IPL 2020: सुपर ओव्हरही टाय झाली तर काय?

सुपर ओव्हर

फोटो स्रोत, NurPhoto

फोटो कॅप्शन, सुपर ओव्हर

इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेत मुंबई-पंजाब मॅच टाय झाली. त्यानंतर झालेली सुपर ओव्हरही टाय झाली. सुपर ओव्हरही टाय झाली तर काय होतं?

इंडियन प्रीमिअर लीगच्या मुंबई-पंजाब लढतीत इतिहास घडला. मुंबई-पंजाब लढत टाय झाली. विजेता ठरवण्यासाठी सुपर ओव्हर खेळवण्यात आली. सुपर ओव्हरही टाय झाली.

आयपीएल 2020 च्या नियमांनुसार सुपर ओव्हर टाय झाल्यास पुन्हा सुपर ओव्हर खेळवण्यात येते. दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये पंजाबने बाजी मारली आणि रविवारी संध्याकाळी सुरू झालेली ट्वेन्टी-20 मॅच पाच तासांनी घड्याळात सोमवार सुरू झाल्यानंतर संपली. सुपर ओव्हर टाय झाली तर काय नियम यावरून सोशल मीडियावर रणकंदन माजलं.

सुपर ओव्हर टाय झाली तर काय?

आयपीएल रुलबुक नियम 16.3.1 नुसार, मॅच निर्धारित ओव्हर्समध्ये टाय झाली तर सुपर ओव्हर खेळवण्यात येईल. सुपर ओव्हरही टाय झाली तर, विजेता स्पष्ट होईपर्यंत सुपर ओव्हर्स खेळवण्यात येतील. (अपवादात्मक परिस्थितीत सुपर ओव्हर खेळवण्यासारखी परिस्थिती नसेल तर मॅच टाय स्थितीत संपेल.)

ख्रिस गेल

फोटो स्रोत, BCCI/IPL

फोटो कॅप्शन, ख्रिस गेल

आयपीएलमध्ये असं आधी घडलं आहे का?

आयपीएल 2008 मध्ये सुरू झालं. 2008-2020 या तेरा वर्षांच्या कालावधीत पहिल्यांदाच सुपर ओव्हर टाय होण्याचा प्रसंग उद्भवला. त्यामुळे सुपर ओव्हर टाय झाली तर काय या नियमावरून सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा रंगली.

विदेशी खेळाडू खेळत असले तरी आयपीएल ही बीसीसीआयतर्फे आयोजित स्थानिक स्पर्धा आहे. त्यामुळे या स्पर्धेसाठी स्वतंत्र रुलबुक अर्थात नियमावली आहे. आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-२० मॅचेस तसंच आयसीसीतर्फे आयोजित ट्वेन्टी-२० स्पर्धेत नियम वेगळे असतात.

सुपर ओव्हर

फोटो स्रोत, IPL Rulebook

फोटो कॅप्शन, सुपर ओव्हरसंदर्भात आयपीएलचा नियम

सुपर ओव्हरचे नियम काय असतात?

  • सुपर ओव्हरमध्ये दोन्ही संघांना एकेक ओव्हर टाकायची असते.
  • सुपर ओव्हरसाठी दोन्ही संघांकडून प्रत्येकी तीन बॅट्समन आणि एक बॉलर निश्चित केले जातात.
  • सुपर ओव्हरमध्ये दोन विकेट्स गेल्यानंतर डाव संपुष्टात येतो. म्हणजे सुपर ओव्हरमध्ये तीनच बॅट्समन बॅटिंग करू शकतात. तीनपैकी दोन बॅट्समन आऊट झाल्यानंतर इनिंग्ज संपते.
  • मॅच टाय झाल्यानंतर लगेचच सुपर ओव्हर खेळवण्यात येते. रणनीती ठरवणं, अल्प विश्रांती, बॅट्समनला तयारी यासाठी दहा मिनिटांचा चेंजओव्हर दिला जातो.
  • ज्या खेळपट्टीवर मॅच झाली त्याच खेळपट्टीवर सुपर ओव्हर खेळवण्यात येते.
  • मूळ मॅचमध्ये दुसरी बॅटिंग करणाऱ्या संघाला सुपर ओव्हरमध्ये पहिल्यांदा बॅटिंग करण्याची संधी मिळते.
  • सुपर ओव्हरमध्येही दोन्ही संघांना एकेक रिव्ह्यू मिळतो.
  • फिल्डिंग करणारी टीम कुठल्या एन्डने बॉलिंग करायची हे ठरवू शकते.
  • मूळ मॅचच्या शेवटच्या ओव्हरमध्ये फिल्डिंगचे जे नियम लागू होते ते सुपर ओव्हरला लागू होतील.
  • सुपर ओव्हर टाय झाल्यास, पुन्हा सुपर ओव्हर किंवा ओव्हर्स (स्पष्ट विजेता स्पष्ट होईपर्यंत) खेळवण्यात येतील.
  • आधीच्या सुपर ओव्हरमध्ये दुसऱ्यांदा बॅटिंग करणारा संघ पुढच्या सुपर ओव्हरमध्ये दुसऱ्यांदा बॅटिंग करतो.
  • आधीच्या सुपर ओव्हरमध्ये आऊट झालेले बॅट्समन पुढच्या सुपर ओव्हरमध्ये खेळू शकणार नाहीत. उदाहरणार्थ मुंबई-पंजाब मॅचनंतरच्या पहिल्या सुपर ओव्हरमध्ये क्विंटन डी कॉक, पंजाबकडून के.एल राहुल आऊट झाले. त्यामुळे दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये त्यांना बॅटिंगची संधी मिळाली नाही. पहिल्या सुपर ओव्हरमध्ये नॉटआऊट राहिलेल्या बॅट्समनला दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये खेळण्याची संधी मिळते.
  • पहिली सुपर ओव्हर टाकणारे बॉलर दुसरी ओव्हर टाकू शकत नाही. मुंबईकडून पहिली सुपर ओव्हर जसप्रीत बुमराहने तर पंजाबकडून मोहम्मद शमीने टाकली होती. दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये हे दोघे बॉलिंग टाकू शकत नाहीत. म्हणूनच दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये मुंबईकडून ट्रेंट बोल्ट तर पंजाबकडून ख्रिस जॉर्डन यांनी बॉलिंग केली.
सुपर ओव्हर

फोटो स्रोत, IPL Rulebook

फोटो कॅप्शन, आयपीएल सुपर ओव्हर नियम

अपवादात्मक परिस्थिती असल्यास?

  • अपवादात्मक परिस्थितीत सुपर ओव्हर खेळवता येणार नाही अशी परिस्थिती उद्भवल्यास मॅच टाय म्हणून घोषित करण्यात येते आणि गुण विभागले जातात.
  • ठराविक वेळेत फ्लडलाईट्स बंद करण्याचा नियम असेल, तर किती सुपर ओव्हर्स खेळवायच्या याचा निर्णय मॅचरेफरी आणि अंपायर्स घेऊ शकतात.
  • सुपर ओव्हरसाठी साठ मिनिटांचा म्हणजेच एक तासाचा कालावधी दिलेला असतो. यामध्ये दोन ओव्हर, चेंजओव्हरसाठीचा वेळ गृहित धरलेला असतो.

सुपर ओव्हर्सचा सुपर संडे

रविवारी पहिली मॅच हैदराबाद-कोलकाता यांच्यात रंगली. ही मॅच टाय झाली. सुपर ओव्हरद्वारे या मॅचचा विजेता ठरला. कोलकाताने पहिल्यांदा बॅटिंग करताना 163 रन्स केल्या. आयोन मॉर्गन-दिनेश कार्तिकची भागीदारी महत्त्वाची ठरली. सलामीऐवजी चौथ्या क्रमांकावर आलेल्या डेव्हिड वॉर्नरच्या 47 रन्सच्या जोरावर हैदराबादने 163 रन्स केल्या. लॉकी फर्ग्युसनने तीन विकेट्स घेतल्या.

लॉकी फर्ग्युसन

फोटो स्रोत, BCCI/IPL

फोटो कॅप्शन, लॉकी फर्ग्युसन कोलकाताच्या विजयाचा शिल्पकार ठरला.

सुपर ओव्हरमध्ये लॉकी फर्ग्युसनने डेव्हिड वॉर्नर आणि अब्दुल समदला आऊट करत हैदराबादचा डाव संपुष्टात आणला. कोलकाताकडून मॉर्गन-कार्तिक जोडीने हे लक्ष्य पेललं.

मुंबई-पंजाब लढतीत मुंबईने कायरेन पोलार्ड-नॅथन कोल्टिअर नील यांच्या 21 बॉलमध्ये 57 रन्सच्या भागीदारीच्या जोरावर 176 रन्स केल्या. पंजाबने कर्णधार राहुलच्या 77 रन्सच्या बळावर मॅच जिंकण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र दडपणाच्या क्षणी झालेल्या चुकांमुळे मॅच सुपर ओव्हरमध्ये गेली.

मयांक अगरवाल

फोटो स्रोत, BCCI/IPL

फोटो कॅप्शन, मयांक अगरवाल

मुंबईकडून बुमराहने टाकलेल्या ओव्हरमध्ये पंजाबला 5 रन्स करता आल्या. बुमराहने यॉर्कर्सचा मारा केला. पंजाबकडून मोहम्मद शमीनेही यॉर्कर्सचा भडिमार केला. पोलार्डचा षटकार मारण्याचा प्रयत्न मयांक अगरवालने अफलातून फिल्डिंगच्या जोरावर रोखला. शेवटच्या बॉलवर निकोलस पूरनच्या थ्रोवर राहुलने भन्नाट स्टंपिंग करत क्विंटनला आऊट केलं आणि सुपर ओव्हर टाय झाली.

दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये मुंबईने 11 रन्स केल्या. ख्रिस गेलच्या षटकाराने पंजाबचं दडपण कमी झालं. मयांक अगरवालने चौकार खेचत पंजाबच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

अशा प्रकारे आयपीएल स्पर्धेत एकाच दिवशी दोन्ही मॅचचा निर्णय सुपर ओव्हरने ठरण्याची ही पहिलीच वेळ आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुपर ओव्हर टाय झाली तर काय होतं?

आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-20 क्रिकेटमध्ये मॅच टाय झाल्यानंतर बोलआऊटची व्यवस्था होती. मात्र आयसीसीने नियम बदलला आणि सुपर ओव्हर खेळवण्यात येऊ लागली.

गेल्या वर्षी वर्ल्ड कप फायनलमध्ये काय झालं होतं?

गेल्या वर्षी 50 ओव्हर्सच्या वर्ल्ड कप फायनलमध्ये इंग्लंड-न्यूझीलंड मॅच टाय झाली. वर्ल्डकप ही आयसीसीतर्फे आयोजित होणारी स्पर्धा आहे. या स्पर्धेला आयसीसीतर्फे ठरवण्यात आलेले नियम लागू असतात.

मॅच टाय झाल्याने सुपर ओव्हर खेळवण्यात आली. मात्र ही सुपर ओव्हरही टाय झाली. आयसीसी वर्ल्डकप 2019च्या नियमांनुसार सुपर ओव्हर टाय झाल्यास सर्वाधिक चौकार-षटकार लगावणाऱ्या संघाला विजयी घोषित करण्यात येतं.

त्या सुपर ओव्हरमध्ये इंग्लंडने 15 रन्स केल्या. न्यूझीलंडलाही 15च रन्स करता आल्या. मात्र मॅच आणि सुपर ओव्हर पकडून इंग्लंडने 26 चौकार-षटकार ठोकले होते तर न्यूझीलंडने 17 चौकार-षटकार लगावले होते. त्यामुळे न्यूझीलंडने सुपर ओव्हर टाय करताच इंग्लंडच्या विजयावर शिक्कामोर्तब झालं.

मात्र चौकारांच्या संख्येवरून विजेता घोषित करण्याच्या नियमावर प्रचंड टीका झाली. त्यानंतर आयसीसीने नियम बदल केला. सुधारित नियमानुसार, आयसीसी स्पर्धांमध्ये प्राथमिक फेरीत मॅच टाय झाल्यास, गुण विभागून दिले जातील. बाद फेरीत मॅच टाय झाल्यानंतर सुपर ओव्हर होईल. सुपर ओव्हरही टाय झाल्यास, विजेता स्पष्ट होईपर्यंत सुपर ओव्हर्स खेळवण्यात येतील.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)