सोनू सूद: कोरोना काळात मजुरांना मदत करणाऱ्या अभिनेत्याचं तेलंगणामध्ये मंदिर

फोटो स्रोत, ANI
तेलंगणामधील सिद्दीपेट येथिल दुब्बा तांडा गावातल्या लोकांनी अभिनेता सोनू सूदचं मंदिर बांधलं आहे. कोरोनाच्या काळात सोनू सूदने केलेल्या सामाजिक कार्याबद्दल हे मंदिर बांधल्याचं स्थानिक सांगतात.
एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना स्थानिक नागरिक सांगतात, "त्यांनी कोरोना साथीच्या वेळेस अनेक लोकांना मदत केली. त्यांचं मंदिर आम्ही बांधलं याचा अभिमान वाटतो."
देशभरात लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर अनेकांनी गरजूंना विविध मार्गांनी मदतीचा हात पुढे केला. पण सर्वाधिक चर्चा झाली ती अभिनेता सोनू सूद यानं केलेल्या मदतकार्याची.
सिनेमातला व्हिलन ते रिअल लाईफमधला हिरो या शब्दात सोनूचं कौतुक झालं. सरकारकडून वाहतुकीसाठी रेल्वे सुरू झाली नव्हती, तेव्हाही सोनू सूद मजुरांना घरी पाठवण्यासाठी बसचं नियोजन करत होता.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
सोनूचे 'फिल्मी' करिअर
सोनू सूदने हिंदी, इंग्रजी, तेलगू, तामिळ, कन्नड, पंजाबी आणि चीनी सिनोमात काम केलं आहे. 1999 साली 'कल्लाझागर' या तामिळ सिनेमापासून त्याने आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली.
सोनू सूद मुळचा पंजाबचा असून गेल्या काही वर्षांपासून तो मुंबईत राहतोय. त्याच्या वडिलांचा व्यवसाय असून आई प्राध्यापिका होती. सोनूने नागपूरच्या इंजिनिअरींग महाविद्यालयातून पदवीचं शिक्षण पूर्ण केलं. त्यांनतर सोनूने मॉडेलिंग आणि सिनेमात काम करण्यासाठी मुंबई गाठली.

फोटो स्रोत, @SONUSOOD
मुंबईत काम मिळवण्यासाठी संघर्ष सुरू झाला. त्यावेळी नोकरी करून सोनू सिनेमात संधी मिळवण्यासाठी धडपड करत होता. पण पहिली संधी सोनूला एका जाहिरातीसाठी दिल्लीत मिळाली. त्यानंतर त्याने तामिळ सिनेमात एक भूमिका केली.
त्यानंतर त्याने तामिळ, तेलगू, कन्नड या सिनेमांमध्ये अभिनयाला सुरुवात केली. त्यासाठी या भाषा त्याला शिकाव्या लागल्या. 2002 साली 'शहिद-ए-आझम' या हिंदी सिनेमातून सोनूने बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर युवा,आशिक बनाया आपने, शूट आऊट अॅट वडाला, जोधा अकबर, दबंग, हॅप्पी न्यू ईयर, पलटन, आर राजकुमार अशा काही हिंदी सिनेमांमध्ये काम केलं.
चिनी सिनेमात काम
सोनू सूदने चिनी भाषेतल्या सिनेमातही काम केलं आहे. 2017 मध्ये 'कुंग फू योगा' या सिनेमात सोनूने अभिनय केला आहे. यासाठी जॅकी चॅनच्या मुलासोबत त्याने चीनमध्ये प्रशिक्षण घेतलं होतं. या सिनेमासाठी सोनूसोबत जॅकी चॅन यांनी भारतातही प्रमोशन केलं होतं.
1996 मध्ये सोनूने त्याची मैत्रीण सोनालीशी लग्न केलं. नागपूरमध्ये शिकत असताना सोनू आणि सोनालीची भेट झाली. त्यांना इशांत आणि अयान अशी दोन मुलं आहेत.
राजकीय वाद
प्रतिकूल परिस्थितीमध्येही शेकडो मजुरांना घरी पोहचवल्यामुळे सोनू सूदच्या मदतकार्यामागे राजकीय हेतू असल्याचा आरोप करण्यात येत होता.
सोनू सूद निवडणुकीत भाजपचा स्टार प्रचारक म्हणून दिसेल असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लगावला होता.
'सामना' या शिवसेनेच्या मुखपत्रातून संजय राऊत यांनी सोनूच्या मदतकार्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. सोनू सूद हा चांगला अभिनेता आहे. तो जे काम करतोय, ते चांगलंच आहे. पण त्यामागे कोणी 'राजकीय दिग्दर्शक' असण्याचीही शक्यता असल्याचं राऊत यांनी म्हटलं. यावरून राजकीय वादाला सुरुवात झालीय.

फोटो स्रोत, @SonuSood
संजय राऊत यांनी सोनू सूदच्या कामाविषयी घेतलेल्या आक्षेपांबद्दल काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी पलटवार केला होता. मोठ्या मनानं त्याचं कौतुक करण्यापेक्षा शिवसेना त्याच्यावर टीका करत आहे. स्थलांतरित मजुरांच्या मद्द्यावर आपलं अपयश लपवण्यासाठी इतक्या खालच्या पातळीवर जाण्याची गरज नाही, अशी टीका निरूपम यांनी ट्विटवरून केली होती.
तर मनेसेनेही या वादात उडी घेतलीय. तुम्ही अग्रलेख लिहिण्यापलिकडे काय केलंत? असा प्रश्न मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी विचारला आहे.
विधान परिषदेतले विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी शिवसेनेची टीका म्हणजे चर्चेत राहण्याचा प्रयत्न असं म्हटलंय.
सोनू सूदनं काही दिवसांपूर्वी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली हेती. 'सामाना'तून झालेल्या टीकेनंतर सोनूने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही भेट घेतली.

फोटो स्रोत, Aaditya Thackeray
याचा उल्लेख सोनूने आपल्या एका ट्विटमध्येही केला आहे. अनेक लोक ट्विटवर विनंती करून ट्विट डिलीट करतात. त्यामुळे अनेक लोकांचे ट्विट नकली असल्याचा अंदाज येतो, असंही सोनूने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
सोनूचे राजकीय संबंध
2018 मध्ये तत्कालीन वनमंत्री आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवर याच्या एका कार्यक्रमाला सोनूने हजेरी लावली होती. चंद्रपूर येथे पालकमंत्री चषक सामन्यांच्या बक्षीस वितरण समारंभासाठी सोनू सूद उपस्थित होता. त्याच्या हस्ते विजेत्यांना बक्षीस वाटप करण्यात आलं होतं.
पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांचीसुद्धा सोनूनं काही दिवसांपूर्वी भेट घेतली होती. त्याचे फोटो त्यानं ट्विट केले होते.
कोब्रा पोस्टच्या स्टिंगमध्ये सोनू सूदचं नाव
2019च्या लोकसभा निवडणुकीवेळी कोब्रा पोस्टनं काही सेलेब्रिटींना 'एक्स्पोज्ड' केल्याचा दावा केला होता. त्यात सोनू सूदही होता. त्यावेळी सोनू सूद मोदी सरकारच्या 'HumFitTohIndiaFit' या अभियानाचा सदिच्छादूतही होता.
त्यावेळी सोनू सूदनं त्याच्या सोशल मीडिया हँडल्सवरून भाजपचा फायदा होईल, असा मजकूर टाकण्याची तयारी दर्शवली होती, असं कोब्रा पोस्टच्या त्या वृत्तात म्हटलं होतं.त्यावेळी सोनू सूदने एक स्पष्टीकरण दिलं होतं की "अशा प्रकारच्या ऑफर वेगवेगळ्या ब्रँड्सकडून आम्हाला येतच असतात. आणि जे दाखवण्यात आलं आहे, ते एडिटिंगमध्ये काटछाट करून चुकीचा अर्थ काढण्याचा प्रयत्न केला जातोय.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा..)








