बराक ओबामा यांना भारतातील ‘हिंदू राष्ट्रवादाची चिंता' का वाटते?

फोटो स्रोत, AFP
- Author, सौतिक बिस्वास
- Role, बीबीसी प्रतिनिधी
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या राजकीय जीवनातल्या आठवणींचं पुस्तक मंगळावारी, 17 नोव्हेंबरला प्रसिद्ध झालं. 'अ प्रॉमिस्ड लँड' असं नाव असणाऱ्या या पुस्तकाच्या दोन भागांतल्या पहिल्या भागात त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविषयी काही निरीक्षणं नोंदवली आहेत. ओबामांनी केलेल्या काही खुल्या टिप्पण्या भारतात चर्चेच्या केंद्रस्थानी आल्या. त्यांनी राहुल गांधी यांच्या विरोधकांना बळ दिलं तर समर्थकांना राग आला.
हे पुस्तक दोन भागात आहे आणि त्यातल्या पहिल्या भागात त्यांनी आपल्या 2010 सालच्या भारतभेटीवर सुमारे 1400 शब्द खर्च केले आहेत. यात त्यांनी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याविषयची आपली निरीक्षणं नोंदवली आहेत.
ते मनमोहन सिंग यांच्याविषयी लिहितात...
ओबामा म्हणतात की ते मनमोहन सिंग यांना भेटले तेव्हा मनमोहन सिंग म्हणाले, त्यांना "देशातल्या वाढत्या मुस्लीमविरोधी वातावरणाने येत्या काळात हिंदू राष्ट्रवादी पक्ष भाजपचा प्रभाव वाढेल," अशी त्यांना भीती आहे. भाजप तेव्हा प्रमुख विरोधी पक्ष होता.
ओबामा लिहितात की, सिंग यांनी मुंबई हल्ल्यानंतर पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्याच्या मागणीलाही दाद दिली नाही. या हल्ल्यात 166 लोक मरण पावले होते. "पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्याच्या मागणीला अमान्य करण्याची मोठी राजकीय किंमत त्यांना चुकवावी लागली," ओबामा लिहितात.
"अनिश्चिततेच्या काळात धार्मिक आणि वांशिक ध्रुवीकरणाच्या हाका खूप भारावून टाकणाऱ्या वाटू शकतात. आणि भारतात काय किंवा जगात काय राजकारण्यांना त्याचा फायदा घेणं अजिबात अवघड नाहीये," सिंग यांनी ओबामा यांना सांगितलं होतं.
ओबामांना हे पटलं आणि त्यांनी वेल्व्हेट क्रांतीनंतर चेक रिपब्लिकचे पाहिले अध्यक्ष झालेले वक्लॅव हॅवेल यांच्याशी झालेल्या चर्चेची आठवण काढली. हॅवेल यांनी ओबामांशी बोलताना युरोपातल्या वाढत्या परंपरावादी लाटेविषयी चिंता व्यक्त करत इशारा दिला होता.

फोटो स्रोत, ANI
"जर ग्लोबलाझेशन आणि ऐतिहासिक आर्थिक संकटामुळे त्यातल्या त्यात श्रीमंत असणारे देश अशा लाटांना बळी पडत असतील - जर मला असे बदल टी पार्टीच्या रूपात अमेरिकेत दिसत असतील - तर भारत त्यापासून कसा अलिप्त राहू शकतो," ओबामा लिहितात.
ओबामांच्या भारतभेटीच्या वेळी आयोजित केलेल्या स्नेहभोजन समारंभात मनमोहन सिंह 'क्षितीजावर दाटून आलेल्या मळभाविषयी' खुलेपणाने बोलले होते असं ते लिहितात.
मनमोहन सिंग थंडावलेल्या अर्थव्यवस्थेविषयी बोलले. तोवर 2007 मध्ये अमेरिकेची अर्थव्यवस्था घसरल्यानंतर आलेल्या महामंदीचे परिणाम जगावर झाले होते याचाही उल्लेख पुस्तकात आहे.
भारतीय पंतप्रधानांना आण्विकशक्ती असलेल्या पाकिस्तान आणि भारतामधल्या वाढत्या तणावाचीही चिंता होती असंही ओबामांनी आपल्या पुस्तकात म्हटलं आहे.
"त्यांच्यापुढे पाकिस्तानचाही प्रश्न होता. 2008 सालच्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा तपास योग्य रितीने करून भारताला मदत करण्यात पाकिस्तान अयशस्वी ठरला होता. यामुळे दोन्ही देशांमध्ये तणाव कमालीचा वाढला होता. याच एक कारण म्हणजे या हल्ल्यासाठी जबाबदार असणाऱ्या लष्कर-ए-तोयबा या अतिरेकी संघटनेचे धागेदोरे पाकिस्तानच्या गुप्तहेर संघटनेशी जोडलेले होते."
ओबामांनी मनमोहन सिंग याचं वर्णन 'भारताच्या आर्थिक परिवर्तनाचे प्रमुख शिल्पकार' आणि 'विचारी, संयमी आणि कमालीचे प्रामाणिक' अशा शब्दांमध्ये केलं आहे.
सिंह असं मितभाषी, लाजरं व्यक्तिमत्व होतं ज्यांचा तंत्रज्ञानाचा वापर करून लोकांचे प्रश्न सोडवण्यावर विश्वास होता. त्यांनी लोकांचा विश्वास जिंकला कारण ते लोकांच्या भावनांना हात घालत होते म्हणून नाही तर त्यांनी एकंदरितच लोकांचं जीवनमान उंचावलं आणि भ्रष्टाचारी नसलेला नेता अशी त्यांची ओळख होती, ओबामा नमूद करतात.
"भले ते आपल्या परराष्ट्र धोरणांच्या बाबतीत सावधगिरी बाळगत होते, भारतीय प्रशासन, जे कायमच अमेरिकेच्या हेतूविषयी साशंक राहिलं आहे, त्यांच्याविरोधात जाऊन धोरणं ठरवत नव्हते, पण आम्ही जितका वेळ एकत्र घालवला त्यावरून माझ्या हे लक्षात आलं की ते अत्यंत ज्ञानी आणि कमालीचे सभ्य गृहस्थ होते."

फोटो स्रोत, Getty Images
ते सोनिया गांधींविषयी लिहितात...
ओबामा यांनी सोनिया गांधींचं वर्णन 'साठीतली, पारंपरिक साडी नेसलेली, काळ्या डोळ्यांची आणि शोधक नजरेची, शांत आणि शाही वावर असलेली महिला' असा केला आहे.
"त्या आधी गृहिणी होत्या पण आपला नवरा गमावल्याच्या दुःखातून बाहेर आल्या आणि राष्ट्रीय राजकारणात मोठ्या प्रभावशाली नेत्या बनल्या ही गोष्टच त्यांच्या कुटुंबाच्या ताकदीची कल्पना देते," ते लिहितात.
सोनिया गांधी युरोपियन वंशाच्या आणि इटलीत जन्मलेल्या आहेत. त्यांचे पती राजीव गांधी यांची 1991 साली हत्या झाली होती.
स्नेहभोजनाच्या प्रसंगी, सोनिया गांधी बोलत कमी होत्या आणि ऐकत होत्या, ओबामा लिहितात. "मनमोहन सिंग यांच्या धोरणाबद्दल मतभिन्नता व्यक्त करताना त्या काळजीपूर्वक बोलत होत्या आणि अनेकदा संभाषणाचा रोख आपल्या मुलाकडे वळवत होत्या. माझ्या लवकरच लक्षात आलं की त्यांच्या चाणाक्ष आणि सक्षम बुद्धीमुळे त्यांच्या हाती ताकद होती."

फोटो स्रोत, PTI
ते राहुल गांधींबद्दल लिहितात...
ओबामा राहुल गांधींविषयी म्हणाले की, "ते मला स्मार्ट आणि प्रामाणिक वाटले. दिसायला ते आपल्या आईसारखेच सुंदर होते. त्यांनी मला उदारमतवादी राजकारणाचं भविष्याबद्द त्यांचे विचार सांगितले. अधून मधून ते मला माझ्या 2008 च्या प्रचाराविषयीही विचारत होते. "पण ते मला शिक्षकाला प्रभावित करायचं आहे अशा नर्व्हस आणि अभ्यासू विद्यार्थ्यासारखे वाटले. असा विद्यार्थी ज्याच्यात त्या विषयाचा तज्ज्ञ बनण्याची जिद्द किंवा योग्यतेची कमतरता आहे."
ते भारताच्या भविष्याविषयी लिहितात...
"आधुनिक काळातला भारत म्हणजे एक अशी यशोगाथा आहे जी बदलती सरकारं, राजकीय पक्षांमधलं वैर, अनेक वेगवेगळ्या विभाजनवादी चळवळी, आणि सगळ्या प्रकारच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांतूनही उदयाला आलेली आहे," भारताविषयी लिहिताना ओबामा हे मत मांडतात.
"सक्षम लोकशाही आणि निर्बंध नसलेली अर्थव्यवस्था असूनही आताचा भारत देश गांधीच्या स्वप्नातल्या समतावादी, शांतताप्रिय आणि शाश्वत समाजाच्या जवळपासही जात नाही. असमानता सर्वत्र पसरलेली आहे आणि हिंसा कायमच भारतीयांच्या जगण्याचा हिस्सा राहिलेली आहे," ओबामा लिहितात.
त्याच्या पुस्तकात हाही उल्लेख आहे की जेव्हा ते मनमोहन सिंगांच्या घरून निघाले तेव्हा त्यांच्या मनात आलं की हे पंतप्रधान पायउतार झाल्यानंतर देशात काय होईल?
"सोनिया गांधींच्या प्रयत्नांना यश येत सत्ता काँग्रेसकडे आणि पर्यायाने राहुल गांधीच्या हातात जाईल आणि काँग्रेस देशात आपला वरचष्मा कायम ठेवू शकेल की भाजपचा विभाजनवादी राष्ट्रवाद जिंकेल?"

फोटो स्रोत, Getty Images
"मला काँग्रेसच्या यशाबद्दल साशंकता वाटली. यात मनमोहन सिंगांची काही चूक नव्हती. त्यांनी त्यांचं काम चोख केलं होतं. त्यांनी उदारमतवादी लोकशाहीची मुल्य जपली होती, राज्यघटनेतल्या गोष्टी पाळल्या होत्या. नित्यनियमाने करावं लागणारं, किचकट असं जीडीपी वाढवण्याचं कामही त्यांनी केलं होतं. सामजिक सुरक्षेची व्याप्ती वाढवली होती. माझ्यासारखाच त्यांचाही विश्वास होता की हेच सगळं लोकशाहीत करायचं असतं. खासकरून भारत किंवा अमेरिकेसारख्या अनेकविध धर्म आणि वंशांच्या देशांमध्ये."
पण यानंतर ओबामा हाही प्रश्न स्वतःला विचारतात की "हिंसा, हाव, भ्रष्टाचार, राष्ट्रवाद, वंशभेद आणि धार्मिक उन्माद, आपल्या कमतरता झाकण्यासाठी दुसऱ्याला कमी लेखणं या अगदी प्राथमिक मानवी भावना आहेत ज्या अनिश्चितेतच्या, नैतिकतेच्या काळात उफाळून येतात. या भावना इतक्या शक्तीशाली असतात की कोणत्याही लोकशाहीला त्यांना कायमस्वरूपी आळा घालणं शक्य नाही का?"
"या वृत्ती प्रत्येक ठिकाणी दबा धरून बसलेल्या असतात. कुठेही विकासाचा दर मंदावला, किंवा लोकसंख्येचं स्वरूप बदललं, किंवा एखाद्या प्रभावशाली नेत्याने लोकांच्या मनातल्या असुरक्षिततेचा फायदा घ्यायचं ठरवलं तर लगेच उसळी मारतात."
ओबामांच्या प्रश्नांचं उत्तर 2014 मध्ये मिळालं जेव्हा नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपला दणदणीत विजय मिळाला.
ओबामा 2015 साली, नरेंद्र मोदी पंतप्रधान असताना पुन्हा भारभेटीवर आले होते. पण त्यांच्या पुस्तकाच्या पहिल्या भागात 2011 मध्ये झालेल्या ओसामा बिन लादेनचा मृत्यू इथपर्यंतच्याच घटनांचा समावेश आहे. दुसऱ्या भागात कदाचित मोदींचा उल्लेख असेल.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री आठ वाजता बीबीसी मराठीच्या फेसबुक पेजवर कोरोना पॉडकास्ट पाहायला विसरू नका.)









