You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
बाळासाहेब ठाकरे पुतळा : उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार, देवेंद्र फडणवीस एकाच व्यासपीठावर
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज (23 जानेवारी) जन्मदिन. बाळासाहेब ठाकरे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झालं.
या कार्यक्रम प्रसंगी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे सहकुटुंबीय एकत्र आले. तसंच, शरद पवार यांच्यासह महाविकास आघाडीतील महत्त्वाच्या नेत्यांसह विरोधी पक्षातील नेतेही हजर होते.
मुंबईतील फोर्ट परिसरातल्या डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी चौक इथं हा कार्यक्रम झाला.
यावेळेस आपल्या भावना व्यक्त करताना पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले, 'आज मनात असलेल्या भावनांना शब्द देता येणार नाहीत. गेल्या पन्नास साठ वर्षात महाराष्ट्रात होणाऱ्या सर्व घटनांवर बाळासाहेब ठाकरे यांची छाप होती. या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांच्यावर सर्वांचं असणारं प्रेम दिसून आलं.'
पत्रकारांनी जेव्हा विचारलं की सर्वपक्षीय नेते आले, पण अजित पवार का नाही आले, त्यावर आदित्य ठाकरे म्हणाले की अजित पवार पुण्यात असल्यामुळे येऊ नाही शकले.
बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचं काम कधी होणार हे विचारल्यावर मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले,"स्मारकाचं काम मार्गी लागतंय. मुख्यमंत्री त्यात लक्ष घालत आहेत. भव्यदिव्य स्मारक होईल. "
कोण कोण उपस्थित?
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, शिवसेना खासदार संजय राऊत उपस्थित होते.
तसंच, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, एकनाथ शिंदे, अनिल देसाई हे नेतेही उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्यावेळी मास्कचा उपयोग, सुरक्षित अंतराचं पालन या कोव्हिड-19च्या मार्गदर्शक बाबींचं पालन करावं, असं आवाहन करण्यात आलं होतं.
वर्दळीचा परिसर तसंच अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची सुरक्षितता लक्षात घेता प्रशासकीय यंत्रणा, पोलीस यंत्रणा, वाहतूक पोलीस यंत्रणा यांना आवश्यक आणि योग्य ते सहकार्य करावं, असंही आवाहन करण्यात आलं होतं.
देवेंद्र फडणवीस यांच्या ट्वीटवर चर्चा
माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बाळासाहेब ठाकरे यांना आज सकाळी ट्वीटरवर अभिवादन केले. यामध्ये त्यांनी एक व्हीडिओही दिला आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जुन्या भाषणांमधील काही ओळी वेचून केलेल्या या व्हीडिओतून देवेंद्र यांनी शिवसेनेवर खोचक टिप्पणी केल्याची चर्चा दिवसभर सुरू होती.
केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, कृषीमंत्री दादा भुसे, भाजप नेत्या पंकजा मुंडे या नेत्यांनी बाळासाहेब ठाकरेंना ट्वीटरवर अभिवादन केलं आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री आठ वाजता बीबीसी मराठीच्या फेसबुक पेजवर कोरोना पॉडकास्ट पाहायला विसरू नका.)