You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'उद्धव ठाकरे आगामी काळात देशाचे पंतप्रधान होणार' - संजय राऊत #5मोठ्याबातम्या
आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाईट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.
1. 'आगामी काळात उद्धव ठाकरे देशाचे पंतप्रधान होणार' - संजय राऊत
आगामी काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देशाचे पंतप्रधान होतील असे भाकीत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी वर्तवले आहे. तसंच कोणत्याही गोष्टीवर टीका करण्यात भाजपचे काही लोक आघाडीवर असून त्यांना भारतरत्न पुरस्कार द्यायला हवा असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला. टिव्ही 9 ने हे वृत्त दिले आहे.
संजय राऊत पत्रकार परिषदेत बोलत होते. आमचा एकही आमदार फुटणार नाही असा विश्वास विरोधी पक्षाला असला तरी राज्यात तीन पक्ष एकत्र आल्याने येत्या काळात एकाच पक्षातून पक्षांतर होणार असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला.
भविष्यात ज्या घडामोडी घडतील त्याच्या भूकंपाचे केंद्रबिंदू शिवसेना भवन असेल असा गौप्यस्फोटही राऊतांनी केला.
उत्तर महाराष्ट्र, नाशिक आणि धुळ्यातील अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. नाशिक कायम शिवसेनेचा बालेकिल्ला असून महानगरपालिकेवर शिवसेनेचा झेंडा फडकवायचा आहे असंही यावेळी राऊत म्हणाले.
2. मी मुख्यमंत्री असतो तर बच्चू कडू यांचा राजीनामा मागितला असता - प्रकाश आंबेडकर
दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यमंत्री बच्चू कडू महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या बाईक रॅलीत सहभागी होत दिल्लीत गेले आहेत.
पण सरकारमधील मंत्र्यांना आंदोलनात सहभागी होण्याचा अधिकार नाही अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. लोकमतने हे वृत्त दिले आहे.
ते म्हणाले, "मंत्रिमंडळातील मंत्र्यांना आंदोलन करण्याचा अधिकर नसून तुम्ही एकतर मंत्री राहा नाहीतर आंदोलन करा. मी मुख्यमंत्री असतो तर राजीनामा मागितला असता."
राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या आंदोलनाला जाहीर केलेला पाठिंबा फसवा असल्याचा आरोपही प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी राज्य सरकारने पंजाब सरकारप्रमाणे कृषी कायद्यांविरोधात निर्णय का घेतला नाही? असा प्रश्न आंबेडकर यांनी उपस्थित केला. ठाकरे सरकारने अधिवेशनाचे दोन दिवस कांजूरमार्ग आणि कंगनावर घालवले अशी टीकाही त्यांनी केली.
3. RT-PCR टेस्ट कोरोनाचा नवीन प्रकार झाल्याचे ओळखण्यात सक्षम आहे का?
ब्रिटन येथे कोरोना व्हायरसचा नवीन प्रकार स्ट्रेन समोर आला आहे. पण कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे निष्पन्न करणारी RT-PCR टेस्ट कोरोनाच्या नवीन प्रकाराची लागण झाल्याचे सांगण्यासाठी सक्षम आहे का? असा प्रश्न अन्न व औषध संघटनेने उपस्थित केला आहे. एनडीटीव्हीने हे वृत्त दिले आहे.
यासंदर्भात अन्न व औषध संघटनेने ICMR ला पत्र लिहिले आहे. कोरोनाच्या नवीन प्रकारासंदर्भात टेस्टिंग अपग्रेड करण्याची मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे.
ब्रिटनहून भारतात आलेल्या सर्व लोकांची RT-PCR टेस्ट केली जात आहे. पण ही टेस्ट कोरोना स्ट्रेनची लागण झाल्याचा रिपोर्ट देण्यासाठी सक्षम आहे का? याबाबत आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
5. पुण्यात स्पर्धा परीक्षा विद्यार्थी विरुद्ध स्थानिक रहिवासी असा वाद का होतोय?
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासिका विरुद्ध स्थानिक असा वाद रंगला आहे. कोरोनाच्या नावाखाली रहिवासी अभ्यासिकांबाबत तक्रार करत असल्याचे समोर आले आहे. सकाळने हे वृत्त दिले आहे.
"तुम्हाला अभ्यासिका सुरू करण्यासाठी परवानगी कोणी दिली? तुम्ही अभ्यासिका बंद करा नाहीतर मी पोलीस घेऊन येईल, मी वकील आहे," अशा प्रकारच्या धमक्या दिल्या जात असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.
प्रशासनाने या समस्येची दखल घेत वेळीच रोखले पाहिजे अशी मागणी किरण डोके या विद्यार्थ्याने केली आहे.
"अभ्यासिकेला किंवा विद्यार्थ्यांना आमचा विरोध नाही. पण विद्यार्थ्यांच्या बेशिस्तपणावर आमचा आक्षेप आहे. अनेक विद्यार्थी सोसायटीसमोर घोळका करून उभे असतात. तसंच काही विद्यार्थी अश्लील चाळे करतात. हे थांबले पाहिजे." असे मत स्थानिक रहिवासी वकील अभिषेक उपाध्ये यांनी व्यक्त केले आहे.
5. रोहित शर्मा 14 दिवसांसाठी सिडनीत क्वारंटाइन, कसोटी सामना खेळणार का?
सिडनीमध्ये गेल्या काही दिवसांत कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे तिसरा कसोटी सामना सिडनीला होणार की नाही याबाबत साशंकता आहे. भारताचा फलंदाज रोहित शर्मा सिडनीमध्येच असून 14 दिवसांसाठी क्वारंटाइन करण्यात आले आहे. महाराष्ट्र टाईम्सने हे वृत्त दिले आहे.
रोहित शर्मा सिडनीमध्ये असून एका हॉटेलमध्ये क्वारंटाइन आहे. तसंच सध्या तो सुरक्षित आहे अशी माहिती बीसीसीआयने दिली आहे. बीसीसीआयच्या अधिकऱ्यांनी एएनआयला दिलेल्या मुलाखतीत ही माहिती दिली.
"भारतीय संघ व्यवस्थापन रोहितच्या सतत संपर्कात आहे. तो हॉटेल रुममध्ये एकटाच क्वारंटाइन असून वाईट परिस्थिती निर्माण झाल्यास रोहितला सिडनीमधून बाहेर काढण्यासाठीही आम्ही प्रयत्न करू." असंही अधिकऱ्यांनी स्पष्ट केले.
वेळापत्रकानुसार तिसरा कसोटी सामना सिडनी येथे 7 जानेवारीपासून सुरू होणार आहे तर चौथा कसोटी सामना 15 जानेवारीपासून ब्रिस्बेन येथे होणार आहे. रोहित शर्मा तिसऱ्या कसोटी सामन्यापासून खेळणार आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)