You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
जितेंद्र आव्हाड: शरद पवारांचा जन्म जनसेवेसाठीच झाला आहे
आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रकाशित बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा...
1) शरद पवारांचा जन्मच जनतेसाठी - जितेंद्र आव्हाड
शरद पवार यांचा जन्म जनसेवेसाठीच झाला आहे, असं राष्ट्रवादीचे नेते आणि महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड म्हणाले. टीव्ही 9 मराठीने ही बातमी दिली आहे.
विधानसभा निवडणुकांवेळी शरद पवार यांची साताऱ्यात झालेली सभा गाजली होती. या सभेच्या वर्षपूर्तीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसने सोशल मीडियावरून व्हीडिओही प्रसिद्ध केले.
याच पार्श्वभूमीवर जितेंद्र् आव्हाड म्हणाले, "आजच्याच दिवशी गेल्यावर्षी शरद पवार यांनी भर पावसात छत्री न घेता सभा घेतली होती. आज पुन्हा शरद पवार बांधावर गेलेत. ऐंशी वर्षे त्यांचं वय आहे."
"कुठल्याही प्रकारचा धोका असला तरी, कुठलेही आव्हान असलं तरी, ते स्वीकारत बांधावर गेलेत. शरद पवार आणि आव्हानं हे जुनं नातं आहे," असंही आव्हाड म्हणाले.
2) पीडित कुटुंबाचा आवाज दाबला जातोय, हा कुठला राजधर्म? - सोनिया गांधी
"देशातील दलित बंधू-भगिनींवर अत्याचार होत आहेत. कायद्याचा सन्मान करण्याऐवजी, मुलींना सुरक्षा देण्याऐवजी भाजप सरकार गुन्हेगारांना पाठीशी घालतंय," असा आरोप काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केला आहे. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.
तसंच, सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून म्हटलं, "पीडित कुटुंबाचा आवाज दाबला जात आहे. हा कोणता राजधर्म आहे?"
काँग्रेसचे नवनियुक्त सरचिटणीस आणि प्रभारी यांना मार्गदर्शन करताना सोनिया गांधी यांनी विविध मुद्द्यांवरून मोदी सरकारवर टीका केली.
भारताची लोकशाही सर्वात कठीण काळातून जात असल्याची खंतही सोनिया गांधी यांनी व्यक्त केली.
3) 'रिपब्लिक'ने गोपनीय माहितीचा दुरुपयोग केला - BARC
रिपब्लिक वृत्तवाहिनीने खासगी संभाषण आणि ईमेल संवादातील गोपनीय माहिती उघड केली आणि त्याचा दुरुपयोग करत विपर्यास केला, असं म्हणत ऑडियन्स रिसर्च काऊन्सिल (BARC) ने नाराजी व्यक्त केली आहे. न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दिली आहे.
BARC ने पत्रक काढून ही नाराजी व्यक्त केली आहे. या पत्रकात BARC ने म्हटलंय, "TRP घोटाळ्याबाबत मुंबई पोलीस चौकशी करत आहेत. चौकशी सुरू असल्याने BARC त्याबद्दल कुठलीही प्रतिक्रिया व्यक्त करत नाही. चौकशी संस्थांना BARC 'सहकार्य करत आहे."
'रिपब्लिक'बाबत BARC ने म्हटलंय की, "खासगी संभाषण आणि ईमेलद्वारे झालेल्या गोपनीय संवादाचा दुरुपयोग करणं आणि चुकीच्या पद्धतीने सादरीकरण करणं योग्य नाही. त्याबद्दल आम्ही नापसंती व्यक्त करत आहोत. अशी कृती व्यवसायिक मूल्यांशी प्रतारणा केल्यासारखी आहे."
BARC च्या पत्रकावर रिपब्लिक वाहिनीकडून अद्याप कोणती प्रतिक्रिया आलेली नाही.
4) प्रायश्चित्त म्हणून भगतसिंह कोश्यारींनी राजीनामा द्यावा - अर्जुन खोतकर
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या पत्रातील 'सेक्युलर' शब्दाच्या उल्लेखाबाब नाराजी व्यक्त केल्यानंतर आता शिवसेना आक्रमक झाली आहे. शिवसेनेचे माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी भगतसिंह कोश्यारींच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दिली आहे.
"जेव्हा त्यांच्याच पक्षाचे वरिष्ठ नेते म्हणतात की त्यांचं चुकलं, तर मग राज्यपाल महोदयांनी प्रायश्चित्त म्हणून तात्काळ राजीनामा दिला पाहिजे. त्यांना एक क्षणही त्या पदावर राहण्याचा काहीच अधिकार नाही," असं अर्जुन खोतकर म्हणाले.
दोनच दिवसांपूर्वी न्यूज 18 वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या पत्रावर नाराजी व्यक्त केली. हे पत्र मंदिर उघडण्याबाबत कोश्यारींनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलं होतं.
5) महिलांच्या लोकल प्रवासावर भाजप गप्प का? - सचिन सावंत
मुंबईसह MMR भागातील महिलांना नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून लोकल प्रवास करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली असताना रेल्वेकडून वेळकाढूपणा केला जात आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला. झी 24 तासनं ही बातमी दिली आहे.
"राज्य सरकार, महापालिका आणि रेल्वे अधिकाऱ्यांच्या बैठकीत महिलांच्या प्रवासाबाबत निर्णय आधीच झाला होता. असं असताना स्वत:च्या अधिकारात निर्णय घेता येत असतानाही जाणीवपूर्वक टाळाटाळ केली जात आहे," असा आरोपही सचिन सावंत यांनी केला.
"मंदिरे उघडा म्हणून बोंब ठोकणाऱ्या भाजपला नवरात्रोत्सवात आपल्या दुर्गाशक्ती माय भगिनींकरिता लोकल चालू होईल, याची तमा नाही का?" असाही सवाल सचिन सावंत यांनी विचारला आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)