You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
प्रफुल्ल पटेलांच्या शरद पवारांवरील लेखामुळे उद्धव ठाकरे सरकारला धोका आहे का?
"शरद पवार हे भारताचे पंतप्रधान होण्याची शक्यता अनेकवेळा निर्माण झाली होती. पण काँग्रेसने शरद पवार यांना पंतप्रधानपदापासून दूर ठेवण्याचं काम केलं. शरद पवारांविरुद्धची ही षड्यंत्रं मी जवळून पाहिली आहेत," असं खासदार प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं आहे.
शरद पवार यांच्या 80व्या वाढदिवसानिमित्त देशोन्नती, हितवाद अशा विविध वृत्तपत्रांसाठी प्रफुल्ल पटेल यांनी एक लेख लिहिला. या लेखात त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. या लेखात पटेल यांनी काँग्रेस पक्षातील 'दरबार गटा'तील नेत्यांवर टीका केली.
प्रफुल्ल पटेल नेमकं काय म्हणाले?
आपल्या लेखात प्रफुल्ल पटेल म्हणतात, "शरद पवार दिल्लीत गेले, त्यांनी केंद्रात राष्ट्रीय राजकारणाची जबाबदारी स्वीकारली. त्यांनी काँग्रेसमध्ये पहिल्या फळीतील नेता अशी स्वतःची ओळख अत्यंत कमी वेळेत बनवली. पंतप्रधानपदासाठी शरद पवार यांचं नाव खात्रीशीरपणे पुढे येत होतं. पण दिल्लीतील 'दरबार पॉलिटिक्स'ने त्यांच्या कामात खोडा घातला. हे त्यांचं वैयक्तिक नुकसान तर होतंच, पण त्यासोबतच पक्षाचं आणि देशाचंही मोठं नुकसान झालं."
ते पुढे लिहितात, "1991 साली लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राजीव गांधी यांची हत्या करण्यात आली. त्यावेळी शरद पवारांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जबाबदारी स्वीकारावी, असा काही नेत्यांचा सूर होता. मात्र, दिल्लीतील 'दरबार गटा'तील नेते मध्ये आले. त्यांनी पवार यांना अध्यक्षपद देण्यास विरोध केला. पी. व्ही. नरसिंह राव यांना अध्यक्षपद स्वीकारण्यासाठी तयार करण्यात आलं."
"सरकार बनवताना शरद पवार यांच्यासारख्या तरूण नेत्याला पंतप्रधानपद द्यावं, अशीही चर्चा होती. पण त्यावेळीही दरबारी राजकारण्यांनी हे पद त्यांना मिळू दिलं नाही. पी. व्ही. नरसिंह राव यांना पंतप्रधानपद देण्यात आलं, तर शरद पवार संरक्षण मंत्री बनले."
"तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव हे शरद पवारांकडे वैरभावानेच पाहत असत. शरद पवार त्यांच्या अध्यक्षपद आणि पंतप्रधानपदाचे प्रतिस्पर्धी राहिले होते. म्हणून काँग्रेस पक्षात शरद पवार यांचा प्रभाव कमी करण्यासाठी राव यांनी प्रयत्न केले. शरद पवार यांच्याविरुद्धची अशा प्रकारची अनेक षड्यंत्रे मी जवळून पाहिली आहेत. "
पटेल यांच्या मते, "1992 मुंबई दंगलीनंतर मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांना पदावरून हटवून त्यांच्या ठिकाणी पुन्हा शरद पवार यांना पाठवण्यात आलं. शरद पवार यांना पुन्हा महाराष्ट्रात पाठवून आपल्या मार्गातून बाजूला करण्याचा हा अतिशय चतुर डाव होता."
"1996 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे 145 खासदार निवडून आले. यावेळी पी. व्ही. नरसिंह राव यांना हटवावं आणि शरद पवार यांनी पंतप्रधान म्हणून नेतृत्व करावं, अशी मागणी एच. डी. दैवेगौडा, लालूप्रसाद यादव, मुलायमसिंह यादव आणि डाव्या पक्षांकडून केली जात होती. पण, नरसिंह राव यांनी हे मान्य केलं नाही. त्यांनी देवेगौडा यांच्या सरकारला बाहेरून पाठिंबा देण्याचं ठरवलं."
याशिवाय काँग्रेसने शरद पवार यांचा अपमान केल्याची इतर काही उदाहरणंही प्रफुल्ल पटेल यांनी आपल्या लेखात दिली आहेत.
एकीकडे, शरद पवार यांच्या 80व्या वाढदिवसानिमित्त त्यांचं कोडकौतुक करणं सुरू असताना पटेल यांनी थेट मित्रपक्ष काँग्रेसवरच हल्लाबोल केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजल्याचं पाहायला मिळालं. पवार यांच्या वाढदिवशी या लेखाचीच चर्चा राजकीय वर्तुळात होती.
काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी राहुल गांधी यांच्यात सातत्य नसल्याच्या वक्तव्याने वाद निर्माण झाला होता. पाठोपाठ, आता पटेल यांच्या लेखाने लक्ष वेधून घेतलं आहे. पटेल यांच्या लेखामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तणाव निर्माण होईल का, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
प्रफुल्ल पटेल यांच्या लेखावर काँग्रेसची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा बीबीसीने प्रयत्न केला. पक्ष प्रवक्ते सचिन सावंत यांनी या विषयावर बोलण्यास नकार दिला. पटेल यांचा लेख अद्याप वाचलेला नाही, वाचून प्रतिक्रिया कळवतो, असं सावंत म्हणाले.
'पटेल यांच्या लेखाचं टायमिंग चुकलं'
"सध्या देशातील परिस्थिती वेगळी असून आता काँग्रेसमुळे पंतप्रधानपद मिळालं नाही वगैरे गोष्टींचा उल्लेख करण्याची गरज नव्हती, त्यामुळे पटेल यांच्या लेखाचं टायमिंग चुकलं," असं ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक विजय चोरमारे यांना वाटतं.
चोरमारे यांच्या मते, "देशातील आजची परिस्थिती वेगळी आहे. काँग्रेस तेव्हासारखी मजबूत राहिलेली नाही. विरोधी आघाडी विस्कळीत झाली आहे. अशा स्थितीत विरोधी पक्षांना एकत्र आणून राष्ट्रीय मुद्द्यांवर एक राष्ट्रीय आघाडी उभी करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. हे करण्याची क्षमता पवारांकडे आहे. त्यामुळे काँग्रेसला तसंच इतर विरोधी पक्षांनाही पवारांची गरज आहे."
"देशातील शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्यासह राहुल गांधी आणि इतर नेते राष्ट्रपतींना भेटण्यासाठी गेले होते. पवार UPA चं नेतृत्व करू शकतात, अशी चर्चाही सुरू होती. या अनुषंगाने सगळे विरोधी पक्ष एकत्रित येण्याची शक्यता निर्माण झालेली असताना एका पक्षाच्या नेत्याने अशा प्रकारच्या भूमिका मांडल्यास त्यांच्यात राजकीय कडवटपणा येऊ शकतो. मनात किल्मिष निर्माण होऊ शकतो. परिणामी त्यांच्यात तणाव निर्माण होऊ शकतो. पटेल यांचा दृष्टीकोन त्यांच्यानुसार योग्य जरी असला तरी सध्याच्या राजकीय वातावरणात त्याचं टायमिंग चुकलं," असं चोरमारे यांना वाटतं.
दोन्ही पक्षांना सत्तेची गरज
सध्या महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार आहे. शिवसेनेच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत दोन नंबरची वाटेकरी तर काँग्रेस तिसऱ्या क्रमांकाची वाटेकरी म्हणून ओळखली जाते.
तीन पक्षांचं हे सरकार टिकणार नाही, अशी टीका वारंवार केली जाते. सत्ताधारी पक्षातील नेत्यांकडून अशी वक्तव्यं आल्यास या चर्चांना आणखी उधाण येतं.
ज्येष्ठ राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांच्या मते, "पटेल यांचा लेख काय किंवा पवारांचं आधीचं वक्तव्यं काय, सध्याच्या स्थितीत दोन्ही पक्षांना सत्तेची गरज आहे. त्यामुळे अशा गोष्टींकडे दुर्लक्ष केलं जातं. फार महत्त्व देण्यात येत नाही."
आपला मुद्दा पटवून देण्यासाठी देसाई यांनी काही दिवसांपूर्वीची आठवण सांगितली.
ते सांगतात, "कोरोना संकटाच्या सुरुवातीला महाराष्ट्रातील स्थिती बिकट होती. त्यावेळी हे सरकार आमचं नाही, सहकारी पक्षाचं-शिवसेनेचं सरकार आहे, असं राहुल गांधी म्हणाले होते. ते सरकारमध्ये सहभागी असताना त्यांनी यश-अपयश दोन्ही स्वीकारणं अपेक्षित आहे, त्यामुळे या वक्तव्यानंतर कटुता निर्माण झाली, पण काही दिवस फक्त चर्चा होऊन विषय मागे पडला.
"नुकतंच शरद पवारांचं राहुल गांधी यांच्या सातत्याबाबत वक्तव्य आलं. लगेच बाळासाहेब थोरात, ठाकूर यांच्याकडून त्यावर प्रतिक्रिया आली. नंतर तोही विषय मागे पडला. म्हणून एखाद्या लेखामुळे लगेच दोन राजकीय पक्षात तणाव निर्माण होईल, त्यातून वेगळं काहीतरी घडेल, अशी शक्यता सध्या तरी नाही," असं देसाई यांनी म्हटलं.
कुरघोडीचं राजकारण
काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी लोकमतला एक मुलाखत दिली होती. यामध्ये एका प्रश्नाचं उत्तर देताना राहुल गांधी यांच्यात सातत्य कमी आहे, असं वक्तव्य पवार यांनी केलं होतं. त्यावरून वाद निर्माण झाला होता. यशोमती ठाकूर यांनी तर थेट स्थिर सरकार हवं असल्यास नेत्यांनी अशी वक्तव्यं करू नयेत, असा इशारा दिला होता.
एक-दोन दिवस याची चर्चा झाली. नंतर हा वाद मागे पडला. त्यामुळे पटेल यांच्या लेखाची चर्चा जरी होत असली तरी या एका लेखाने फारसा काही फरक पडणार नाही, असं तज्ज्ञांना वाटतं.
राजकीय विश्लेषक प्रताप आसबे यांच्या मते, "या एका लेखाने टोकाचं काही घडेल, अशी शक्यता नाही. पटेल यांचा लेख चुकीचा आहे, वगैरे स्पष्टीकरण काँग्रेसकडून येऊ शकतात. पण त्यांचा दोन्ही पक्षातील संबंधांवर तसंच महाराष्ट्रातील महाविकास आघाडीवर कोणताही परिणाम होणार नाही."
आसबे पुढे सांगतात, "पटेल यांच्या लेखात काही मुद्दे हे वस्तुस्थितीला धरून नक्कीच आहेत. शरद पवारांचं महत्त्व कमी करण्याचे प्रयत्न काँग्रेसकडून झाले होते, हे सर्वांना माहीत आहे. याबाबत बऱ्याच ठिकाणी त्याबद्दल लिहिलं गेलं आहे."
"पटेल यांच्या लेखानंतर असं नाही, तसं होतं, वगैरे सारवासारव काँग्रेसकडून केली जाईल. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही वेगळे पक्ष आहेत. वेगळे पक्ष म्हटल्यावर थोड्याफार कुरबुरी, कुरघोडी होतच असतात, हा राजकारणाचाच भाग असतो. त्यामुळे यात विशेष असं काहीच नाही," असं आसबे यांना वाटतं.
'हे पटेलांचं वैयक्तिक मत'
'24, अकबर रोड : द शॉर्ट हिस्टरी ऑफ द पीपल बिहाईंड द फॉल अँड राईज ऑफ द काँग्रेस' नावाचं एक पुस्तक आहे. या पुस्तकात नव्वदच्या दशकात घडलेल्या राजकीय घडामोडी, तसंच पी. व्ही. नरसिंह राव यांना पंतप्रधानपद मिळताना घडलेलं नाट्य यांच्याबाबत सविस्तरपणे विश्लेषण आहे. ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक रशीद किडवई यांनी हे पुस्तक लिहिलं आहे.
बीबीसीने किडवई यांच्याशीही प्रफुल्ल पटेल यांच्या लेखाबाबत चर्चा केली. "हा लेख तथ्याला धरून नाही. पटेल यांनी भावनेच्या भरात हा लेख लिहिलेला असू शकतो," अशी प्रतिक्रिया किडवई यांनी दिली.
"राहता राहिला प्रश्न दोन पक्षांमध्ये वाद निर्माण होण्याचा. तर अशी वक्तव्ये राजकारण्यांकडून येत असतात. अखेर, फारच बिकट परिस्थिती ओढवल्यास पटेल यांचं वैयक्तिक मत म्हणून वाद मिटवला जाईल. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता या लेखाने दोन पक्षांच्या संबंधांवर फारसा काही परिणाम होणार नाही." असं किडवई म्हणाले.
चोरमारे यांनाही हा लेख पटेल यांचं वैयक्तिक मत आहे, असंच वाटतं. "कोणत्याही राजकीय घटनेच्या वेगवेगळ्या बाजू असतात. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने त्याचं विश्लेषण करत असतो. पवार यांच्या काँग्रेसमधील वाटचालीबाबत इतरांचं वेगळं मत असू शकतं, पंतप्रधानपदासाठी खासदारांचं पाठबळ मिळवण्यात पवार कमी पडले असंही काही जण म्हणू शकतात," असं चोरमारे म्हणाले.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)