उद्धव ठाकरे सरकारनं मुंबई मेट्रो कारशेडच्या नवीन जागेसाठी नेमली समिती

मुंबई मेट्रो कारशेडची नवीन जागा निश्चित करण्यासाठी उद्धव ठाकरे सरकारने समिती गठीत करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील या समितीत 9 सदस्य असणार आहेत.
मुंबई मेट्रो कारशेडच्या पर्यायी जागेसंदर्भात राज्य सरकारला ही समिती शिफारस करणार आहे. एक महिन्याच्या आत या समितीला सरकारला अहवाल सुपूर्द करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
मुख्य सचिवांसोबत मुंबई महापालिका आयुक्त, विभागीय आयुक्त कोकण, प्रधान सचिव पर्यावरण, आयुक्त परिवहन या समितीचे सदस्य असतील.
आरेत कारशेड रद्द करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मेट्रो कारशेड कांजुरमार्गमध्ये बांधण्याचा निर्णय घेतला. सरकारने ही जमीन एमएमआरडीएला दिली. पण, कांजुरमार्गच्या जागेवर केंद्र आणि खासगी व्यक्तींनी मालकी हक्क असल्याचा दावा केला.
केंद्रातील मोदी सरकारने राज्य सरकारचा निर्णय चुकीचा असल्याचं कोर्टात सांगितलं.
हायकोर्टाने कांजुरमार्गच्या जागेवर मेट्रो कारशेडच्या बांधकामास स्थगिती दिली. कोर्टाच्या या निर्णयाने उद्धव ठाकरे सरकारला मोठा धक्का बसला. त्यामुळे मेट्रो कारशेडसाठी राज्य सरकारला पर्यायी जागेचा विचार करावा लागणार आहे.
उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने मेट्रो 3 आणि 6 प्रकल्पाची किंमत वाढण्याची शक्यता आहे. मेट्रो 3,4 आणि 6 यांचं नियोजन आणि कामाची सद्यस्थिती पहाता, प्रकल्पाची कार्यक्षमता आणि दिर्घकालीन नियोजनासाठी पर्यायी जागा निश्चित करणं आवश्यक असल्याचं राज्य सरकारने आपल्या निर्णयात म्हटलं आहे.
समितीची कार्यकक्षा
- आरेतील मेट्रो 3 कारशेडचा प्रस्तावित आराखडा, प्रकल्पाचा डिझाईन कालावधीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेसा आहे का किंवा गरजा पूर्ण करण्याकरिता आणखी जमीन व परिणामी वृक्षतोड करण्याची आवश्यकता भासेल का याची तपासणी करणे
- मेट्रो 3 आणि 6 यांचं एकत्रीकरण शक्य आहे का. याचा अंदाजे खर्च आणि कालावधी याबाबत तपासणी करणे.
- फायदे आणि जनहित लक्षात घेता कांजुरमार्गची जागा आरेपेक्षा सुयोग्य आहे का याची पाहणी.
- मेट्रो कारशेडसाठी योग्य जागेची शिफारस करणे
दरम्यान, मुंबई मेट्रो कारशेडचा मुद्दा शिवसेना आणि भाजपमध्ये राजकारणाचा मुद्दा बनला आहे. कांजुरमार्गच्या मुद्यावर राजकारण न करता एकत्र येऊन चर्चा करू असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी काही दिवसांपूर्वी केलं होतं.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








