ब्रेक्झिट : आजपासून ब्रिटनची नवी सुरुवात, युरोपीय महासंघातून बाहेर पडण्याची प्रक्रिया पूर्ण

फोटो स्रोत, Reuters
नवीन वर्षासोबतच ब्रिटनसाठी नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे. ब्रिटन युरोपीय महासंघातून आजपासून औपचारिकरित्या विभक्त झाला आहे.
ब्रिटनने रात्री 11 वाजेपासून युरोपीय महासंघाचे नियम अमान्य करत प्रवास, व्यापार, स्थलांतर आणि सुरक्षेसंबंधी स्वतःच्या नवीन नियमांची अंमलबजावणी सुरू केली आहे.
ब्रेक्झिट संपल्यामुळे ब्रिटनला स्वातंत्र्य आणि वेगळ्या पद्धतीने आखणी करून उत्तम काम करण्याची संधी मिळाल्याचं ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी म्हटलं आहे.
ब्रिटन एक मित्र आणि सहकारी असेल, असं फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन यांनी म्हटलं.
यापुढे नवीन नियम असल्याने ब्रिटनच्या कंपन्यांनादेखील युरोपीय महासंघातील इतर राष्ट्रांशी नवीन नियमांनुसार व्यापार करावा लागणार आहे. त्यामुळे येते काही दिवस आणि काही महिने लोकांना त्रास सहन करावा लागू शकतो, असा इशारा ब्रिटनच्या मंत्र्यांनी दिला आहे.

फोटो स्रोत, Getty Images
बंदरांवरही नवीन नियमांमुळे काही अडथळे येत आहेत. मात्र, नवीन बॉर्डर यंत्रणा तयार असल्याचं अधिकऱ्यांचं म्हणणं आहे.
2016 सालच्या जून महिन्यात सार्वमत चाचणीत ब्रिटनच्या जनतेने युरोपीय महासंघातून बाहेर पडण्याचा निर्णय दिला होता. त्यानंतर बरोबर साडे तीन वर्षांनंतर ब्रिटन अधिकृतपणे 27 सदस्य राष्ट्र असलेल्या युरोपीय महासंघातून बाहेर पडला आहे.
गेली 11 महिने ही प्रक्रिया युरोपीय महासंघ आणि ब्रिटन यांच्यातल्या व्यापार नियमांमध्ये अडकून पडली होती. या दोन्ही पक्षांमध्ये यापुढे व्यापार कसा करायचा, यावर गेली 11 महिने चर्चा सुरू होती.
अखेर नाताळाच्या पूर्वसंध्येला या ऐतिहासिक व्यापार करारावर स्वाक्षऱ्या झाल्या. बुधवारी ब्रिटनच्या संसदेची मंजुरी मिळाल्यानंतर या कराराचं कायद्यात रुपांतर झालं.
नव्या यंत्रणेअंतर्गत उत्पादक कुठल्याही शुल्काशिवाय युरोपीय महासंघात व्यापार करू शकतात. याचाच अर्थ ब्रिटन आणि युरोपीय महासंघाची इतर राष्ट्रं यांच्यातल्या परस्पर व्यापारासाठी आयात शुल्क लागणार नाही.
मात्र, ब्रिटनमधून युरोपीय महासंघातील देशात जाण्यासाठी किंवा तिथे व्यापार करण्यासाठी यापुढे जास्त पेपरवर्क करावं लागणार आहे.
त्यासोबतच ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेचा मोठा भाग असणाऱ्या बँकिंग आणि सेवा क्षेत्राचं काय होणार, हा देखील मोठा प्रश्न आहे.
राजकीय विषयाच्या जाणकार जेसिका पार्कर यांचं विश्लेषण
या क्षणी काही जण आशावादी आहेत. तर काहींना पश्चाताप होतोय.
शिवाय हा क्षण अशावेळी येतोय ज्यावेळी काही भागात त्याचा परिणाम लगेच दिसणार नाही आणि काही भागात इतर भागांच्या तुलनेत जास्त जाणवेल.

फोटो स्रोत, Getty Images
उदाहरणार्थ नवीन बॉर्डर नियम लागू झाल्याने 2021 वर्षाच्या पहिल्या दिवशी डोव्हर शहरात ट्रॅफिक कमी असेल. शिवाय, व्यापार, प्रवास, सुरक्षा आणि स्थलांतर यातही अनेक बदल होतील.
तसंच कोरोना विषाणू संसर्गामुळे अजूनही अनेकजण घराबाहेर पडत नाहीत. त्यामुळे येणाऱ्या काळात हे बदल अधिक स्पष्टपणे दिसतील.
पंतप्रधानांनी व्यक्त केला आनंद
पंतप्रधान बोरीस जॉन्सन 2016 सालच्या 'लिव्ह कॅम्पेनचा' (leave campain) प्रमुख चेहरा होते आणि पंतप्रधानपदी विराजमान होताच सहा महिन्यातच त्यांनी ब्रिटनला युरोपीय महासंघातून बाहेर काढलं. हा अद्वितीय क्षण असल्याचं ते म्हणाले.
नवीन वर्षाचा संदेश देताना ब्रिटन वेगळ्या पद्धतीने काम करण्यासाठी आणि गरज भासल्यास युरोपीय महासंघातील आपल्या मित्रराष्ट्रांहून सरस कामगिरी करण्यास स्वतंत्र असल्याचं जॉन्सन म्हणाले.

फोटो स्रोत, PA Media
पंतप्रधान जॉन्सन म्हणाले, "आपलं स्वातंत्र्य आपल्या हातात आहे आणि त्याचा पुरेपूर वापर कसा करायचा, हेदेखील आपल्याच हातात आहे."
ब्रिटन पुन्हा एकदा पूर्णपणे स्वतंत्र राष्ट्र बनल्याचं ट्वीट ब्रेक्झिट चर्चेत ब्रिटनचे मुख्य प्रतिनिधी लॉर्ड फ्रोस्ट यांनी केलं आहे. तर हा निर्णय म्हणजे लोकशाही आणि प्रभुत्वाचा विजय असल्याचं हुजूर पक्षाचे खासदार सर बिल कॅश म्हणाले.
मात्र, युरोपीय महासंघातून बाहेर पडल्यामुळे ब्रिटनचं नुकसान होईल, असं ब्रेक्झिटच्या विरोधकांचं म्हणणं आहे.
स्वतंत्र स्कॉटलँडने पुन्हा युरोपीय महासंघात जावं, असं मत असणाऱ्या स्कॉटिश फर्स्ट मिनिस्टर निकोल स्टर्जन यांनी ट्वीट करत म्हटलं आहे, "स्कॉटलँड लवकरच परतेल. युरोप तुम्ही दिवे सुरू ठेवा."
आयरलँडचे परराष्ट्र मंत्री सायमन कोव्हेन म्हणतात, "आनंद साजरा करावा, असं काहीही घडलेलं नाही. यापुढे ब्रिटन आणि आयरलँडचे संबंध वेगळे असतील. मात्र, आम्ही त्यांना शुभेच्छा देतो."
युरोप एडिटर कात्या एडलर यांचं विश्लेषण
ब्रेक्झिटची प्रक्रिया पूर्ण झाल्याने ब्रसेल्सने समाधान व्यक्त केलं असलं तरी याबाबत तिथेही फारसा आनंद नाही.
ब्रेक्झिटमुळे युरोपीय महासंघ आणि ब्रिटन दोघंही दुबळे होतील, असं युरोपीय महासंघाला वाटतं.
मात्र, दोन्ही बाजूने बऱ्याच गोष्टी सुटल्या आहेत. त्यामुळे हे वेगळं होणं कमी आणि पुनर्मिलनापर्यंतचा दुरावा अधिक असल्याचं त्यांना वाटतं.

फोटो स्रोत, EPA
दोन्ही पक्षांमध्ये व्यावहारिकतेविषयीची चर्चाही व्हायची आहे. ब्रुसेल्स ब्रिटनच्या आर्थिक सेवांना किती अॅक्सेस देतो, हे बघावं लागेल.
यात हवामान बदलाचाही विषय आहे आणि नव्या व्यापार करारात दर पाच वर्षात नूतनीकरणाची अटही आहे.
या सर्व कारणांमुळे ब्रिटनसोबतची चर्चा संपलेली नाही, असं युरोपीय महासंघाचं मत आहे.
काय बदलणार?
- ब्रिटन आणि युरोपीय महासंघातील देशांमधील प्रवास स्वातंत्र्य संपलं आहे. या बदल्यात ब्रिटनने प्वाईंट बेस इमिग्रेशन यंत्रणा स्थापली आहे.
- यापुढे ब्रिटनच्या नागरिकाला युरोपीय महासंघाच्या कुठल्याही देशात जास्तीत जास्त 90 दिवस रहाता येईल. 90 दिवसांपेक्षा जास्त निवासासाठी व्हिजा अनिवार्य असेल.
- शुल्क रहित खरेदी. याचाच अर्थ युरोपीय महासंघातून ब्रिटनला परतणारे नागरिक आपल्यासोबत 42 लीटर बिअर, 18 लीटर वाईन आणि 200 सिगारेट कुठलंही शुल्क न भरता आणू शकतील.
- आयरलँडव्यतिरिक्त ब्रिटनमध्ये राहू इच्छिणाऱ्या युरोपीय महासंघातील कुठल्याही देशातील नागरिकासाठी जगातील कुठल्याही देशातील नागरिकाप्रमाणे पॉइंट बेस्ड यंत्रणा असेल.

फोटो स्रोत, Getty Images
- ब्रिटनच्या पोलिसांजवळ यापुढे युरोपीय महासंघाचा डेटा नसेल. ज्यात गुन्हेगारांचे रेकॉर्ड, बोटांचे ठसे आणि वॉन्टेड गुन्हेगारांची यादी, यांचा समावेश असतो.
- युरोपीय महासंघातल्या देशांशी व्यापार करणाऱ्या इंग्लैड, स्कॉटलँड, वेल्सच्या व्यापाऱ्यांना यापुढे जास्त कागदी कारवाई करावी लागेल. युरोपात निर्यात करणाऱ्या ब्रिटीश कंपन्यांना कस्टम फॉर्म भरणं बंधनकारक असणार आहे.
ब्रिटनची तयारी पूर्ण झाली आहे का?
येणाऱ्या बदलांशी जुळवून घेण्यासाठी ब्रिटनमध्ये गेल्या दोन आठवड्यांपासून विशेष तयारी सुरू आहे. मात्र, लहान व्यापारी अजून तयार नसल्याचं कळतंय.
या शेवटच्या काही दिवसांत ब्रिटनने सीमेवर पायाभूत सोयींचा आढावा घेतला. तसंच फ्रान्स, हॉलंड आणि बेल्जिअम या राष्ट्रांशी सहकार्यावर चर्चा केली.
एका सरकारी प्रवक्त्यांनी सांगितलं, "ज्या बॉर्डर सिस्टम आणि पायाभूत सोयींची गरज आहे, त्या आमच्याकडे आहेत आणि ब्रिटनच्या नव्या सुरुवातीसाठी आम्ही सज्ज आहोत."
योग्य कागदपत्रांशिवाय सीमेपार जाणारी वाहनं परत पाठवली जात आहेत. 7.5 टनांहून जास्त माल नेणाऱ्या आणि परमिट नसलेल्या गाड्यांवर मोठा दंड आकारला जातोय.
सोमवारपासून ट्रॅफिक वाढेल. तेव्हा नव्या प्रक्रिया आणि ब्रिटनच्या योजनांचा खरा कस लागणार आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








