ममता बॅनर्जी : RSSच्या हिंदू धर्मावर आमचा विश्वास नाही - #5मोठ्याबातम्या

विविध वर्तमानपत्रं, वेबसाईट्स यांचा घेतलेला आढावा.

1. आमचा RSSच्या हिंदू धर्मावर विश्वास नाही- ममता बॅनर्जी

पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकांच्या अनेक महिने आधीच तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्ये आरोपांचं युद्ध रंगलं आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आता आरएसएसवरही टीका केली आहे.

आमचा आरएससच्या हिंदू धर्मावर विश्वास नाही, असं विधान त्यांनी केलं आहे. ही बातमी टीव्ही9 मराठीने दिली आहे. कोचनेर येथे झालेल्या कार्यक्रमात ममता बॅनर्जी म्हणाल्या, "आम्ही आरएसएसच्या हिंदू धर्मावर विश्वास ठेवत नाही आणि आम्ही कोणासमोरही झुकणार नाही."

त्यांच्या या विधानावर भाजपनेही प्रतिक्रिया दिली आहे. पश्चिम बंगालमधील निवडणुका भीती आणि दहशतीच्या वातावरणात होत असून इथं राष्ट्रपती राजवट लागू करावी. त्यानंतर निवडणूक घ्यावी असं मत भाजपचे नेते कैलाश विजयवर्गीय यांनी व्यक्त केलं आहे.

2. राम मंदिरासाठी 15 जानेवारीपासून वर्गणी

अयोध्येमध्ये 15 जानेवारीपासून वर्गणी गोळा केली जाणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. विश्व हिंदू परिषदेचे उपाध्यक्ष आणि रामजन्मभूमी तीर्थस्थानचे सचिव चंपतराय यांनी बुधवारी ही माहिती दिली. ही बातमी लोकमतने प्रसिद्ध केली आहे.

राममंदिरासाठी देशातील सर्व रामभक्तांची मदत घेतली जाणार आहे. त्यासाठी विहिंपचे कार्यकर्ते घराघरात जाणार आहेत. 15 जानेवारीपासून विहिंप कार्यकर्ते घराघरात जाऊन वर्गणी गोळा करतील. 4 लाख गावांमधील 11 कोटी कुटुंबांपर्यंत पोहोचण्याचा संकल्प असल्याचं चंपतराय यंनी सांगितलं. ही वर्गणी ऐच्छिक असून 10, 100, 100 रुपयांची कूपन्स तयार केल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

3. शिवाजी महाराज आणि रामदास स्वामींचं शिल्प हटवा- कोकाटे

शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांचं साताऱ्यातील शिल्प हटवावं अशी मागणी श्रीमंत कोकाटे यांनी साताऱ्यात पत्रकार परिषद घेऊन केली आहे. सकाळने ही बातमी प्रसिद्ध केली आहे.

याबाबतचे एक निवेदन जिल्हाधिकारी, नगरपालिका आणि बांधकाम विभागालाही देण्यात आलं आहे. शिल्प बसवण्यासाठी पालिकेची परवानगी नव्हती आणि अनधिकृतपणे ते उभारण्यात आलं आहे, असा आरोप कोकाटे यांनी केला आहे.

'भाजप इतिहासाचं विद्रुपीकरण करत आहे. या शिल्पाच्या बाबतीत सर्व पुरोगामी संघटना एकत्रित येतील.' असं पार्थ पोळके यावेळी म्हणाले आहेत.

4. सैन्याचा गणवेश बदलण्याच्या निर्णयावर राहुल गांधी म्हणाले...

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी बुधवारी संरक्षण विषयक समितीच्या बैठकीतील चर्चेतून बाहेर जाण्याचा निर्णय घेतला. सैन्याचा गणवेश कसा असावा याबाबत बैठकीतील खासदार निर्णय घेऊ शकत नाहीत ते फक्त लष्करप्रमुखच ठरवू शकतात, असं मत त्यांनी मांडलं. यावेळेस समितीचे अध्यक्ष ज्युएल ओराम आणि चिफ ऑफ डिफेन्स बिपिन रावतही उपस्थित होते.

संसदीय समितीने सैन्याच्या गणवेशावर वेळ घालवला, सैन्य अधिक कसं सुसज्ज होईल यावर चर्चा होण्याची गरज होती अशी टीका त्यांनी मीटिंगबाहेर पडल्यावर केली. ही बातमी लोकमतने दिली आहे.

5. कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना मारहाण

औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना पुण्यात मारहाण झाल्याची माहिती त्यांचे वकील झहीरखान पठाण यांनी बुधवारी दिली. ही बातमी सकाळने प्रसिद्ध केली आहे.

हर्षवर्धन यांच्याबरोबर त्यांच्या सहकारी ईशा झा यांनाही मारहाण झाल्याचं या बातमीत म्हटलं आहे. सोमवारी औंध मार्गावर असताना हर्षवर्धन जाधव, ईशा झा यांची गाडी अडवण्यात आली आणि त्यांना अमन चढ्ढा, करण चढ्ढा यांच्याबरोबर एका नगरसेवकाने मारहाण केली तसंच ईशा यांचा विनयभंग केल्याचे पठाण यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.' रोज रात्री 8 वाजता बीबीसी मराठीचे कोरोना पॉडकास्ट तुम्ही फेसबुकवर पाहू शकता.)