दसरा : 100 वर्षांपूर्वी कोल्हापूरचा शाही दसरा सोहळा का रद्द करावा लागला होता?

शाही दसरा रद्द

फोटो स्रोत, छत्रपती ट्रस्ट

    • Author, स्वाती पाटील
    • Role, बीबीसी मराठीसाठी

ऐतिहासिक महत्त्व आणि परंपरा असलेला कोल्हापूरचा शाही दसरा यावर्षी कोरोना व्हायरसच्या साथीमुळे रद्द करण्यात आलाय. याआधी प्लेगची साथ असताना हा सोहळा साजरा झाला नव्हता. त्यानंतर आता 100 वर्षांनी पुन्हा हा सोहळा रद्द करावा लागतो आहे.

कोल्हापूरचा शाही दसरा आणि त्याचं महत्वं

शारदीय नवरात्री नंतर दशमीला येणारा सण म्हणजे दसरा. छत्रपती घराण्यांचा परंपरागत असलेला हा सण प्राचीन काळापासून साजरा केला जातो. पूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजयाच्या मोहिमेची सुरूवात विजयादशमीच्या मुहूर्तावर केली होती.

पावसाळ्यात असलेली शेतीची कामं उरकून पूर्वी सैन्य आपल्या प्रदेशाची सीमा ओलांडून मोहिमेवर जायचं. मोहिमेवर लागणाऱ्या साहित्याची तयारी करून सज्ज व्हायचं. त्यामुळे खंडेनवमीच्या दिवशी शस्त्रपूजन केलं जातं आणि दशमीला विजय साजरा करण्यासाठी सीमोलंल्घन केलं जात असे.

त्यानंतरच्या काळात या सणाला प्रतिकात्मक स्वरूप मिळालं. त्यात गावाची सीमा ओलांडून आपट्याची पानं म्हणजे सोनं लुटण्याचा कार्यक्रम व्हायचा. संस्थान काळात सीमोलंल्घनासाठी मिरवणूक काढली जायची. ही मिरवणूक गावाच्या बाहेर गेल्यानंतर सोनं लुटण्यासाठी लोक गर्दी करायचे.

कोल्हापूर पॅलेस

फोटो स्रोत, छत्रपती ट्रस्ट

देशात म्हैसूर आणि कोल्हापूर संस्थानचा शाही दसरा लक्षवेधी

कोल्हापूर संस्थानाचे मुख्यस्थान 1788 पर्यंत पन्हाळगडावर होते. त्यावेळी हा सण गडावर साजरा केला जायचा. त्यानंतरच्या काळात शिवाजी महाराजांनी ही गादी कोल्हापूरमध्ये आणली. तेव्हापासून हा सण करवीरनगरीत साजरा केला जाऊ लागला.

त्यावेळी कोटातून बाहेर येऊन म्हणजे तटबंदीच्या बाहेर येऊन गावाच्या बाहेर गंजीमाळ इथं हा सण साजरा व्हायचा. त्यानंतर नवीन राजवाडा बांधला गेला. राजर्षी शाहू महाराज नव्या राजवाड्यात राहायला गेल्यानंतर हा दसरा सण चौफाळा माळ इथं साजरा केला जाऊ लागला. त्यावरुनच या परिसराला दसरा चौक असे नाव पडलं.

दसरा मिरवणूक

फोटो स्रोत, छत्रपती ट्रस्ट

राजर्षी शाहू महाराजांच्या काळात जुना राजवाडा ते दसरा चौक अशी भव्य मिरवणूक निघायची. या मिरवणुकीत छत्रपती घराण्याकडून सरदार, जहागीरदार यांना आमंत्रण दिलं जायचं. ही सगळी मंडळी आपल्या लवाजम्यासह या मिरवणुकीत सहभागी व्हायची.

यात सर्वोत्तम घोडे, उंट, शिकारखान्यातील वाघ, चित्ते यासह लष्करी दल, पायदळ सहभागी व्हायचं. छत्रपती घराण्याचं पारंपरिक वाद्य 'पी ढबाक' वाजवलं जायचं. हत्तीवर राजघराण्याचं निशाण आणि जरिपटका असायचा. पारंपरिक वेषात सैन्य सहभागी व्हायचे. अशी भव्य स्वरुपातील मिरवणूक पाहायला आजूबाजूच्या गावातून खूप लोक यायचे.

पुढे संस्थानकाळातील लवाजम्याचं स्वरुप बदलत गेलं, पण या मिरवणुकीचा थाट आजही कायम आहे.

जर्मनीतून मागवण्यात आलेली मेबॅक कार

फोटो स्रोत, छत्रपती ट्रस्ट

फोटो कॅप्शन, जर्मनीतून मागवण्यात आलेली मेबॅक कार

1936 मध्ये राजाराम महाराजांनी जर्मनीतून मेबॅक कार मागवली होती. या गाडीचं वैशिष्ट्य म्हणजे देशभरात असलेल्या 4 कारपैकी ही एक कार आजही छत्रपती घराण्यात चालू अवस्थेत आहे.

या गाडीच्या समोर करवीर संस्थानचा भगवा ध्वज आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना तुळजाभवानी तलवार देतानाचा तांब्याचा लोगो आहे. राजाराम महाराजांनी ही गाडी घरात वापरण्यासाठी मागवलेली होती. पुढे 1986 पासून याच गाडीतून छत्रपती घराण्यातील मंडळी दसरा चौकात येतात. वर्षभरात एकदाच कोल्हापूरकरांना ही गाडी पाहण्याची संधी असते.

YouTube पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 1

दसरा चौकात छत्रपती घराण्यातील राजे-महाराजे यांच्या हस्ते पंरपरेनुसार शमीपूजन केलं जातं. त्यानंतर तोफेचा आवाज झाल्यानंतरच आपट्याची पाने लुटण्याचा म्हणजे सोनं लुटण्याचा कार्यक्रम होतो. या सोहळ्यासाठी दसरा चौकात हजारो नागरिक उपस्थित असतात.

दसरा

फोटो स्रोत, छत्रपती ट्रस्ट

प्लेगच्या साथीमुळे रद्द झाला होता सोहळा

कोल्हापूरमध्ये 1899 ते 1900 च्या दरम्यान प्लेगची साथ आली होती. त्यावेळी प्लेग हा संसर्गजन्य आजार असल्याने त्याचा फैलाव रोखण्यासाठी राजर्षी शाहू महाराजांनी जाहीरनामा प्रसिद्ध केला होता. त्यानुसार लोकांना स्थानत्याग म्हणजे राहती घरं सोडून जाण्याचा आदेश दिला होता.

ही साथ आटोक्यात येईपर्यत सर्व धार्मिक सण, उत्सव, सार्वजनिक कार्यक्रम रद्द करावे लागले होते. त्याचाच भाग म्हणून 1902 साली ऐतिहासिक शाही दसरा मिरवणूक रद्द करण्यात आली होती असं इतिहास संशोधक जयसिंगराव पवार यांनी सांगितलं.

प्लेगची साथ इतकी भयंकर होती की या साथीमुळे लोकांना प्राण गमवावे लागले. जे वाचले त्यांना जीवलगांना गमावल्याचे दुख होते. हा शाही दसरा रद्द करण्याची इतिहासात नोंद नसल्याचं इतिहास संशोधकांनी सांगितलं. पण प्राप्त परिस्थितीत सर्वच कार्यक्रम रद्द करण्याची वेळ त्यावेळी आली होती.

आता 100 वर्षांनी पुन्हा एकदा एका साथीमुळे हा शाही दसरा सार्वजनिकरित्या साजरा होणार नाहीये. त्यामुळे या वर्षी कोल्हापूरकरांना हा सोहळा अनुभवता येणार नाही.

दरम्यान, साताऱ्यातील छत्रपती राजघराण्याचा विजयादशमीचा शाही सीमोल्लंघन सोहळादेखील रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

जलमंदिर पॅलेस इथं भवानी तलवारीचे पूजन करून दरवर्षी ऐतिहासिक तलवारीची जलमंदिर ते पोवईनाका अशी पालखीतून मिरवणूक काढण्यात येते. पोवईनाका इथे सीमोल्लंघनाचा सोहळा होतो. मात्र यावर्षी कोरोनामुळे हा सोहळा रद्द करण्यात आला असल्याची माहिती उदयनराजे भोसले दिली आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 2

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)