर्ण केली.
गीता गोपीनाथ या अमेरिकन इकॉनॉमिक्स रिव्ह्यूच्या सहसंपादक आणि नॅशनल ब्युरो ऑफ इकॉनॉमिक रिसर्चच्या (एनबीआर) इंटरनॅशनल फायनान्स अॅण्ड मॅक्रोइकॉनॉमिक्सच्या सहसंचालक आहेत.
गीता यांनी व्यापार आणि गुंतवणूक, आंतरराष्ट्रीय आर्थिक संकट, चलन धोरणे, कर्ज आणि उदयोन्मुख बाजारपेठेतील समस्या या विषयावर जवळपास 40 संशोधन लेख लिहिले आहेत.
2001 ते 2005 पर्यंत त्या शिकागो विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापक होत्या. त्यानंतर 2005 मध्ये त्यांची हॉर्वर्ड विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापक म्हणून नियुक्ती करण्यात आली.
2010 मध्ये गीता याच विद्यापीठात प्राध्यापक झाल्या आणि त्यानंतर 2015 मध्ये त्या इंटरनॅशनल स्टडीज ऑफ इकॉनॉमिक्सच्या प्राध्यापक बनल्या.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)