You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अॅमेझॉन-फ्लिपकार्ट मनसेः ऑनलाईन व्यवहारांमध्ये मराठीचा वापर कमी का आहे?
अॅमेझॉन - फ्लिपकार्ट या कंपन्यांनी त्यांच्या अॅप्समध्ये मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलेली आहे. पण ऑनलाईन जगामध्ये मराठीच्या वापराबद्दल आताची परिस्थिती काय आहे? आणि ऑनलाईन सेवा मराठीत आणण्यातल्या अडचणी काय आहेत?
ई कॉमर्स कंपन्यांनी त्यांच्या अॅपमध्ये विविध सेवा, खरेदी आणि माहिती मिळवण्यासाठीच्या भाषांच्या पर्यायामध्ये मराठीला डावललं असून ही माहिती मराठीतूनही मिळण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे.
मनसेचे पदाधिकारी अखिल चित्रे यांनी ई-कॉमर्स कंपन्यांना याविषयीची मागणी करणारं पत्रं दिलंय. याविषयीचं ट्वीटही त्यांनी केलेलं आहे. बंगळुरूमध्ये स्थित असणाऱ्या या कंपन्यांनी दक्षिणी भाषांना प्राधान्य देत महाराष्ट्रात मराठी भाषेला डावलल्याचं त्यांनी या ट्वीटमध्ये म्हणतं आंदोलनाचा इशारा दिलाय.
अॅमेझॉनच्या अॅपवर सध्या इंग्लिशसोबतच हिंदी, तेलुगु, तमिळ, कन्नड आणि मल्याळम या भाषांचा पर्याय उपलब्ध आहे.
तर फ्लिपकार्टच्या अॅपवर हिंदी, इंग्लिश, तमिळ, तेलुगु आणि कन्नड भाषांचा पर्याय उपलब्ध आहे.
मनसेच्या या मागणीविषयी फ्लिपकार्टच्या अधिकृत प्रवक्त्यांनी बीबीसी मराठीला सांगितलं, "पुढच्या काही महिन्यांमध्ये आम्ही ग्राहकांसाठी आमच्या प्लॅटफॉर्मवर सध्याच्या भाषांसोबतच इतरही अनेक भाषांचे पर्याय घेऊन येणार आहोत. भारतात आम्ही स्थानिक भाषा आणि व्हॉईस सोल्यूशनमध्ये सातत्याने गुंतवणूक करत आहोत.
ज्या ग्राहकांना त्यांच्या स्वतःच्या भाषेत व्यवहार करायचे आहेत, असे नवे ग्राहक ई-कॉमर्सशी जोडले गेल्यास त्याचा फायदा भारतातल्या लघु आणि मध्यम उद्योगांना आणि कारागिरांनाही होईल. यामुळे त्यांना आतापेक्षा मोठी बाजारपेठ उपलब्ध होईल."
याच मुद्द्याविषयीची अॅमेझॉनची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी बीबीसी मराठीने अॅमेझॉनला संपर्क साधला. पण ही बातमी लिहीपर्यंत अॅमेझॉनचं उत्तर आलेलं नाही.
इंटरनेटवरच्या भारतीय भाषांमधल्या युजर्सचं प्रमाण
भारतीय भाषांमधल्या इंटरनेट युजर्सबद्दलचा एक पाहणी अहवाल केपीएमजी आणि गुगलने 2017मध्ये प्रसिद्ध केला होता. भारतातल्या इंटरनेटच्या प्रसारामध्ये यापुढे भारतीय भाषांची भूमिका महत्त्वाची असेल आणि 2021पर्यंत इंग्लिश इंटरनेट युजर्सपेक्षा भारतीय भाषांमध्ये इंटरनेट वापरणाऱ्यांचं प्रमाण 2.5 पटींनी जास्त असेल, असं यात म्हटलं होतं.
पुढच्या (2017 नंतरच्या) 5 वर्षांच्या काळात भारतातल्या 10 पैकी 9 इंटरनेट युजर्स हे भारतीय भाषांमध्ये इंटरनेटचा वापर करणारे असतील असंही या रिपोर्टमध्ये म्हटलं होतं.
2017च्या या अहवालातल्या आकडेवारीनुसार 2021मधल्या एकूण इंटरनेट युजरबेसपैकी 30% युजर्स मराठी, बंगाली, तामिळ आणि तेलुगु असतील.
मराठी भाषिक खरंच मराठीला प्राधान्य देतात का?
एकच सेवा विविध भाषांमध्ये उपलब्ध असेल, तर मराठी भाषिक ती सेवा मराठीत वापरण्याला प्राधान्य देतात का? History TV 18 हे चॅनल मराठीतही सुरू करण्यात आलं होतं. हे चॅनल सुरू करणाऱ्या रितू कपूर यांनी बीबीसी मराठीला सांगितलं, "या चॅनलला अजिबातच व्ह्यूअरशिप नव्हती. मराठी प्रेक्षक हिंदीच चॅनल बघत असल्याचं आमच्या लक्षात आलं. वर्षभर चॅनल सुरू ठेवल्यानंतर शेवटी ते बंद करण्यात आलं."
पुरेसे वाचक नसल्याने कित्येक मराठी ब्लॉग्स बंद पडल्याचं मराठी सृष्टी डॉट कॉमचे संस्थापक आणि फाँट फ्रीडमचे निर्माते निनाद प्रधान सांगतात. ते म्हणतात, "अनेकदा वाचक नाहीत, म्हणून लिखाण कमी होतं. ताजं लिखाण नाही म्हणून कमी वाचक येतात. या दोन्हींचा एकत्र परिणाम म्हणून त्यातून रेव्हेन्यू मिळत नाही आणि तो ब्लॉग कालांतराने बंद पडतो."
पण मग विविध सेवा पुरवणाऱ्या वेबसाईट्सचं वा सेवांचं काय? मराठी युजर्स आपसूक त्या पर्यायाकडे वळतात का? निनाद प्रधान सांगतात, "सध्या दुर्दैवाने असं होत नाही, मराठीचा ऑप्शन जरी असला तरी तो आपण वापरत नाही.
अॅप्स आणि सर्व्हिसेसच्या बाबत हे होतं. बातम्या आणि लेख मराठीत वाचले जातील. पण सर्व्हिसेसच्या मराठी वापरण्याचं प्रमाण तेवढं जास्त नाही. तसेच मराठीत सेवा देणारे सर्व्हिस प्रोव्हायडर्सही कमी आहेत.
अनेकदा मराठीचा पर्याय निवडूनही समोरचा माणूस हिंदी वा इंग्लिशमध्ये बोलतो. जोपर्यंत पर्याय दिला जात नाही, तोपर्यंत लोकं तो वापरणार नाहीत. आणि जोपर्यंत लोक त्याचा आग्रह धरत नाहीत, तोपर्यंत सेवा मराठीत येणार नाहीत."
केपीएमजीच्या अहवालानुसार 2017मध्ये भाषिक युजर्स चॅटिंग, डिजिटल एन्टरटेन्मेंट, सोशल मीडिया, डिजिटल बातम्या, ऑनलाईन लिखाण या सगळ्यासाठी आपापल्या भाषांचा वापर सर्वात जास्त करत होते. पण पेमेंट करणं, सरकारी सेवा वापरणं, ई-कॉमर्स यासाठी भारतीय भाषांचा वापर कमी होत होता.
पण भारतीय भाषांमध्ये इंटरनेट वापरणाऱ्या युजर्सपैकी 88 % जण त्यांच्यासमोर इंग्रजीऐवजी त्यांच्या भाषेतली डिजिटल जाहिरात आल्यास त्याला प्रतिसाद देण्याची शक्यता अधिक असल्याचं 2017च्या केपीएमजीच्या अहवालात म्हटलंय.
मराठीच्या वापरातल्या इतर अडचणी काय आहेत?
भारतीय भाषांमधल्या सॉफ्टवेअर निर्मितीचे तज्ज्ञ निनाद प्रधान यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "मराठीचा फाँट हा देवनागरी असल्याने मराठीचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान होतंय. कारण लोकांना हिंदीत लिहिलेलं असलं तरी एकच फाँट असल्याने ते कळतं. ते कळत असल्याने मराठीत वेगळं देण्याची गरज पडत नाही. त्यांना समजतंय हे गृहित धरलं जातं. जर तुम्ही बंगळुरूला गेलात तर तुम्हाला त्या कन्नडमध्ये काय लिहिलंय ते कळणारच नाही. मग कन्नड शिकल्याशिवाय तरणोपाय नाही.
"सर्व्हिस प्रोव्हायडर्सचं तसंच झालंय. त्यांच्या साईटवर हिंदीत असलं, तरी लोकांना कळतंय. दाक्षिणात्य लोकांना हिंदी कळत नाही, असं नाही. त्यांच्यातल्या बऱ्याच जणांना कळतं. परंतु ते स्वतःच्या भाषेबद्दल आग्रही असतात. आणि ते 'रीजिड' असल्याने ते हिंदीतलं चालवून घेत नाही. आणि या युजरबेसचं समाधान करण्यासाठी मग त्यांच्या भाषेत सेवा दिली जाते."
मग अनेक सरकारी वेबसाईट्ससह इतर ठिकाणीही मराठीत माहिती उपलब्ध असताना इंग्रजीला प्राधान्य का दिलं जातं?
"कंटेन्ट क्रिएटरने किंवा अनुवाद करणाऱ्याने ही काळजी घ्यायला हवी, की जे लिहीलेलं आहे, ते लोकांनी वाचण्यासारखं आणि समजण्यासारखं हवं. इंग्रजी शब्द भाषेत रुळलेले असतील तर ते इंग्रजी शब्दच वापरा. पण अनेकदा पूर्ण - शुद्ध मराठीचा आग्रह धरला जातो. पण लोकांना जर ते मराठी कळत नसेल तर काय?
बहुसंख्य कंन्टेन्ट क्रिएटर्स हे गुगल ट्रान्सलेटचा आधार घेतात आणि विचित्र भाषांतर होतं. त्यामुळे अशा प्रकारचं मराठी वाचण्यापेक्षा इंग्लिश वाचलं जातं. आणि ज्या माणसाला इंग्लिश समजत नाही, त्याच्यासाठी तो मजकूर मराठीत हवा, आणि त्याला समजणाऱ्या मराठीत तो असायला हवा. तर ऑनलाईन जगातला मराठीचा वापर वाढेल," असं निनाद प्रधान सांगतात.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)