पुणे मेट्रोः पुण्यात मेट्रो कधी धावणार?

    • Author, हर्षल आकुडे
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

आज 24 डिसेंबर 2020. चार वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे मेट्रोचं भूमिपूजन करण्यात आलं. मेट्रो 2020 पर्यंत धावू लागेल, असं त्यावेळी सांगण्यात आलं होतं.

पुण्यात मेट्रोची मागणी जुनी होती. पण मेट्रो भुयारी की एलिव्हेटेड असावी, तिचा मार्ग कसा असावा या प्रश्नांच्या अवतीभोवतीच मेट्रोची चर्चा रंगून विषय संपायचा. बरीच चर्चा आणि वादविवादानंतर अखेर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे मेट्रोच्या पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी या दोन मार्गांवर शिक्कामोर्तब केलं.

पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर पुणे मेट्रोच्या कामाचं भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. भूमिपूजनानंतर कामाने वेग घेतला. पुढे PMRDA मार्फत शिवाजीनगर ते हिंजवडी हा तिसरा मार्गही करण्याचं ठरलं. महा-मेट्रोच्या दोन मार्गांचं काम वेगाने सुरू होतं. त्यामुळे पुणेकरांना मेट्रोच्या माध्यमातून आशेचा किरण दिसू लागला.

गेल्या चार वर्षांत पुणे मेट्रोचं अस्तित्व शहरवासियांना जाणवू लागलं आहे. मेट्रोच्या बांधकामाने शहराचं रुपडं पालटून टाकलं. डिसेंबर 2019 मध्ये तर मेट्रोचे डबेही रुळावर चढवण्यात आले. ट्रायल रनही घेण्यात आली. घोषणा, गाजावाजा झाला. आता लवकरच मेट्रो धावताना दिसेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. पण त्याच्या एका वर्षानंतरही ती मेट्रो अद्याप तशीच रुळावर थांबून आहे.

याची कारणं नेमकी काय आहेत? पुणेकरांना मेट्रोच्या प्रवासासाठी अजून किती काळ प्रतीक्षा करावी लागेल? आज 24 डिसेंबरला भूमिजूनाच्या चार वर्षांनी मेट्रोच्या कामाची काय स्थिती आहे? यासंदर्भात पहिल्या दोन मार्गांचा आढावा बीबीसीने घेतला आहे.

पुणे मेट्रोचे मार्ग

लाईन 1 - पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट - 16.589 किमी - भूमिगत 5, एलिव्हेटेड 9 स्थानके

लाईन 2 - वनाज ते रामवाडी - 14.665 किमी - एलिव्हेटेड 9 स्थानके

लाईन 3 - शिवाजीनगर ते हिंजवडी (हा मार्ग PMRDA मार्फत केला जात आहे. याचं प्राथमिक टप्प्यातलं काम सुरू आहे.)

सध्या परिस्थिती काय?

पुणे मेट्रोचे दोन्ही मार्ग मिळून एकूण 45 टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती महासंचालक (जनसंपर्क) हेमंत सोनवणे यांनी दिली. तसंच डेपोंचं कामही बऱ्यापैकी वेगाने झाल्याचं पाहायला मिळेल. यात वनाज डेपोचं काम 55 टक्के तर रेंज हिल्सचं काम 40 टक्के पूर्ण झालं आहे, असंही सोनवणे यांनी सांगितलं.

पुणे मेट्रोच्या दोन मार्गांच्या बांधकामासाठी त्याची चार भागांत विभागणी करण्यात आली आहे. यामध्ये पिंपरी ते रेंज हिल्स (रिच 1), वनाज ते सिव्हील कोर्ट(रिच 2), रामवाडी ते सिव्हील कोर्ट (रिच 3) हे तीन भाग एलिव्हेटेड तर रेंजहिल्स ते स्वारगेट हा टप्पा भूमिगत आहे.

पिंपरी-चिंचवड परिसरात काम जोमात

या सर्व मार्गांपैकी रिच 1 : पिंपरी-चिंचवड ते रेंजहिल्स या टप्प्यातील काम वेगाने सुरू आहे. पिंपरी-चिंचवड ते रेंज हिल्स या मार्गावरील 467 खांबांपैकी 369 खांब बांधून पूर्ण झाले आहेत. तर पुलावरील ट्रॅक बांधण्यासाठी आवश्यक 452 स्पॅनपैकी 273 स्पॅन टाकून झाले आहेत. या मार्गावर जवळपास 5.6 किलोमीटर अंतरापर्यंतचं वायरींगही पूर्ण झालं आहे.

पिंपरी-चिंचवड ते रेंजहिल्स मार्गावर असलेल्या संत तुकाराम नगर मेट्रो स्थानकाचं कामही पूर्णत्वाकडे आलं आहे. या स्टेशनवरचं सिग्नलिंगचं कामही 35 टक्के पूर्ण झालं आहे. या मार्गावरील तिकिट दाखवून आत जाण्यासाठीचे गेट म्हणजेच Automatic Fare Collection (AFC) काम अंतिम टप्प्यात आहे. या मार्गावरील इतर स्टेशनही आकार घेत असल्याचं दिसून येईल. या मार्गावरही खडकी परिसरात बरंच काम बाकी आहे. त्याठिकाणी रस्ते रुंदीकरणाच्या कामासाठी मेट्रोचं काम रखडलं आहे, असं सोनवणे यांनी सांगितलं.

मात्र पिंपरी-चिंचवड ते रेंज हिल्स मार्गाप्रमाणे प्रगती इतर ठिकाणी पाहायला मिळत नाही.

एकाकी खांब

रिच 2 : वनाज ते सिव्हिल कोर्टपर्यंतच्या मार्गावर 311 पैकी 282 खांब बांधून झाले आहेत. या मार्गावर आवश्यक 296 पैकी 172 स्पॅनचं काम झालं आहे. तसंच रिच 3 : रामवाडी ते सिव्हील कोर्ट या मार्गावर 319 पैकी 242 खांब बांधून उभे आहेत. मात्र 296 स्पॅनपैकी फक्त 93 स्पॅन या मार्गावर बांधण्यात आले.

म्हणजेच या बाजूचं काम संथ गतीने सुरू असल्याचं दिसून येतं. यामुळे उभे राहिलेले खांब स्पॅनविना एकाकी असं चित्र या मार्गावर आहे.

वनाज ते सिव्हील कोर्ट या टप्प्यात कोथरूड परिसरात आनंद नगरचं बऱ्यापैकी वेगाने सुरू आहे. पण आनंद नगर वगळता इतर स्टेशन उभे करण्यासाठीचं बहुतांश काम अद्याप बाकी आहे. डेक्कन परिसरात नदीपात्रात खांब बांधून तयार आहेत. पण याठिकाणीही काम संथगतीनेच सुरू आहे. आधी लॉकडाऊन आणि नंतर पावसाळा यामुळे या ठिकाणचं काम होऊ शकलं नाही, आता या मार्गावर स्पॅन टाकण्याचं काम सुरू केल्याचं हेमंत सोनवणे यांनी सांगितलं.

वनाज-रामवाडी मार्गात अडथळे

वनाज ते रामवाडी हा मार्ग अत्यंत वादग्रस्त राहिलेला आहे. दोनवेळा हा मार्ग वळवण्याचा निर्णय घेण्यात आला. हा मार्ग सर्वप्रथम रेल्वे स्थानकाच्या समोरील बाजूने जाईल, असं नियोजन होतं. पण रेल्वे प्रशासनाने त्यास मंजुरी न दिल्याने रेल्वे स्थानकाच्या मागील बाजूने मार्ग वळवण्यात आला. तर येरवडा परिसरात आगा खान पॅलेसच्या समोरून मेट्रो नेण्यास पुरातत्व खात्याने परवानगी नाकारली. त्यामुळे बायोडायव्हर्सिटी पार्कमधून कल्याणीनगरमार्गे मार्गाची आखणी करण्यात आली.

या मार्गाला स्थगिती देण्यासाठी कल्याणीनगर परिसरातील नागरिकांनी केलेली याचिका नंतर फेटाळण्यात आली.

या सगळ्यांमध्ये वनाज-रामवाडी मार्गाला मात्र अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागत असल्याचं चित्र आहे.

पर्यावरणहानीचा आरोप

सध्या मुंबई मेट्रो आणि आरे कॉलनी हे प्रकरण गाजत आहे. पर्यावरणवाद्यांच्या विरोधामुळे मुंबईतील लाईन 3 चं आरे कारशेडच बदलून कांजूरमार्गला नेण्यात आलं होतं. त्यावरून सध्या राजकीय घमासान सुरू आहे. असाच वाद पुण्यातही दिसून आला होता.

वनाज ते रामवाडी मार्गाची अलाईनमेंट डेक्कन परिसरात नदीपात्रातून जात असल्यामुळे पर्यावरणवाद्यांकडून विरोध झाला. पुढे येरवडा परिसरात सलीम अली बायो डायव्हर्सिटी पार्कचा मुद्दा ऐरणीवर आला. अखेर मार्गात आलेल्या अडथळ्यांवर मात करत कायदेशीर मंजुरी मिळवण्यात पुणे मेट्रोला यश आलं.

पुणे मेट्रोने पर्यावरणाची हानी होत आहे का या प्रश्नाला उत्तर देताना पुणे मेट्रो प्रकल्प पर्यावरण पूरक पद्धतीनेच पूर्ण केला जात असल्याचं हेमंत सोनावणे यांनी सांगितलं. मेट्रोचं बांधकाम करताना शक्यतो पुनर्रोपण (रि-प्लांटेशन) करण्याचा आमचा प्रयत्न असतो. किंवा झालेल्या वृक्षतोडीच्या नुकसानभरपाईसाठी पुणे महापालिका हद्दीत एका झाडाच्या बदल्यात तीन झाडे तर पिंपरी-चिंचवड हद्दीत एका झाडाच्या बदल्यात पाच झाडे या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात येत असल्याचं सोनवणे म्हणाले.

याविषयी पुणे मेट्रोने दिलेल्या एका प्रसिद्धीपत्रकानुसार, पुणे मेट्रोने डिसेंबर 2019 पर्यंत तळजाई टेकडी, खराडी, आकुर्डी, डेक्कन कॉलेज कॅम्पस इ. परिसरात 14 हजार 645 झाडांचं वृक्षारोपण केलं तर तब्बल 1681 झाडांचं पुनर्रोपण करण्यात आलं आहे.

पुणे मेट्रोच्या कामाचा आतापर्यंतचा प्रवास

  • डिसेंबर 2016 - पुणे मेट्रोचं भूमिपूजन
  • जानेवारी 2017 - महा-मेट्रो कंपनीची स्थापना
  • फेब्रुवारी 2017 - मेट्रोच्या कामाची पहिली निविदा
  • जुलै 2017 - पहिल्या खांबाचं बांधकाम सुरू
  • डिसेंबर 2018 - मेट्रोच्या भूमिगत कामास सुरूवात
  • जून 2019 - मेट्रो ट्रॅक टाकण्यास सुरूवात
  • डिसेंबर 2019 - मेट्रो डबे रुळावर
  • जानेवारी 2020 - मेट्रोची पहिली चाचणी
  • मार्च 2020 - लॉकडाऊनमुळे काम पूर्णपणे बंद
  • मे 2020 - मेट्रोचं काम पुन्हा सुरू
  • सप्टेंबर 2020 - भुयारी मार्गाचा पहिला टप्पा पूर्ण

लॉकडाऊनचा फटका

मेट्रोचं काम संथपणे होण्यास लॉकडाऊन हेसुद्धा एक कारण असल्याचं महासंचालक हेमंत सोनवणे यांनी सांगितलं.

लॉकडाऊनपूर्वी पुणे मेट्रो प्रकल्पात 6 हजार 500 मजूर काम करत होते. यामध्ये बहुतांश मजूर युपी-बिहार-छत्तीसगढ भागातील आहेत. मार्च महिन्यात साथ सुरु होण्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात प्रकल्पातील मजूर मिळेत त्या गाडीने गावी जाण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे हळूहळू त्यांची संख्या कमी होत गेली.

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशात सर्वत्र 24 मार्च रोजी लॉकडाऊन झाल्यानंतर ही परिस्थिती आणखीनच बिकट झाली. या सगळ्यांचा जोरदार फटका पुणे मेट्रोच्या कामाला बसला.

24 मार्च ते 30 एप्रिल 2020 असे 35 दिवस पुणे मेट्रोचं काम पूर्णपणे बंद होतं. या काळात मजूर पुण्यात अडकून पडले होते. अखेर 1 मे रोजी पुणे, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची विशेष परवानगी घेऊन काम पुन्हा सुरू करण्यात आलं. पण हे कामही अपेक्षेप्रमाणे झालं नाही.

दरम्यान, श्रमिक रेल्वेगाड्या सुरू झाल्या. आता गाड्या उपलब्ध असल्यामुळे पुण्यात अडकलेल्या बहुतांश मजुरांनी कामावर पुन्हा रूजू होण्याऐवजी घरी जाणं पसंत केलं.

यामुळे लॉकडाऊनपूर्वी 6 हजार 500 इतकी असलेली मजूर-संख्या कमालीची घसरली. मजुरांची संख्या कमी होत-होत सगळे मिळून फक्त 800 मजूर उपलब्ध अशीही एक वेळ जून-जुलै महिन्यात ओढवली होती.

पण नंतर परिस्थिती बदलण्यास सुरुवात झाली. ऑगस्टनंतर मजूर पुन्हा कामावर परतू लागले आहेत. मात्र तरीही पूर्वीइतके मजूर कामास उपलब्ध नाहीत. सध्या 4500 ते 5000 मजूर काम करत आहेत. पण गर्दी टाळण्यासाठी नियमावलीमुळे शिफ्टनुसार अंतर ठेवून काम करून घ्यावं लागतं. सद्यस्थितीत पुणे मेट्रो प्रकल्पाला एक ते दीड हजार मजुरांची कमतरता जाणवत असल्याचं सोनवणे यांनी सांगितलं.

'घोषणा महा-मेट्रोने केली नाही'

पुणे मेट्रोसाठी महामेट्रोची स्थापना झाल्यानंतर पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट मार्गासाठी 2021 तर वनाज ते रामवाडी मार्गासाठी 2020 ची डेडलाईन ठरवण्यात आली होती. पण अद्याप कोणत्याच मार्गावर प्राधान्यक्रमाचा मार्गही सुरू झाला नाही.

मेट्रो सुरू करण्याबाबत आधीच्या तसंच सध्याच्या सरकारमधील मंत्री आणि राजकीय नेत्यांकडून वारंवार विविध घोषणा केल्या गेल्या. पुणे मेट्रोसाठी पिंपरी-चिंचवड ते फुगेवाडी आणि वनाज ते गरवारे महाविद्यालय असा प्राधान्यक्रमातील मार्ग ठरवून डिसेंबर 2019 पर्यंत मेट्रो धावेल, अशी घोषणा करण्यात आली. त्यानंतर कधी मार्च 2020, एप्रिल 2020 तर कधी जून 2020 पर्यंत मेट्रो धावेल, अशीही घोषणा झाली.

पण प्रत्यक्षात डिसेंबर 2020 मध्ये 45 टक्केच काम पूर्ण झालं आहे. याविषयी बोलताना सोनवणे म्हणतात, "मेट्रो सुरू करताना नेहमी प्राथमिक लक्ष्य निर्धारित केलं जातं. त्यानुसार डेडलाईन दिली तरी मेट्रोची निविदा कधी निघते, त्यावेळी किती जमीन उपलब्ध आहे, भू-संपादन करण्यात येणाऱ्या अडचणी, याचिका आणि इतर बाबी लक्षात घेतल्या जातात. सगळ्या बाजू लक्षात घेऊन याबाबत लवचिकता बाळगली जाते. त्यामुळे तारीख पुढे-मागे होऊ शकते. मात्र आतापासून कोणत्याही स्थितीत दोन्ही मार्ग लवकरात लवकर सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे."

मेट्रो सुरू करण्याच्या घोषणांबाबत बोलताना सोनवणे म्हणाले, "या घोषणा महा-मेट्रोने कधीच केल्या नाहीत. मंत्री काम पूर्ण करण्याची सूचना देतात. लक्ष्य देतात. पण प्रत्यक्ष काम किती वेगाने सुरू आहे, हे महत्त्वाचं असतं. या वर्षातली परिस्थिती पूर्णपणे वेगळी होती. लॉकडाऊनचा फटका कामाला बसला. अडचणींवर मात करून काम पुढे नेण्यात आलं. सध्या उपलब्ध मनुष्यबळावर कामाने वेग घेतला आहे."

"प्रकल्पात कामगार पुतळा, सिव्हिल कोर्ट परिसरात भू-संपादनाचं कामही काही प्रमाणात बाकी आहे. काही ठिकाणी रस्ते रुंदीकरण होणं आवश्यक आहे. तर काही ठिकाणी नागरिकांचा विरोधही सहन करावा लागत आहे. या सर्व गोष्टींवर उपाययोजना करून लवकरात लवकर सर्व समस्या सोडवण्यात येतील, सर्व बाबींचा विचार करता पुढच्या वर्षी म्हणजेच 2021 मध्ये डिसेंबरपर्यंत दोन्ही प्राधान्यक्रमातील मार्ग सुरू होतील, असा विश्वास वाटतो. यासाठी महामेट्रोने संत तुकाराम नगर ते दापोडी आणि वनाज ते गरवारे महाविद्यालय टप्प्यावर लक्ष केंद्रीत केलं आहे," असं सोनवणे यांनी सांगितलं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)