You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
बाळासाहेब ठाकरेंनी मायकल जॅक्सनबद्दल काय म्हटलं होतं?
- Author, सौतिक बिस्वास
- Role, बीबीसी प्रतिनिधी
जगप्रसिद्ध पॉप स्टार मायकल जॅक्सनच्या 24 वर्षांपूर्वी झालेल्या कार्यक्रमावरचा करमणूक शुल्काचा वाद आता मिटला आहे. राज्य मंत्रिमंडळाने 2021 मध्ये कार्यक्रमावरचा 3.3 कोटी रुपयांचं करमणूक शुल्क माफ केलं आहे.
1996 साली महाराष्ट्रात शिवसेना-भाजपची सत्ता असताना जगविख्यात पॉप स्टार मायकल जॅक्सनची एक कॉन्सर्ट मुंबईत आयोजित करण्यात आली होती. मायकल जॅक्सनने भारतात सादर केलेला तो पहिला आणि एकमेव कार्यक्रम होता.
1 नोव्हेंबर रोजी मुंबईतल्या स्टेडिअमवर या कॉन्सर्टचं आयोजन करण्यात आलं होतं. मायकल जॅक्सनने सप्टेंबर 1996 ते ऑक्टोबर 1997 असा वर्षभराचा जागतिक दौरा करून वेगवेगळ्या देशांमध्ये कार्यक्रम घेतले होते. त्याचाच एक भाग म्हणून मायकल भारतातही आला होतो.
त्यावेळी सत्तेत असलेल्या दोन पक्षांपैकी शिवसेनेच्याच प्रयत्नांनी हा कार्यक्रम झाला झाला आणि कॉन्सर्ट 'परोपकारी आणि सेवाभावाच्या' उद्देशाने आयोजित करण्यात आल्याचं म्हणत शिवसेनेने कार्यक्रमावरील करमणूक शुल्कही माफ केलं होतं.
मात्र, करमणूक शुल्क माफ करण्याच्या मुद्द्यावरून हे प्रकरण पुढची अनेक वर्ष कायद्याच्या कचाट्यात अडकलं. तब्बल 24 वर्ष या वादाचं भिजत घोंगडं कायम होतं. एका पॉप शोसाठीचं करमणूक शुल्क माफ करता येऊ शकतं का, असा प्रश्न मुंबई ग्राहक पंचायत या एका ग्राहक संरक्षण मंचाने उपस्थित केला. इतकंच नाही तर मायकल जॅक्सनच्या संगीताला शास्त्रीय संगीत म्हणाल का? यावरूनही वाद झाला.
या कार्यक्रमाची जबाबदारी बेरोजगार तरुणांना रोजगार देणाऱ्या शिवसेनेच्या शिवउद्योग सेनेकडे होती. कार्यक्रमातून होणारा नफा या संघटनेला दान करण्याचं आश्वासन मायकल जॅक्सननं दिलं होतं, असं लेखक सुकेतू मेहता यांनी 'Maximum City' या आपल्या पुरस्कारप्राप्त पुस्तकात म्हटलं आहे..
मात्र, कार्यक्रमाचं करमणूक शुल्क माफ करताच मुंबई ग्राहक पंचायत या गटाने मुंबई उच्च न्यायालयात याविरोधात याचिका दाखल केली.
याविषयी बोलताना मुंबई ग्राहक पंचायतचे अध्यक्ष शिरीष देशपांडे यांनी बीबीसीला सांगितलं, "या कॉन्सर्टच्या आयोजनाच्या काही दिवस आधीच राज्य सरकारने औषधांवरचा विक्री कर वाढवला होता. त्यामुळे एकीकडे औषधांवरचा कर वाढवायचा आणि दुसरीकडे अतिश्रीमंत जो कार्यक्रम बघायला येणार आहेत त्या कार्यक्रमावरचा करमणूक शुल्क माफ करायचा, असं तुम्ही कसं करू शकता? हा आमचा प्रश्न होता. मायकल जॅक्सनच्या त्या शोचं तिकीट 5000 रुपयांना होतं. त्याकाळी ही खूप मोठी रक्कम होती."
भारतात बरेजचा एखादी उत्कृष्ट कलाकृती असेल तर सर्वसामान्यांनाही ती बघायला मिळावी, यासाठी तिकीट स्वस्त करण्यासाठी काही मोजके चित्रपट आणि मनोरंजनाच्या कार्यक्रमांवरचं करमणूक शुल्क माफ केलं जातं. मात्र, मायकल जॅक्सनच्या कार्यक्रमाचं करमणूक शुल्क माफ केल्याने कार्यक्रम आयोजित करणारी खाजगी इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी आणि शिवसेनेची शिवउद्योग सेना या संघटनेला त्याचा थेट फायदा होणार होता.
न्यायालयाने मुंबई ग्राहक पंचायतचं म्हणणं ग्राह्य धरत कार्यक्रमाच्या तिकीट विक्रीतून जमा झालेले जवळपास 3 कोटी रुपये गोठवले आणि करमणूक शुल्क माफीला स्थगिती दिली. मात्र, अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार राज्य सरकारवर सोपवला.
पॉप संगीताला अशी शुल्कमाफी द्यावी का, यावरून त्यावेळी बरीच चर्चा झाली होती.
या कार्यक्रमाला 24 वर्ष लोटली आहेत. इतके वर्षांनंतर आणि दरम्यानच्या काळातल्या अनेक कोर्टकचेऱ्यांनंतर अखेर कार्यक्रमावरचा करणूक शुल्क माफ करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील शिवसेनेच्या नेतृत्त्वाखालील महाविकास आघाडी सरकारच्या राज्य मंत्रिमंडळाने हा निर्णय घेतला आहे.
या निर्णयाची माहिती देताना उद्योगमंत्री आणि शिवसेना नेते सुभाष देसाई म्हणाले, "राज्य मंत्रिमंडळाने ठराव मंजूर करत 1996 साली झालेल्या मायकल जॅक्सन यांच्या कार्यक्रमावरील 3.3 कोटी रुपयांचा करमणूक कर रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे."
मात्र, "ती चॅरिटीच आता नसल्याने ही रक्कम राज्य सरकारकडे जमा करावी, असं आमचं मत असल्याचं" शिरीष देशपांडे यांचं म्हणणं आहे.
भारतीय संगीत प्रेमींसाठी मायकल जॅक्सनचा कार्यक्रम एक दुर्मिळ संधी होती. मुंबईतल्या हॉटेल ओबेरॉयमध्ये मायकल जॅक्सन उतरला होता. मीडिया रिपोर्टनुसार त्याने हॉटेलकडे एका मोठ्या आरशाची मागणी केली होती आणि जाताना त्या आरशावर ऑटोग्राफही दिला होता.
मायकल जॅक्सनने मातोश्रीवर जाऊन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची भेटही घेतली होती. भारतातही जॅक्सनला अफाट लोकप्रियता होती. तो मुंबई विमानतळावर उतरला त्यावेळी त्याचं स्वागत करण्यासाठी हजारो मुंबईकर तिथे जमले होते.
प्रसारमध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत कार्यक्रमाच्या आयोजकांपैकी एकाने म्हटलं होतं, "मला आठवतं मायकल जॅक्सन त्याच्या प्रायव्हेट जेटमधून उतरला आणि त्याच्या ताफ्यात आणखी चार विमानं होती. तो आला तेव्हा जवळपास तासभर विमानतळावरचंही सर्वच काम थांबलं होतं. विमानतळावरचे अधिकारी, क्रू मेंबर्स, इतर प्रवासी सर्वच त्याला भेटत होतं."
मात्र, शिवसेनेवर दबाव वाढत होता. 'पाश्चिमात्य संस्कृतीचं' प्रतिनिधित्व करणाऱ्या पॉप संगीताच्या कार्यक्रमाचं हिंदुत्ववादी शिवसेना समर्थन कशी करू शकते, असा प्रश्न विरोधक विचारत होते.
शिवसेनेतल्याच काही नेत्यांना कार्यक्रमात 'काही प्रमाणात अश्लिलता' असल्याचंही वाटत होतं. मात्र, शिवसेनेने सत्तेतला घटक पक्ष असणाऱ्या भाजपला 'कार्यक्रमापासून दूर राहण्यास सांगितल्याचं' इंडिया टुडेने छापलं होतं.
एका भाजप नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर एका मासिकाशी बोलताना म्हटलं होतं, 'जॅक्सनने आमच्यात फूट पाडली. शिवसेनेला आमच्या राजकीय संबंधांपेक्षा जॅक्सन अधिक महत्त्वाचा आहे का?'
मात्र, बाळासाहेब ठाकरेंनी मायकल जॅक्सनचं जोरदार समर्थन केलं होतं.
"जॅक्सन उत्कृष्ट कलाकार आहे आणि आपण एक कलाकार म्हणून त्याचा स्वीकार केला पाहिजे. त्याच्या लकबी उत्कृष्ट आहेत. खूपच कमी लोकांना त्याच्यासारखं नाचता येतं. त्याच्यासारखं नाचायला गेलात तर हाडं मोडून बसाल", असं बाळासाहेब ठाकरे म्हणाल्याचं सुकेतू मेहता यांनी आपल्या पुस्तकात म्हटलं आहे,
"आणि संस्कृतीचं म्हणाल तर संस्कृती म्हणजे काय? तो अमेरिकेतल्या काही मूल्यांचं प्रतिनिधित्व करतो आणि भारतीयांनी ती मूल्यं स्वीकारण्यात काही गैर नाही. जॅक्सन ज्या अमेरिकेचं प्रतिनिधित्व करतो ती आपल्याला आवडली पाहिजे."
जून 2009 मध्ये लॉज एंजलिसमधल्या राहत्या घरी वयाच्या 50 व्या जॅक्सनचा मृत्यू झाला. त्याच्यावर लहान मुलांच्या लैंगिक शोषणाचे आरोपही झाले होते.
1 नोव्हेंबरच्या आल्हाददायक संध्याकाळी मुंबईतल्या स्टेडिअमवर झालेला जॅक्सनचा कॉन्सर्ट हिट ठरला. एका चाहत्याने सांगितलं, "जॅक्सनने हेलिकॉप्टरमधून स्टेडियमला फेरी मारली आणि त्यानंतर एका रॉकेटने तो स्टेडिअममध्ये दाखल झाला."
एका 15 वर्षांच्या मुलाला त्याने स्टेजवर डान्स करायला बोलावलं होतं.
एका परदेशी मासिकाशी बोलताना कॉन्सर्टचं वार्तांकन करणाऱ्या एका पत्रकाराने सांगितलं होतं, "ज्यांना स्टेडिअमच्या आत जाता आलं नाही त्यांनी बाहेर रस्त्यावर गर्दी केली होती. त्यामुळे ट्रॅफिक जॅमही झाला. त्याकाळी मुंबईत ध्वनी मर्यादेचे कठोर नियम नव्हते आणि जॅक्सनच्या संगीताचा आवाज अनेक मैलांपर्यंत ऐकू गेला होता. लोक वेडे झाले होते. ते रस्त्यावरच गात होते, नाचत होते."
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)