भाजप कोरोना विषाणूपेक्षाही घातक, तृणमूलच्या खासदारांची टीका #5मोठ्याबातम्या

आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा...

1. भाजप कोरोना विषाणूपेक्षाही घातक, तृणमूलच्या खासदारांची टीका

भाजप हा कोरोना विषाणूपेक्षाही अधिक घातक असल्याची टीका तृणमूलच्या खासदार नुसरत जहाँ यांनी केलीय. पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत आणि त्यासाठीचं वातावरण तापायला आता सुरुवात झाली आहे. लोकमतने याविषयीची बातमी दिली आहे.

सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि भाजप एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडतायत.

भाजप हिंदू आणि मुस्लिमांचे दंगे घडवून आणतं आणि भाजप सत्तेत आली तर मुस्लिमांचे उलटे दिवस सुरू होतील, अशी टीका तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ यांनी केलीय. त्या उत्तर 24 परगणा भागामध्ये प्रचारासाठी गेल्या होत्या. त्यावेळी बोलताना त्यांनी भाजपची तुलना कोरोनाशी केली.

2, राष्ट्रपती, उपराष्ट्रपतींनी दिली राम मंदिरासाठी देणगी

अयोध्येतल्या राम मंदिराच्या बांधकामासाठी देणग्या गोळा करायला शुक्रवार (15 जानेवारी) पासून सुरुवात झाली. भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी यासाठी पाच लाखांपेक्षा अधिक रक्कम देणगी म्हणून दिली आहे.

उपराष्ट्रपती व्यंकैय्या नायडू यांच्या कुटुंबाने यापूर्वीच यासाठी पाच लाखांची देणगी दिलेली आहे. लोकसत्ताने ही बातमी दिली आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आपल्यातर्फे आणि कुटुंबातर्फे पाच लाख 100 रुपयांची देणगी दिल्याचं विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष आलोककुमार यांनी म्हटलंय. तर उपराष्ट्रपती व्यंकैय्या नायडू यांच्या पत्नी उषा नायडू यांनी 5 लाख 11 हजार रुपयांची देणगी दिली आहे.

3, पुण्यातल्या बँकेवर ईडीचा छापा, राष्ट्रवादीचे आमदार अनिल भोसलेंना अटक

पुण्यातल्या शिवाजीराव भोसले सहकारी बँकेवर ईडीने छापा टाकला. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल भोसले आणि त्यांच्या पत्नी रेश्मा भोसले यांच्यासह बँकेच्या 14 संचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यूज 18 लोकमतने ही बातमी प्रसिद्ध केलीय.

पुण्यातल्या शिवाजीराव भोसले सहकारी बँकेमध्ये 71,000 कोटींचा घोटाळा झाल्याचा ठपका ईडीने ठेवलाय.

या कारवाईदरम्यान काही महत्त्वाची कागदपत्रं ताब्यात घेण्यात आली आहेत. आमदार अनिल भोसले सध्या तुरुंगात आहेत. अनिल भोसले हे राष्ट्रवादीचे आमदार आहेत तर त्यांच्या पत्नी भाजपच्या नगरसेविका आहेत.

4. दहावीचा अभ्यासक्रम निम्मा करा - मुख्याध्यापक, शिक्षक संघटनेची मागणी

कोरोनाच्या साथीमुळे दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेच्या अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळत नसल्याने अभ्यासक्रम निम्म्याने कमी करावा अशी मागणी मुख्याध्यापक आणि शिक्षक संघटनांनी केली आहे. एबीपी माझाने हे वृत्त दिलंय.

सध्या ऑनलाईन शिक्षण देण्यात येत असल्याने दहावीचा 25 टक्के अभ्यासक्रम यापूर्वीच कमी करण्यात आला होता.

दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा मे - जून महिन्यात होणार असल्याचं शिक्षण मंत्र्यांनी जाहीर केलंय.

पण राज्यातल्या अनेक विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण मिळू शकत नाही, त्यामुळे अशा मुलांचा अभ्यासक्रम प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्यानंतर पूर्ण करता यावा, या विद्यार्थ्यांची परीक्षेची तयारी पूर्ण करून घेता यावी यादृष्टीने ही मागणी मुख्याध्यापक आणि शिक्षक संघटनांनी केली आहे.

5. कुंभमेळ्यात मोजून डुबक्या मारता येणार, पोलिस ठेवणार नजर

कुंभमेळ्याला सुरुवात झालीय. यामध्ये गंगेमध्ये जाऊन स्नान करणाऱ्या भाविकांनी तीन डुबक्या मारून बाहेर पडावं, असं सांगण्यात आलंय.

मकरसंक्रांतीच्या दिवशी सुमारे सात लाख भाविकांनी हरिद्वारमध्ये गंगास्नान केल्याची माहिती उत्तराखंडच्या माहिती विभागाने दिल्याचं ई-सकाळने म्हटलंय.

कुंभमेळ्यादरम्यान कोव्हिडसाठीच्या नियमांचं पालन करण्यात येत असून या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 974 जणांवर पहिल्या दिवशी कारवाई करण्यात आली. यंदा कोरोनाच्या साथीमुळे कुंभमेळा साडेतीन महिन्यांऐवजी 48 दिवस होईल.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)