You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मेट्रो : ड्रायव्हरलेस मेट्रोचं काम कसं चालतं?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी (28 डिसेंबर) दिल्लीत देशातील पहिल्या ड्रायव्हरलेस मेट्रोला हिरवा झेंडा दाखवला.
देशातील ही पहिली ड्रायव्हरलेस मेट्रो 38 किलोमीटर अंतराच्या मजेन्टा लाईनवर धावणार आहे. 390 किलोमीटरवर दिल्लीतील मेट्रोचं जाळं पसरलंय. दिल्लीसह नोएडा, गुरुग्राम, फरिदाबाद, गाजियाबाद अशा शहरांनाही हे जाळं जोडतं.
दिल्ली मेट्रो देशातील सर्वात मोठी मेट्रोसेवा आहे. 24 सप्टेंबर 2002 साली शाहदरा ते तीस हजारी स्थानकादरम्यान 8.4 किलोमीटरच्या मार्गावर पहिली मेट्रो धावली.
2002 सालानंतर दिल्ली मेट्रोमध्ये अनेक बदल झाले. ड्रायव्हरलेस मेट्रो आणण्यासाठी मेट्रो रेल्वेज जनरल रुल्स 2020 मध्येही बदल करण्यात आले. यापूर्वी या नियमानुसार चालकाविना मेट्रो चालवण्याची परवानगी नव्हती.
मजेंटा लाईन दिल्लीतील जनकपुरी पश्चिम आणि नोएडामधील बोटॅनिकल गार्डन यांना जोडते. या लाईनवर पहिल्यांदा ड्रायव्हरलेस मेट्रोची सुरुवात होतेय. पिंक लाईन (मजलिस पार्क ते शिव विहार) वर 2021 पर्यंत ड्रायव्हरलेस मेट्रो सुरू करण्याची योजना आहे.
डीएमआरसीने दिलेल्या माहितीनुसार, बहुतांश ट्रेन रिमोट कंट्रोलच्या माध्यमातून म्हणजेच ऑपरेशन रुममधून नियंत्रित केल्या जातील. या केंद्राला ऑपरेशन्स कंट्रोल सेंटर अर्थात ओसीसी असं म्हटलं जातं.
अभियंत्यांचा गट रिअल टाईम ट्रेनच्या वाटचालीवर नियंत्रण ठेवेल. विमानांच्या वाहतुकीसाठी एअर ट्रॅफिक कंट्रोल असतं तशा पद्धतीने याचं काम चालेल. डीएमआरसीकडे सद्यस्थितीला तीन ऑपरेशन्स कंट्रोल सेंटर आहेत- दोन मेट्रो मुख्यालयात तर एक शास्त्री सेंटर इथे.
कोणत्या लाईनवर ट्रेनची वाहतूक सुरू आहे यावर ड्रायव्हर किंवा ट्रेन ऑपरेटर यांच्याकडे किती नियंत्रण आहे हे अवलंबून असतं.
जुन्या मार्गावर ट्रेनचा वेग तसंच दरवाजे उघडणं, बंद होणं हे ड्रायव्हरच्या हाती असतं. ठराविक वेगापेक्षा ते ट्रेन चालवू शकत नाहीत.
नव्याने सुरू झालेल्या मार्गिंकावर ड्रायव्हर ट्रेन चालवण्याची कमांड देतात. या मार्गांवर ऑटोमॅटिक कंट्रोल बंद करण्यात येतो. जेणेकरून आपात्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी ड्रायव्हर तयार राहील.
28 डिसेंबरपासून मजेन्टा मार्गावरील मेट्रो ड्रायव्हरविना चालवल्या जातील. यालाच तांत्रिक भाषेत ड्रायव्हरलेस ट्रेन ऑपरेशन (डीटीओ) म्हटलं जातं. कोणत्याही मानवी हस्तक्षेपाविना ट्रेन चालवली जाऊ शकते. डीएमआरसीच्या तीन कमांड केंद्रांच्या माध्यमातून हे काम केलं जाईल.
कम्युनिकेशन बेस्ड ट्रेन कंट्रोल (सीबीटीसी) सिग्नलिंग तकनीक ट्रेनची ये-जा तसंच ट्रेनमध्ये कोणताही तांत्रिक बिघाड झाल्यास त्याची दुरुस्ती करू शकतो.
एखादं हार्डवेअर बदलण्याच्या वेळेस मात्र मानवी हस्तक्षेपाची आवश्यकता असेल.
ड्रायव्हरलेस ट्रेन तांत्रिकतेचं एक मापदंड असतो ज्याला ग्रेड्स ऑफ ऑटोमेशन (जीओए) म्हटलं जातं.
जीओए 1 प्रकारात ड्रायव्हर ट्रेनचं सारथ्य करतो. जीओए 2 आणि जीओए 3 नुसार ड्रायव्हरची भूमिका दरवाजे उघडणे तसंच आपात्कालीन परिस्थितीत ट्रेनचं नियंत्रण स्वत:कडे घेणे एवढ्यापुरती मर्यादित असते. ट्रेन चालू होणं आणि थांबणं स्वयंचलित पद्धतीने होतं. जीओए 4मध्ये ट्रेनचं सगळं परिचालन स्वयंचलित पद्धतीने होतं.
2017 पासून डीएमआरसीकडे ही प्रणाली आहे. मात्र ही प्रणाली कार्यान्वित करण्यापूर्वी कठोर परीक्षण करण्यात आलं. या प्रणालीची सुरुवात मे 2020 मध्येच होणार होती मात्र कोरोना लॉकडाऊनमुळे तेव्हा हे संक्रमण स्थगित करण्यात आलं.
ड्रायव्हरलेस मेट्रो किती सुरक्षित?
डीएमआरसीच्या मते, मेट्रो सर्वस्वी मानवी हस्तक्षेपाविना सुरू होण्याआधीच अनेक कामं स्वयंचलित पद्धतीने होत होती. हाय रेझोल्यूशन कॅमेरे लावलेले असल्याने केबिनच्या माध्यमातून ट्रॅकवर निगराणी ठेवण्याची आवश्यकता नाही. नव्या प्रणालीनुसार, ट्रेन आणि ट्रेनच्या डोक्यावरच्या विजेचा पुरवठा करणाऱ्या तारा यांच्यावर लक्ष ठेवलं जाईल. आपात्कालीन स्थितीत तातडीने उपाययोजना केली जाईल.
कमिश्नर ऑफ रेल्वे सेफ्टी (सीएमआरएस) यांनी 18 डिसेंबरला ड्रायव्हरलेस मेट्रोला परवानगी दिली होती. कमांड सेंटरमधून संपूर्ण मार्ग सुस्पष्टपणे दिसायला हवा आणि ट्रेनवर लावण्यात आलेले कॅमेरे आर्द्रता, धुकं यापासून मुक्त राहायला हवेत असे त्यांचे निर्देश असायला हवेत.
डीएमआरसीने दिलेल्या माहितीनुसार, ड्रायव्हरलेस मेट्रोच्या वाहतुकीचं निरीक्षण आणि परीक्षणासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्यात आली आहे. यासंदर्भात अहवाल डीएमआरसीकडून ड्रायव्हरलेस मेट्रो सुरू झाल्यानंतर कमिशनर ऑफ रेल्वे सेफ्टी यांना देण्यात येईल.
कमांड सेंटर या ठिकाणी इन्फॉर्मेशन कंट्रोलर अर्थात माहिती नियंत्रक असतील. प्रवासी आणि गर्दी यांच्यावर लक्ष ठेवण्याचं काम ते करतील. ट्रेनशी निगडीत अन्य माहिती तसंच सीसीटीव्हीचं नियमित परीक्षण केलं जाईल. मात्र अजूनही ही प्रणाली अनअटेंडेड ट्रेन ऑपरेशन (युटीओ) म्हणजे संपूर्णपणे मानवविरहित प्रणालीपासून दूर आहे.
आपात्कालीन परिस्थिती उद्भवल्यास काय?
डीएमआरसी संपूर्णत: युटीओ प्रणाली अंगीकारत नाही तोपर्यंत प्रशिक्षित मेट्रो ऑपरेटर या मार्गावरील ट्रेनमध्ये असेल.
आपात्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तो परिस्थिती हाताळेल. जेव्हा मेट्रोतील प्रत्येक गोष्ट टिपणारे कॅमेरे काम सुरू करतील तेव्हा ड्रायव्हर नसतील.
काही काळानंतर ड्रायव्हरची केबिन आणि कंट्रोल पॅनेलही नसेल. सध्याच्या मेट्रो ट्रेनमध्ये सुरुवातीला आणि शेवटी ड्रायव्हरची केबिन असते. आता लावण्यात आलेल्या कॅमेऱ्यांनी ट्रॅकवर गडबड झाल्यास टिपली जाऊ शकत नाही. ट्रॅकचं फुटेज रिअल टाईममध्ये कमांड सेंटरला बघता यावं यासाठी काही बदल करण्यात येतील.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)