You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
बाळासाहेब थोरात प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देणार?
महाराष्ट्र काँग्रेसमध्ये लवकरच खांदेपालट होणार असल्याची चर्चा सुरू आहे. काँग्रेसचे सध्याचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात त्यांच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे.
पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करण्यासाठी बाळासाहेब थोरात सोमवारी (04 जानेवारी) दिल्लीला आले आहेत. पक्षश्रेष्ठींसोबत बैठकीत थोरात आपली भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मात्र, बाळासाहेब थोरात किंवा काँग्रेस हायकमांडकडून राजीनाम्याबद्दल अधिकृत भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही.
याबाबत माहिती घेण्यासाठी बीबीसी मराठीनं काँग्रेसच्या नेत्या आणि मंत्री यशोमती ठाकूर यांच्याशी संपर्क केला तेव्हा त्यांनी बाळासाहेब थोरात यांच्या राजिनाम्याचं वृत्त फेटाळलं. पण पक्षश्रेष्ठींनी योग्य तो निर्णय घ्यावा असं ते सांगू शकतात अशी शक्यता मात्र ठाकूर यांनी व्यक्त केली आहे.
राजीनामा का?
काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या नेतृत्वबदलाच्या पार्श्वभूमीवर थोरातांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. बाळासाहेब थोरात यांनी प्रदेशाध्यक्षपदावरून पायउतार होण्याची इच्छा काँग्रेस पक्षश्रेष्ठींना कळवल्याचंही सूत्रांचं म्हणणं आहे.
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात काँग्रेसचा चेहरा बदलला जावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. काँग्रेसची कमान युवा नेतृत्वाच्या हाती द्यावी अशी मागणी काही काँग्रेस नेत्यांची आहे.
काही दिवसांपूर्वी मुंबई कॉँग्रेस अध्यक्षपदी भाई जगताप यांनी निवड करण्यात आली.
महाविकास आघाडी सरकार स्थापनेत महत्त्वाची भूमिका
बाळासाहेब थोरात काँग्रेसचे राज्यातील वरिष्ठ नेते आहेत. आठ वेळा आमदार म्हणून विधानसभेत पोहोचणाऱ्या थोरात यांचा अनुभव दांडगा आहे. राज्यात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकार स्थापनेत थोरात यांचीही महत्त्वाची भूमिका होती. बाळासाहेब थोरात महाविकास आघाडी सरकारमध्ये महसूल मंत्री आहेत.
प्रदेशाध्यक्षपदी कोणाची चर्चा?
राजकीय विश्लेषकांच्या माहितीनुसार, थोरात यांच्या जागी राजीव सातव, महिला बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर, आणि विदर्भातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)