You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कुणाल कामरांच्या अडचणीत वाढ, न्यायालय अवमान प्रकरणात दुसऱ्या खटल्याला परवानगी
स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामरा यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कुणाल कामरांनी केलेल्या ट्वीटबद्दल नव्याने दुसरा खटला दाखल होण्याची शक्यता आहे. त्यांनी याआधी ट्वीट केले होते पण याबाबत आपण माफी मागणार नाहीत असे स्पष्ट केले होते.
कामरांचे नवे ट्वीट हे थेट सरन्यायाधीशांनाच उद्देशून आहे तेव्हा त्यांच्यावर कारवाई सुरू करण्यास परवानगी असावी असं पत्र अॅड. अनुज सिंह यांनी अॅटर्नी जनरलला के. के. वेणूगोपाल यांना लिहिलं होतं. त्यानंतर त्यांनी परवानगी दिली आहे.
रिपल्बिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. यासंदर्भात कुणाल कामरा यांनी ट्वीट करून नाराजी व्यक्त केली होती.
या संदर्भात पुण्यातील दोन वकिलांनी कुणाल कामरा यांच्यावर न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसे पत्र त्यांनी अॅटर्नी जनरल के. के. वेणूगोपाल यांना पाठवले होते.
काय म्हणाले अॅटर्नी जनरल?
अॅटर्नी जनरल (एजी) के. के. वेणुगोपाल यांनी आपल्या संमती पत्रात म्हटले, "लोकांना असे वाटते की ते भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचा आणि न्यायाधीशांचा त्यांना वाटणाऱ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याप्रमाणे निर्भीडपणे आणि निर्लज्जपणे निषेध करू शकतात."
"अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे अवमानाच्या कायद्याच्या अधीन आहे. सर्वोच्च न्यायालयावर अनुचितपणे भाष्य करणाऱ्यांनी हे समजून घ्यायला हवे की त्यांच्यावर न्यायालयाचा अवमान कायदा 1972 नुसार कारवाई होऊ शकते," असाही उल्लेख अॅटर्नी जनरल यांच्या संमती पत्रात करण्यात आला आहे.
ते पुढे म्हणतात, "त्यामुळे कुणाल कामरा यांच्याविरोधात कार्यवाही करण्याची प्रक्रिया सुरू करण्यासाठी मी परवानगी देतो."
काय आहे प्रकरण?
रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना बुधवारी (11 नोव्हेंबर) सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला. अर्णब गोस्वामी यांना रायगड पोलिसांनी इंटिरिअर डेकोरेटर अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अटक केली होती.
सर्वोच्च न्यायालयाच्या दोन न्यायाधीशांच्या खंडपीठानं अनेक तासांच्या सुनावणीनंतर रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्यासह तीन जणांचा अंतरिम जामीन मंजूर केला.
अर्णब गोस्वामी यांचा जामीन अर्ज फेटाळण्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय योग्य नसल्याचंही सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं.
अर्णब गोस्वामी यांना जामीन मिळाल्यानंतर कुणाल कामरा यांनी आपल्या ट्टिवर हँडलवरून काही ट्विट्स केले. यामध्ये सर्वोच्च न्यायालयावर नाराजी व्यक्त करण्यात आलीहोती.
यासंदर्भात आता सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी खटला चालवला जाणार आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)