You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
तामिळनाडू विधानसभा निवडणुकीविषयी या 3 गोष्टी माहिती आहेत का?
येत्या काही महिन्यात तामिळनाडूतही विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. पश्चिम बंगालबरोबरच याही राज्यात आपले पाय घट्ट रोवण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्ष करताना दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नोव्हेंबर महिन्यात तामिळनाडूचा दौराही केला होता.
यंदाच्या तामिळनाडूतल्या निवडणुका महत्त्वाच्या यासाठी आहेत कारण द्रविड मुनेत्र कळघम (DMK) आणि अण्णा द्रविड मुनेत्र कळघम (ADMK) दोन्ही पक्षांचे सर्वेसर्वा असणाऱ्या अनुक्रमे करुणानिधी आणि जयललिता या दोन मोठ्या नेत्यांचं निधन झालेलं आहे. जयललिता किंवा करूणानिधी यांच्याशिवाय होणारी ही पहिलच विधानसभा निवडणूक असेल.
तामिळनाडूच्या राजकारणात महत्त्वाच्या असणाऱ्या या दोन्ही पक्षांमधले अंतर्गत वाद समोर आले आहेत. करुणानिधींनी आपला पुत्र स्टॅलिन यांना वारस घोषित केलं होतं. त्यामुळे द्रमुकचं नेतृत्व स्टालिन यांच्याकडे आले खरे; पण त्यांचे बंधू अलिगिरी यांनी वेगळी चूल मांडली. जयललिता यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या पक्षात दोन गट पडलेले आहेत. या परिस्थितीचा फायदा उचलायचा प्रयत्न भाजप करत आहे.
भाजपने नुकतीच तामिळनाडूमध्ये वेट्रीवेल यात्राही आयोजित केली होती जिचा उद्देश तामिळनाडूतल्या हिंदूना एकत्रित करण्याचा होता.
1. कमल हसन यांचा राजकारणात प्रवेश
अभिनेते कमल हसन यांनी आपण आगामी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यांचा पक्ष मक्कल नीधि माईम निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. पण ते कोणत्या मतदार संघातून निवडणूक लढवणार आहेत हे त्यांनी स्पष्ट केलेलं नाही.
2. रजनीकांत यांची घोषणा आणि माघार
चेन्नईच्या राघवेंद्र कल्याणम् मंडपम् इथं 31 डिसेंबर 2017च्या रविवारी सकाळी त्यांनी समर्थकांच्या उपस्थितीत राजकारण प्रवेशाची घोषणा केली होती. त्यावेळी तामिळनाडू विधानसभेच्या सर्व 234 जागा त्यांचा पक्ष लढवणार असल्याची घोषणा त्यांनी केली होती. त्यावेळी ते म्हणाले होते…
"तामिळनाडूत लोकशाहीची अवस्था बिकट आहे. त्यामुळेच व्यवस्थेत बदल होणं गरजेचं आहे. मला पक्षासाठी कार्यकर्ता नको. लोकांच्या हक्कांचं रक्षण करू शकतील असे रक्षणकर्ते मला हवेत. आपण लोकांना पक्षाचा अजेंडा आणि धोरणं समजावून सांगू. एकदा निवडून आल्यावर लोकांना दिलेलं वचन पाळण्यात आपण कमी पडलो तर तीन वर्षांतच आपण सत्तेचा राजीनामा देऊ."
रजनीकांत यांचा पक्ष भाजपला पाठिंबा देईल किंवा भाजप आणि त्यांचा पक्ष एकत्र येऊन निवडणुका लढवतील अशी अटकळ होती. रजनीकांत आपल्या नव्या पक्षाची घोषणा जानेवारी 2021 मध्ये करणार होते, पण पण आता आपण राजकारणात जाणार नाहीत असं रजनीकांत यांनी घोषित केलं आहे.
पक्ष स्थापनेची तारीख 31 डिसेंबरला जाहीर करण्यात येणार होती. पण प्रकृतीच्या कारणामुळे राजकारणात न जाण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे.
ते म्हणाले, "मला तामिळनाडूचा दौरा करायची इच्छा होती, पण कोरोनाच्या साथीमुळे असं करणं शक्य नाही. शिवाय माझ्या तब्बेतीमुळे मुला तामिळनाडूमध्ये विविध ठिकाणी जाऊन प्रचारही करता येणार नसल्याचं डॉक्टरांनी मला सांगितलंय."
पण यानंतरही भाजपचे तामिळनाडूतले सरचिटणीस सी. टी. रवी यांनी आम्ही 'सुपरस्टार रजनीकांत यांचा पाठिंबा कदाचित घेऊ शकतो,' असं विधान केलं आहे.
3. 'मोठा भाऊ आम्हीच'
तामिळनाडूमध्ये सध्या भाजप आणि अण्णा द्रमुक पक्षांची युती आहे. या युतीविषयी बोलताना रवी म्हणाले की, "आमची युती मजबूत आहे, पण मुख्यमंत्री पदाचा दावेदार कोण असेल हे नंतर ठरेल."
दुसरीकडे अण्णा द्रमुक पक्षाने मुख्यमंत्री पलानीस्वामीच मुख्यमंत्री पदाचे दावेदार असतील आणि भाजपसोबतच्या युतीच अण्णा द्रमुक पक्षच 'मोठा भाऊ' असेल हे स्पष्ट केलं आहे.
सत्तरच्या दशकापासूनच तामिळनाडूत कोणत्याही मोठ्या राष्ट्रीय पक्षाला पाय रोवता आलेले नाहीत. तामिळनाडूत गेली साडेनऊ वर्षं अण्णा द्रमुकची सत्ता आहे.
मात्र, ते 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत अण्णा द्रमुक-भाजप युतीला फटका बसला होता. तामिळनाडूतील एकूण 39 लोकसभा जागांपैकी काँग्रेस-द्रमुक आघाडीने 38 जागा जिंकल्या होत्या. मे 2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला तामिळनाडूत 5.48 टक्के मते मिळाली होती, तर 2019 मध्ये 3.66 टक्के मतं मिळाली होती.
तामिळनाडूत मे 2021 विधानसभेच्या 234 जागांसाठी निवडणुका होणार आहेत, पण याच्या तारखा अजून घोषित झालेल्या नाहीत.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)