You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
नितीन बानुगडे कोण आहेत? त्यांना विधानपरिषदेत पाठवल्यास शिवसेनेला काय फायदा होईल?
- Author, श्रीकांत बंगाळे
- Role, बीबीसी मराठी
विधानषरिदेसाठीच्या 12 उमेदवारांची यादी महाविकास आघाडी सरकारतर्फे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली आहे.
या यादीत शिवसेनेकडून नितीन बानुगडे यांचं नाव असल्याची चर्चा सुरू आहे. ते गेल्या काही वर्षांपासून शिवसेनेचे नेते म्हणून काम करत आहे.
नितीन बानुगडे कोण आहेत?
नितीन बानुगडे हे प्राध्यापक व्याख्याते आहेत. त्यांनी शिवाजी महाराज, संभाजी महाराज, जगणं समाजासाठी, नातं संस्कारांचं, यशवंतराव चव्हाण अशा वेगवेगळ्या विषयांवर व्याख्यानं दिली आहेत. त्यांच्या व्याख्यानांना हजारोंच्या संख्येनं गर्दी जमते.
याशिवाय ते त्यांच्या प्रेरणादायी व्याख्यानांसाठीही प्रसिद्ध आहेत. त्यांच्या यूट्यूब चॅनेलवरील 'स्वत:चे साम्राज्य निर्माण करा', 'वर्षभर उशीर होईल, पण ध्येय पूर्ण होईल', 'संघर्षाच्या काळात 10 हत्तींचं बळ देणारं भाषण' इ. व्याख्यानांच्या व्हीडिओंना लाखो व्ह्यूज आहेत.
त्यांना फेसबुकवर 5 लाख 8 हजार फॉलोअर्स आहेत. फेसबुकवरील त्यांच्या अधिकृत पेजवर त्यांनी स्वत:विषयी माहिती दिली आहे.
त्यात ते लिहितात, "जगातील सर्वात कमी वयाचा महानाट्यकार म्हणून जागतिक गौरव. नुसतेच मनोरंजन याने आयुष्यात काहीच भागात नसतं, तर त्या आधी थोडं प्रबोधनसुद्धा असावं लागतं. "
या पेजवरील वैयक्तिक माहितीत त्यांनी शिक्षणाविषयी लिहिलंय, "एम.एस.सी. भौतिकशास्त्र (पुणे विद्यापीठ), बी.एड. (सातारा), बी.जे. (कराड), पंचक्रोशी शिक्षण महामंडळ, ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स, आर्ट्स, कॉमर्स, रहिमतपूर येथे भौतिकशास्त्राचे प्राध्यापक."
राजकीय कारकीर्द
2014च्या विधानसभा निवडणुकीवेळी बानुगडे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यावेळी लगेचच त्यांना सातारा, सांगली जिल्ह्याचं संपर्कप्रमुख पद देण्यात आलं.
बानगुडे यांच्या राजकीय कारकिर्दीविषयी 'पुण्य नगरी'च्या सातारा आवृत्तीचे वृत्त संपादक विनोद कुलकर्णी सांगतात, "नितीन बानुगडे पाटील मोठे वक्ते आहेत. शिवसेनेनं त्यांना गर्दी खेचणारा वक्ता म्हणून पक्षात घेतलं. त्यानंतर मराठवाडा, विदर्भ, कोकण अशा अनेक ठिकाणी त्यांनी सभा घेतल्या.
शिवसेनेनं त्यांना अल्पावधीतच पक्षाच्या उपनेतेपदासाठी निवडलं आणि कृष्णा खोरे महामंडळाचं उपाध्यक्षपदही देऊ केलं. पुढे 2019च्या निवडणुकीत त्यांनी कोरेगाव विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचा आमदारही निवडून आणला."
सांगलीतील ज्येष्ठ पत्रकार धोंडिराम पाटील यांच्या मते, "नितीन बानुगडे पाटील यांना वक्तृत्व कौशल्यामुळे सांगलीचं संपर्कप्रमुख हे पद मिळालं. जिल्ह्यात शिवसेनेचे प्रचारक म्हणून त्यांची कारकीर्द राहिली आहे. पण, त्यांचा पक्षाला फार काही फायदा झालेला नाही.
कारण त्यांच्या कामाची पद्धत आणि त्यांच्या खाली काम करणाऱ्या लोकांची मानसिकता यांच्यात जमीनअस्मानाचा फरक आहे. प्रत्यक्षात लोकांमध्ये जाऊन बसणं, त्यांच्यात मिसळणं या गोष्टी करताना दिसत नाही. त्यामुळे सामान्यांना ते वक्ता म्हणून अपिल होतात, नेता म्हणून नाही."
शिवसेनेसाठी काय फायदा?
आता शिवसेनेकडून बानुगडे पाटील यांना विधानपरिषदेवर पाठवण्यात येणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे त्यांच्या निवडीनं शिवसेनेला काय फायदा होईल, असा प्रश्न पडतो.
विनोद कुलकर्णी यांच्या मते, "नितीन बानुगडे हे शिवसेनेचे स्टार प्रचारक आहेत. पक्षाचा पूर्णवेळ प्रचार करण्याची त्यांची तयारी आहे. याशिवाय ते अभ्यासू नेते आहेत. सगळ्याच विषयांचा त्यांचा दांडगा अभ्यास आहे. त्यामुळे विधानपरिषदेत ते कोणत्याही विषयावर जोरदार भाषण करू शकतात. दुसरं म्हणजे ते तरुण आहेत आणि त्यांची कारकिर्द दीर्घकाळ राहू शकते."
"बानुगडे यांच्या भाषणांत आक्रमकता असते, शब्दफेक आणि अभिनय कौशल्य असतं. यातून लोकांची करमणूक होते, पण त्यांचं मतपरिवर्तन होत नाही. बानुगडेंमुळे शिवसेनेची प्रतिमा उजळ व्हायला मदत झाली, वाढायला नाही," असं धोंडीराम पाटील यांचं मत आहे.
बानुगडे काय म्हणतात?
विधीमंडळात सर्वसामान्यांचे प्रश्न मांडण्याला माझी प्राथमिकता असेल, जनतेच्या विश्वासाला तडा न जाऊ देण्याचा मी प्रयत्न करेन, असं बानुगडे यांनी बीबीसी मराठीला सांगितलं.
पण, तुमचा सामान्य लोकांधील वावर कमी दिसतो, यावर ते म्हणतात, "शिवसेनेची बांधिलकी जनतेशी आहे आणि मी लोकांमध्येच असतो. व्याख्यानांच्या माध्यमातून राज्यभर फिरतो, लोकांशी बोलतो आणि त्यांच्या अडचणी समजून घेतो. एखाद्या विषयाचा पूर्ण खोलात जाऊन अभ्यास करणं, त्याविषयी फारसा गाजावाजा न करणं ही माझ्या कामाची पद्धत आहे. मी तर म्हणेन की उलट मीच सगळ्यांत जास्त लोकांमध्ये असतो."
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.' रोज रात्री 8 वाजता बीबीसी मराठीचे कोरोना पॉडकास्ट तुम्ही फेसबुकवर पाहू शकता..)