You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अरुंधती रॉय यांचं पुस्तक तामिळनाडूतल्या विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून का हटवलं?
लेखिका अरुंधती रॉय यांचं पुस्तक अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (ABVP) तक्रारीवरून तामिळनाडूतल्या तिरूनेलवेलीमधल्या एका विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवलं गेलं आहे.
मनोनमनियम सुंदरनर युनिव्हर्सिटी असं या विद्यापीठाचं नाव आहे.
अरुंधती रॉय यांचं 'वॉकिंग विथ द कॉम्रेड्स' हे पुस्तक एम ए इंग्लिशच्या अभ्यासक्रमात 2017 साली समाविष्ट केलं गेलं होतं. हे पुस्तक अरूंधती रॉय यांच्या माओवाद्यांशी झालेल्या भेटींवर आधारित आहे
मागच्या आठवड्यात एबीव्हीपीच्या सदस्यांनी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ के पिचुमणि यांची भेट घेऊन हे पुस्तक अभ्यासक्रमातून हटवण्याची मागणी केली.
एबीव्हीपीने कुलगुरूंना लिहिलेल्या पत्रात म्हटलंय की, "तीन वर्षांपासून हे पुस्तक अभ्यासक्रमात समाविष्ट केलेलं आहे ही अतिशय खेदजनक बाब आहे. याच्या परिणामी नक्षलवादी आणि माओवादी विचारसरणी सरळसरळ विद्यार्थ्यांवर लादली जातेय. आम्ही हे राष्ट्रविरोधी पुस्तक अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याचा विरोध करतो. प्रशासनाने याबद्दल माफी मागावी आणि ताबडतोब हे पुस्तक अभ्यासक्रमातून काढून टाकावं."
या जागी आता एम. कृष्णन यांचं पुस्तक 'माय नेटिव्ह लँड - एसेज ऑन नेचर' समाविष्ट केलं गेलं आहे. एबीव्हीपीचे दक्षिण तामिळनाडूचे संयुक्त सचिप सी विघ्नेश यांनी बीबीसी तामिळला सांगितलं की, "आम्हाला माहिती नव्हतं की हे पुस्तक तीन वर्षांपासून अभ्यासक्रमात समाविष्ट आहे. आमच्या संघटनेच्या एका विद्यार्थांने ही बाब आमच्या लक्षात आणून दिली."
एबीव्हीपीने हे पुस्तक अभ्यासक्रमातून हटवण्याच्या निर्णयाचं स्वागत केलंय तर डीएमके आणि सीपीएमने याचा विरोध केलाय.
विद्यापीठाच्या कुलगुरूंनी म्हटलं की हा निर्णय विद्यार्थ्यांच्या हितासाठी घेतला आहे.
'वॉकिंग विथ द कॉम्रेड्स' पुस्तक कसं आहे?
अरुंधती रॉय एक ख्यातनाम लेखिका आहेत ज्यांना प्रतिष्ठेचा बुकर पुरस्कारही मिळाला आहे. त्यांनी 2010 साली नक्षल प्रभावित मध्य भारताचा दौरा केला होता आणि अनेक माओवाद्यांची भेट घेतली होती. त्या अनुभवांवर आधारित त्यांच 'वॉकिंग विथ द कॉम्रेड्स' हे पुस्तक 2011 साली प्रकाशित झालं होतं.
कोणत्या परिस्थितीत माओवाद्यांना बंदुका उचलाव्या लागल्या या मुद्द्यावर त्यांनी या पुस्तकात विश्लेषण केलं आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)