You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
बालकामगार विरोधी दिन : अमिताभ बच्चन 'या' मराठी महिलेच्या कामानं प्रभावित का झाले?
- Author, स्वाती पाटील
- Role, बीबीसी मराठी
जगभरात 12 जून हा दिवस बालकामगार विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो. यानमित्तानं गेली 27 वर्षं बालकामगारांची सुटका करून त्यांच्या शिक्षण आणि संगोपनाची जबाबदारी उचलत असलेल्या अनुराधा भोसले यांच्या कामानं अमिताभ बच्चन प्रभावित झाले आहेत.
सोनी वाहिनीवर प्रसारित होणाऱ्या 'कौन बनेगा करोडपती' या मालिकेत कोल्हापूर जिल्ह्यातील अवनी संस्थेच्या अध्यक्षा अनुराधा भोसले सहभागी झाल्या होत्या.
बालहक्क दिनानिमित्त झालेल्या 'कर्मवीर' या विशेष भागात भोसले यांच्या सामाजिक कार्यावर प्रकाश टाकण्यात आला.
'कर्मवीर' या भागात अनुराधा भोसले यांच्या बालकामगार विरोधी लढ्याबाबतची माहिती देण्यात आली. 'अवनी' आणि 'एकटी' या संस्थांच्या माध्यमातून अनुराधा भोसले यांनी वंचित घटकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले आहेत.
गेली 27 वर्षं भोसले या बालकामगारांची सुटका करून त्यांच्या शिक्षण आणि संगोपनाची जबाबदारी उचलत आहेत.
सरकारसोबत समन्वय साधून मुलांना शिक्षण देण्यापासून ते स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी सरकारी यंत्रणा सक्षम करण्यासाठी त्या प्रयत्नशील आहेत. याच अंतर्गत त्या बालगृह चालवतात.
जिथं बालकामगार, वीटभट्टी कामागारांची मुलं, कचरावेचक महिलांची मुलं अशा वंचित घटकांचे बालकल्याण अंतर्गत संगोपन करुन त्यांना स्वावलंबी करण्यासाठी त्या पुढाकार घेत आहेत.
'कौन बनेगा करोडपती' या कार्यक्रमात अनुराधा भोसले या सेलिब्रिटी म्हणून दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्यासोबत सहभागी झाल्या होत्या.
अमिताभ बच्चन यांच्यासोबत कार्यक्रमाचा 4 तासांचा वेळ हा स्वप्नवत गेल्यातं त्यांनी सांगितलं होतं.
एकीकडे बच्चन यांना भेटायचं म्हणून उत्सुकता होती तर दुसरीकडे काय बोलायचं कसं वागायचं याचं दडपण आल्याचं भोसले यांनी बीबीसी मराठीला सांगितलं होतं.
त्यांची ही मनस्थिती ओळखून चित्रीकरणापूर्वी बच्चन यांची आपली भेट घेत आत्मविश्वास वाढवला. तसंच कार्यक्रमादरम्यान आपल्या सामाजिक कार्याचं कौतुक केलं, असंही भोसले यांनी सांगितलं होतं.
या कार्यक्रमादरम्यान प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून अनुराधा यांनी 25 लाख रुपये जिंकले,तर अमिताभ बच्चन यांनी अनुराधा चालवत असलेल्या 'अवनी' या संस्थेला वैयक्तिक मदत म्हणून 11 लाख रुपये दिले.
अमिताभ यांनी 'अवनी' या संस्थेचं कौतुक करत या सामाजिक कार्याने भारावून गेल्याची भावना व्यक्त केली.
या कार्यात कोल्हापूरकरांची मदत झाली असल्यानं या कार्यक्रमाच्या माध्यमातून देश पातळीवर कोल्हापूरचे नाव पोहचवू शकलो याबाबत आनंदी असल्याचं भोसले यांनी सांगितलं होतं.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)