You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
धनंजय मुंडेंच्या विरोधातली महिलेची तक्रार मागे, शरद पवार म्हणतात आमचा निष्कर्ष योग्यच
सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधातली बलात्काराची तक्रार आता मागे घेण्यात आली आहे. ज्या महिलेने हा आरोप केला होता, तिने पोलिसांकडे जाऊन तक्रार मागे घेत जबाब नोंदवला आहे. यावर आता राजकीय प्रतिक्रियाही उमटत आहेत.
या महिलेनं ही तक्रार मागे घेतली असून महिलेच्या वकिलांनीही ही केस सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
वरिष्ठ IPS अधिकारी बीबीसीशी बोलताना म्हणाले ,"तक्रारदार महिलेने धनंजय मुंडे यांच्याविरोधात तक्रार मागे घेण्याबाबत चौकशी अधिकाऱ्यांना कळवलं आहे. तक्रार मागे घेण्यासंदर्भात पोलिसांना या महिलेनं जबाब दिला आहे."
मुंबई पोलिसांच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या मोहितीनुसार, "या महिलेने आपल्या जबाबात सांगितलं की, गेल्या काही वेळापासून तिची बहिण आणि मुंडे यांच्यात सलोख्याचे संबंध नव्हते. त्यामुळे ती मानसिक दबावाखाली होती. "
बीबीसी मराठीने तक्रारदार महिला आणि त्यांचे वकिल रमेश त्रिपाठी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण अद्याप त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्यांच्याशी संपर्क झाल्यावर त्यांची बाजू अपडेट करण्यात येईल.
याप्रकरणी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात म्हटलं, "आम्ही याप्रकरणाची चौकशी केली त्यावेळी यात सत्यता पडताळून पाहावं असं ठरलं. सुरुवातीला हे आरोप गंभीर स्वरुपाचे आहेत, असं मी म्हटलं. पण, ज्यावेळी कागदपत्रं समोर आली त्यावेळी खोलात जायचा आम्ही निष्कर्ष काढला आणि तो योग्य होता, असं प्रथमदर्शनी दिसून येत आहे."
भाजपची महिलेवर कारवाईची मागणी
भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी याविषयी प्रतिक्रिया देताना म्हटलं, "या प्रकरणी पहिल्यापासूनच भाजपची याबाबतची भूमिका स्पष्ट होती. एक चुकीचं उदाहरण आम्ही महाराष्ट्रात सेट होऊ देणार नाही, ही भूमिका आम्ही घेतली होती आणि त्यातून धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितला होता.
"पण, संबंधित महिलेनं बलात्काराची तक्रार मागे घेतली आहे. त्यामुळे तिच्यावर आयपीसीअंतर्गत कारवाई करणं गरजेचं आहे. मुंबई पोलिसांनी खोटे आरोप करणाऱ्या महिलेवर तत्काळ कारवाई करावी."
प्रकरण काय?
धनंजय मुंडे यांच्याविरोधात एका महिलेनं बलात्काराचा आरोप केला होता. 11 जानेवारी 2021 रोजी या महिलेने तक्रारीचं पत्र ट्वीट केलं.
या ट्वीटसोबत या महिलेनं म्हटलं, "मी धनंजय मुंडे यांच्याविरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली आहे. पण अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. ओशिवरा पोलीस स्टेशन माझी तक्रारसुद्धा दखल करून घ्यायला तयार नाही."
तसंच, या महिलेनं आणि तिच्या वकिलानं माध्यमांशी संवाद साधला.
त्यावेळी कथित पीडित महिलेने सांगितलं, "धनंजय मुंडे माझ्यासाठी केवळ मंत्री नाहीत. त्यांना मी 1996 पासून ओळखते. तेव्हा ते माझ्या बहिणीसोबत प्रेमसंबंधात होते. त्यावेळी मी 16-17 वर्षांची असेन. ते कुणीच नव्हते, तेव्हापासून मी त्यांना ओळखते. ते मंत्री आता आहेत. 1998 साली त्यांनी माझ्या बहिणीशी लग्न केलं होतं. मी तेव्हा या दोघांसोबत मुंबईत राहयचे. माझी बहीण बाळ झाल्यानंतर इंदौरला घरी गेली होती. तेव्हा घरात कुणी नसताना माझ्यावर बलात्कार केला."
धनंजय मुंडेंचं स्पष्टीकरण
सोशल मीडियावर या प्रकरणानं चांगलाच धोर धरल्यानंतर धनंजय मुंडे यांनी पुढे येत एक पोस्ट लिहून महिलेचे आरोप फेटाळले होते.
या महिलेचे आरोप म्हणजे ब्लॅकमेल करण्याचा प्रकार असल्याचं सांगत त्यांनी सर्व आरोप फेटाळून लावले होते.
तसंच आरोप करणाऱ्या महिलेच्या बहिणीशी आपले परस्पर सहमतीने संबंध होते. या संबंधातून दोन मुले झाली असून त्यांचा सांभाळही आपण करत असल्याचा खुलासा मुंडे यांनी यावेळी केला होता.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)