लग्नाचं वचन देऊन सेक्स करणे म्हणजे नेहमीच बलात्कार नसतो - दिल्ली उच्च न्यायालय

लग्नाचं वचन दिल्यानंतर एखादी स्त्री दीर्घ काळापासून स्वतःच्या मर्जीने शरीर संबंध ठेवण्यास सहमत असेल तर त्याला बलात्कार म्हणता येणार नाही, असं दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटलं आहे. टाईम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्राने ही बातमी दिली आहे.

अनेक महिन्यांपासून एका पुरूषासोबत राहणाऱ्या महिलेने त्याच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी झाली.

मात्र, दिल्ली उच्च न्यायालयाने बलात्काराचा गुन्हा रद्दबातल ठरवताना म्हटलं, "दीर्घ आणि अनिश्चितकालीन शरीर संबंध असतील तर लग्नाच्या वचनाला संभोगासाठी दिलेलं आमिष म्हणता येणार नाही."

या प्रकरणात निकाल सुनावताना एखाद्या पुरुषाने एखाद्या स्त्रिला लग्नाचं वचन दिलं आणि त्यानंतर एका क्षणासाठी दोघांमध्ये शरीर संबंध स्थापित झाले तर अशावेळीच लग्नाच्या वचनाला शरीर संबंध ठेवण्यासाठी दिलेलं आमिष म्हणता येईल, असं न्या. विभू बाखरू यांनी म्हटलं आहे.

ते म्हणाले, "काही प्रकरणांमध्ये संभोगासाठी लग्नाचं वचन दिलं जाऊ शकतं. त्यावेळी आमिष देणाऱ्याला शब्द पाळण्याची इच्छा नसते. संभोगाला नकार देणारी स्त्री अशा प्रकारचं आमिष दिल्यावर कदाचित एका क्षण त्या आमिषाला बळी पडू शकते. मात्र, असं वारंवार घडत नाही."

संभोगासाठी राजी करण्याच्या इराद्याने लग्नाचं खोटं वचन देणं महिलेच्या सहमतीचा दुरुपयोग आहे आणि केवळ अशीच प्रकरणं बलात्काराविषयीच्या भारतीय दंड संहितेच्या कलम 375 अंतर्गत चालवता येऊ शकतात, असंही न्यायालयाने म्हटलं.

मात्र, अशा प्रकारचे जवळचे संबंध ज्यात संभोगही आलाच आणि ते दिर्घ काळापासून असतील तर यात महिलेची मर्जी नव्हती, असं मानता येणार नाही.

या प्रकरणात कनिष्ठ न्यायालयाने संबंधित व्यक्तीची बलात्काराच्या आरोपातून मुक्तता केली होती. दिल्ली उच्च न्यायालयानेही हा निकाल कायम ठेवला आहे.

आरोपीने लग्नाचं वचन देऊन आपल्याशी शरीर संबंध ठेवले आणि नंतर एका दुसऱ्या स्त्रीसाठी आपल्याला सोडून दिलं, असा आरोप या महिलेने केला होता.

मात्र, या प्रकरणातील अशीलाचं आरोपीवर खरंच प्रेम होतं आणि म्हणूनच तिने स्वतःच्या मर्जीने त्याच्याशी शरीर संबंध ठेवले, हे स्पष्ट असल्याचं न्यायालयाने म्हटलं.

या प्रकरणात शरीर संबंध ठेवण्यासाठी लग्नाचं वचन देऊन तिची सहमती मिळवण्यात आली नव्हती. उलट दोघं एकत्र आल्यानंतर बरेच दिवसांनंतर लग्नाविषयी बोलणी झाल्याचं कनिष्ठ न्यायालयाने आपल्या निकालात म्हटलं होतं.

तक्रारीत महिलेने स्वतःच आरोपी पुरुषाबरोबर आपले शरीर संबंध असल्याचं आणि त्यानंतर तीन-चार महिन्यांनी त्याने लग्नाचं वचन दिल्याचं म्हटलेलं आहे आणि आपण स्वतःच त्याच्यासोबत पळून गेल्याचंही तिने मान्य केल्याचं न्यायालयाने म्हटलंय.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)