You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना व्हायरस संसर्गामुळे 2020मध्ये मरण पावले हे डॉक्टर्स
2020 मध्ये भारतात 1 लाख 45 हजारांपेक्षा जास्त लोकांचा कोव्हिड-19मुळे मृत्यू झाला. यापैकी अनेक जण डॉक्टर्स आणि परिचारिकांसुद्धा होते, जे या युद्धात सर्वांत जास्त ताकदीने लढत होते.
इंडियन मेडिकल असोसिएशनच्या एका अहवालानुसार सप्टेंबर 2020 पर्यंत 500 हून अधिक डॉक्टरांनी त्यांचे प्राण या युद्धात गमावले. यापैकी बहुतांश डॉक्टर सामान्य चिकित्सक होते, ज्यांचं वय 41 ते 60 दरम्यान होतं.
2020 साल हे कोरोनाचं वर्षं म्हणून सर्वांच्या लक्षात राहील. या वर्षात जगभरात कोरोनाने 15 लाखाहून अधिक लोकांचे मृत्यू झाले. भारतात कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंची संख्या 1 लाख 40 हजारांच्या वर गेली आहे.
आपण आता 2021 मध्ये प्रवेश करत आहोत. जर आपण 2020 संपवून 2021 मध्ये प्रवेश करत आहोत तर त्याचं श्रेय कोव्हिड योद्धांनाच आहे यात दुमत नाही. पोलीस प्रशासन, नर्स, हॉस्पिटल्स कर्मचारी, औषध निर्माते, औषध विक्रेते आणि डॉक्टर्स यांनी अहोरात्र झटून गेल्या वर्षभरात कोरोनाची स्थिती नियंत्रणात आणण्याचा आटोकाट प्रयत्न केला.
केंद्र सरकारने सांगितले आहे की 11 सप्टेंबरपर्यंत कोरोना संसर्गाने देशातील 155 आरोग्य कर्मचाऱ्यांचा जीव गेला आहे. त्यापैकी 64 जण डॉक्टर्स होते. असं म्हटलं जात आहे की हा आकडा त्याहून अधिक आहे.
केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री अश्विनी चौबे यांनी संसदेत एका प्रश्नाचं उत्तर देताना म्हटलं आहे की आरोग्य हा राज्याचा विषय आहे आणि कोरोना व्हायरसचा संसर्ग होऊन मृत्यू झालेल्या डॉक्टरांची आकडेवारी केंद्राकडे नाही.
सुरुवातीच्या काळात आरोग्य कर्मचाऱ्यांना हलाखीच्या परिस्थितीत रुग्णांची सेवा करावी लागली. पीपीई किट, मास्क अशा सुविधांचा तुटवडा देखील त्यांना भासला.
त्या परिस्थितीतही आरोग्य कर्मचाऱ्यांनी आपलं काम नेटाने सुरू ठेवलं त्यात काही जणांनी आपल्या प्राणांची आहुती देखील दिली. त्यांचे स्मरण करण्यासाठी कोरोनामुळे गतप्राण झालेल्या डॉक्टरांचे फोटो संग्रहित केले आहेत.
नव्या वर्षाची पहाट आपल्या आयुष्यात आणण्यासाठी या लोकांचे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष योगदान आहे.
डॉक्टरांचे सर्वाधिक मृत्यू तामिळनाडूमध्ये झाले, जिथे 40 जणांना आपले प्राण गमवावे लागले. त्याखालोखाल महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये सर्वाधिक डॉक्टर मरण पावले.
ही भिंत त्या सर्व डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली आहे, ज्यांनी कोव्हिड-19च्या रुग्णांवर उपचार करताना स्वतःचे प्राण गमावले. या यादीत 382 डॉक्टरांचे नाव आणि फोटो आहेत, ज्यांची माहिती IMAने सुरुवातीला जारी केली होती. सर्व डॉक्टरांची माहिती गोळा झाल्यानंतर ही यादी अपडेट केली जाईल.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री 8 वाजता बीबीसी मराठीच्या फेसबुक पेजवर कोरोना पॉडकास्ट पाहायला विसरू नका.)