You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
नरेंद्र मोदी यांची संपत्ती नेमकी किती आहे? ते त्यांचे पैसे कुठे गुंतवतात?
नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या मंत्रिमंडळातील इतर नेत्यांसोबत त्यांच्या संपत्तीचाही तपशील जाहीर केला आहे. त्यानुसार त्यांच्याकडे जूनच्या अखेरपर्यंत तब्बल 2.85 कोटी रुपयांची मालमत्ता आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत हा आकडा सुमारे 36 लाखांनी वाढला आहे, 2019 मध्ये त्यांनी जाहीर केलेली संपत्ती 2.49 कोटींची होती.
जून 2020च्या संपत्तीकडे पाहिलं तर त्यापैकी 31450 कॅश आहे. त्यांच्या बचत खात्यात 3.38 लाख रुपये होते
तर त्यांच्या ठेवींचं मूल्य गेल्या वर्षीच्या सुमारे 1 कोटी 27 लाखांवरून आता 1 कोटी 60 लाखांवर पोहोचलं आहे.
नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या इतर संपत्तीत त्यांच्याकडे चार सोन्याच्या अंगठ्या आहेत, ज्यांचं एकूण वजन 45 ग्राम किंवा साडेचार तोळे इतकं आहे. त्यांचं मूल्य दीड लाख रुपये सांगण्यात आलं आहे.
याशिवाय त्यांच्या नावे गांधीनगरमध्ये 1.1 कोटी रुपये मूल्याचा एक प्लॉट आहे, मात्र या प्लॉटचे त्यांच्या कुटुंबातील आणखी तीन व्यक्ती भागीदार आहेत.
3531 स्क्वेअर फुटाचा हा प्लॉट त्यांनी 2002 मध्ये विकत घेतला होता, तेव्हा त्याचं मूल्य 1.30 लाख रुपये होतं, असं सांगण्यात आलंय.
याशिवाय, त्यांच्या नावावर कोणतंही वाहन नाही, आणि त्यांनी कुठल्या शेअर्समध्येही गुतवणूक केलेली नाही.
या जाहीर केलेल्या संपत्तीतून असंही दिसतं की त्यांनी विमा, नॅशनल सेव्हिंग्स सर्टिफिकेट आणि इन्फ्रास्टक्चर बाँड्समध्ये गुंतवणूक केली आहे.
मोदींकडे आजच्या घडीला 8 लाख 43 हजार रुपयांचे नॅशनल सेव्हिंग्स सर्टिफिकेट आहेत, तसंच त्यांनी आजवर दीड लाख रुपयांचे विम्याचे प्रीमियम भरले आहेत.
त्यांनी L&T इन्फ्रास्टक्चर बाँड्समध्ये 2012 साली 20 हजार रुपये गुंतवले होते, ज्याची मॅच्युरिटी अद्याप झालेली नाही.
असं करून एकत्रितपणे मोदींकडे जवळपास 2 कोटी 85 लाख 63 हजार 618 रुपयांची संपत्ती आहे.
मोदींनी त्यांच्या या जाहीरनाम्यात त्यांच्या पत्नी म्हणून जसोदाबेन यांचं नाव लिहिलं आहे, मात्र त्यांच्या संपत्तीच्या सर्व रकान्यांमध्ये Not Known अर्थाता माहीत नाही, असं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे जसोदाबेन यांच्याकडे काय संपत्ती आहे, त्याचं मूल्य काय, याची कल्पना यातून येत नाही..
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)