पाकिस्तानच्या संसदेत नरेंद्र मोदींच्या नावाच्या घोषणा देण्यात आल्या का?

- Author, श्रृती मेनन
- Role, बीबीसी रिअॅलिटी चेक
पाकिस्तानच्या संसदेत एका चर्चेवेळी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाच्या घोषणा दिल्याचं वृत्त भारतातल्या काही प्रसार माध्यमांनी प्रसारित केलं.
फ्रान्समध्ये एका शिक्षकाच्या हत्येच्या विषयावर चर्चा सुरू असताना काही खासदारांनी मुद्दाम पंततप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाच्या घोषणा दिल्याचं या वृत्तांमध्ये दाखवण्यात आलं.
मात्र, पाकिस्तानच्या संसदेत खरंच मोदींच्या नावाने घोषणा देण्यात आल्या का? काय आहे सत्य?
संसदेत काय घडलं?
सोमवारी पाकिस्तानात विरोधी पक्षनेते ख्वाजा आसिफ यांनी फ्रान्समध्ये मोहम्मद पैगंबर यांच्या वादग्रस्त व्यंगचित्राचा निषेध करण्याच्या प्रस्तावावर मतदानाची मागणी केली. इतरही काही सदस्य अशीच मागणी करत होते.
फ्रान्समध्ये हे व्यंगचित्र दाखवल्यामुळे व्यंगचित्र दाखवणाऱ्या शिक्षकाची हत्या करण्यात आली होती. हे व्यंगचित्र दाखवताना संबंधित शिक्षक अभिव्यक्ती स्वातंत्र्याविषयी शिकवत होते.
फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी या घटनेचा निषेध करताना केलेल्या वक्तव्यावर काही मुस्लीम राष्ट्रांनी नाराजी व्यक्त केली होती. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनीही त्यांच्या वक्तव्यावर टीका केली होती.
पाकिस्तानात सरकार आणि विरोधक दोघांनीही या विषयावर आपापले प्रस्ताव मांडले.

फोटो स्रोत, Getty Images
चर्चेवेळी जेव्हा पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरैशी यांनी संसदेला संबोधित करायला सुरुवात केली त्यावेळी विरोधकांनी मतदानाची मागणी करत 'वोटिंग, वोटिंग' अशी घोषणाबाजी सुरू केली.
विरोधक सरकारच्या नाही तर त्यांच्या प्रस्तावावर मतदान घेण्याची मागणी करत होते.
भारतीय मीडिया चॅनल, डिजिटल प्लॅटफॉर्म आणि सोशल मीडियावर हाच दोन मिनिटांचा छोटासा व्हीडिओ दाखवण्यात आला. मात्र, व्हीडिओचा कुठलाही संदर्भ दिला नाही.
टाईम्स नाऊ, इंडिया टीव्ही, इकॉनॉमिक टाईम्स आणि सोशल मीडिया यूजर्सने पाकिस्तानच्या संसदेत पंतप्रधान इम्रान खान यांना कमी लेखण्यासाठी विरोधी पक्षातल्या नेत्यांनी मोदी मोदीच्या घोषणा दिल्या, असा चुकीचा दावा केला.
काही वेळाने इकॉनॉमिक टाईम्सने बातमी काढली. टाईम्स नाऊनेही ट्वीट डिलीट केलं. मात्र, त्यांची बातमी त्यांच्या वेबसाईटवर अजूनही आहे. त्यात पाकिस्तानच्या संसदेच्या चर्चेची छोटी व्हीडिओ क्लीपही आहे.

फोटो स्रोत, NArendra modi'you tube
संसदेत मोदींचं नाव उच्चारण्यात आलं का?
पाकिस्तानच्या संसदेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव उच्चारण्यात आलं होतं. मात्र, वेगळ्या संदर्भात.
शाह मेहमूद कुरैशी यांनी विरोधक भारतीय अजेंड्यानुसार बोलत असल्याचा आरोप केला. त्यावेळी मोदींचं नाव घेण्यात आलं होतं.
चर्चा तापलेली असताना पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरैशी यांनी विरोधक सैन्यात फूट पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला.
याचवेळी सरकार समर्थकांनी ऊर्दूमध्ये घोषणाबाजी करायला सुरुवात केली. त्यांचे शब्द होते - 'मोदी का जो यार है, गद्दार है, गद्दार है.' ही घोषणाबाजी स्पष्ट ऐकू येते.
मात्र, भारतात ज्या बातम्या प्रसारित झाल्या त्यात हा संदर्भ कुठेही दिला गेला नाही.
पाकिस्तानच्या संसदेत विरोधकांनी मोदींच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली, हा भारतीय मीडियामध्ये करण्यात आलेला दावा असंबद्ध आहे.
यापूर्वीही भारतातल्या प्रसार माध्यमांनी पाकिस्तानमधल्या घटना चुकीच्या संदर्भासह दाखवल्या आहेत.
अगदी ताजं उदाहरण आहे कराचीतील. पाकिस्तानातल्या कराची शहरात गृहयुद्ध सुरू झाल्याचं वृत्त अनेक भारतीय प्रसार माध्यमांनी दाखवलं होतं. मात्र, ती बातमीदेखील खरी नव्हती.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








