उद्धव ठाकरे : 'महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवर गर्दी करू नये' #5मोठ्याबातम्या

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाईट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.

1. 'महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवर गर्दी करू नये'- उद्धव ठाकरे

'कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा महापरिनिर्वाण दिनाला अनुयायांनी अभिवादनासाठी मुंबईतील चैत्यभूमीवर गर्दी करू नये,' असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. यासंदर्भातील आढावा बैठक नुकतीच पार पडली. लोकमतने हे वृत्त दिले आहे.

6 डिसेंबरला भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा 64 वा महापरिनिर्वाण दिन आहे. यानिमित्त दादर येथील चैत्यभूमीवर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने अनुयायी एकत्र येतात.

'महापरिनिर्वाण दिनाच्या अनुषंगाने दरवर्षीप्रमाणे यंदाही सर्व तयारी केली जाईल. पण परिस्थितीचे गांभीर्य ओळखून अनुयायांनी आपल्या कृतीतून विचारांची प्रगल्भता दाखवावी,' असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

महापरिनिर्वाण समन्वय समितीनेही 6 डिसेंबरला अनुयायांनी अभिवादनासाठी मुंबईत येऊ नये असे आवाहन केले आहे.

2. 'चार खासदार निवडून आणणारे लोकनेते तर पंतप्रधान मोदींना काय म्हणणार?'

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी नाव न घेता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

चार खासदार निवडून आणणाऱ्या पक्षाच्या नेत्याला लोकनेता म्हणता, मग 303 खासदार निवडून देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना काय म्हणायचे? असा टोला गोपीचंद पडळकर यांनी लगावला आहे. एबीपी माझाने हे वृत्त दिले आहे.

पुणे पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार संग्राम देशमुख यांच्या प्रचारादरम्यान गोपीचंद पडळकर माध्यमांशी बोलत होते. सांगली येथे हा मेळावा आयोजित करण्यात आला होता.

"तुम्ही मोदींवर टीका करता पण तुमच्यावर टीका केली की त्रागा का करता," अशी टीकाही गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.

पदवीधर निवडणूक टग्यांच्या सरकारविरोधातील निवडणूक आहे असं म्हणत त्यांनी ठाकरे सरकारवरही निशाणा साधला.

3.'योग्य वेळ आल्यावर मराठा आरक्षणावर बोलणार'

मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून योग्य वेळ आल्यावर भूमिका मांडेन असे सूचक विधान भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केले आहे.

यापूर्वी उदयनराजे भोसले यांनी मराठा आरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेतली जाईल असा इशाराही दिला होता. टीव्ही 9 ने हे वृत्त दिले आहे.

'योग्य वेळ आल्यानंतर सरकारच्या मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून सपाटून बोलणार आहे,' असंही उदयनराजे भोसले म्हणाले.

वेळ पडल्यास मराठा आरक्षणासाठी रथीमहारथींना साष्टांग नमस्कार घालायला तयार आहे, असेही वक्तव्य उदयनराजे भोसले यांनी नुकतेच केले होते.

गुणवत्तेनुसार आरक्षण मिळाले पाहिजे या आपल्या भूमिकेचा उदयनराजे यांनी पुनरुच्चार केला.

बांदा येथे त्यांनी मराठा समाज संघटनेचे अध्यक्ष राजाराम सावंत यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी पत्रकारांशीही अनौपचारिक गप्पा मारताना आपली भूमिका स्पष्ट केली.

4. दानवेंचा पराभव होत नाही तोपर्यंत डोक्यावरची टोपी काढणार नाही - अब्दुल सत्तार

भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांचा निवडणुकीत पराभव होत नाही तोपर्यंत डोक्यावरील टोपी काढणार नसल्याचा संकल्प शिवसेनेचे नेते आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केला आहे. सकाळने हे वृत्त दिले आहे.

'माझ्या डोक्यावरील टोपी निघाली असती पण राधाकृष्ण विखे पाटील यांनी मला रावसाहेब दानवे यांना निवडून आणण्याची जबाबदारी सोपवली होती. दानवे निवडून आले आणि माझ्या मागे लागले. त्यामुळे रावसाहेब दानवे विश्वासघातकी आहेत,' अशी टीका अब्दुल सत्तार यांनी केली आहे.

यावेळी त्यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावरही निशाणा साधला. विखे पाटील सध्या बाभळीच्या झाडाखाली आहेत आणि मी आंब्याच्या झाडाखाली असल्याचं अब्दुल सत्तार यांनी म्हटलं.

श्रीरामपूर येथे एका कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते. यावेळी भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे पाटीलही उपस्थित होते.

5. उत्तर प्रदेशात सामूहिक धर्मांतरणाविरोधात कायदा, 10 वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद

'लव्ह जिहाद' प्रकरणी कडक भूमिका घेणाऱ्या योगी सरकारने आता सामूहिक धर्मांतरणाविरोधातही कडक कायदा करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र टाईम्सने हे वृत्त दिले आहे.

उत्तर प्रदेशात यासंदर्भातील नवीन कायदा करण्यासाठी अध्यादेश काढण्यात येणार आहे. सामूहिक धर्मांतरण प्रकरणात आरोपींना 10 वर्षांच्या शिक्षेची तरतूद या मसुद्यात करण्यात आली आहे. तसेच हा गुन्हा अजामीनपात्र असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी यासंदर्भातील घोषणा केली आहे. हे विधेयक लवकरच अधिवेशनात सादर केले जाईल.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. बीबीसी मराठीच्या फेसबुक पेजवर रोज रात्री कोरोना पॉडकास्ट पाहायला विसरू नका.)