देवेंद्र फडणवीस यांच्या जलयुक्त शिवार योजनेची उद्धव ठाकरे सरकार करणार चौकशी

देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे

फोटो स्रोत, facebook

जलयुक्त शिवार योजनेची एसआयटीमार्फत चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.

"जलयुक्त शिवार योजनेवर नऊ हजार कोटींहून अधिक खर्च झाला होता. मात्र कॅगच्या अहवालानुसार पाण्याची पातळी वाढली नाही. नऊशे टक्क्यांच्या वर निविदा काढण्यात आली. आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत या योजनेची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली," असं गुलाबराव पाटील यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना म्हटलं.

जलयुक्त शिवार योजना असताना पाण्याची पातळी किती वाढली, जलयुक्त शिवार नसताना संबंधित भागात किती टँकर मागवावे लागायचे आणि आता किती टँकर लागतात, या अनुषंगाने ही चौकशी करण्यात येईल, असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं.

महाराष्ट्र राज्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 26 जानेवारी 2015ला जलयुक्त शिवार योजना सुरू केली होती.

पाऊस पडल्यानंतर गावागावांत पाण्याचे कायमस्वरूपी स्रोत निर्माण करायचे, जेणेकरून अधिक जमीन सिंचनाखाली येईल आणि दुष्काळाची झळ बसणार नाही, असं उद्दिष्ट जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत ठेवण्यात आलं होतं.

या योजनेच्या अंमलबजावणीवरून कॅगनं (नियंत्रक आणि महालेखा परिक्षक) तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारवर ताशेरे ओढले होते. कॅगचा अहवाल 8 सप्टेंबरला विधीमंडळात सादर करण्यात आला होता. जलयुक्त शिवार योजनेवर 9633.75 कोटी रुपये खर्च करण्यात आले असतानाही पाण्याची गरज भागवण्यात आणि भूजल पातळी वाढवण्यात सरकारला अगदी थोडं यश मिळालं आहे, असं कॅगच्या अहवालात म्हटलं आहे.

ही चौकशी राजकीय सूडबुद्धीने- आशिष शेलार

हे सर्व राजकीय सूडबुद्धीने सुरू आहे. त्यामागे कुहेतू आहे, अशी प्रतिक्रिया भाजप नेते आशिष शेलार यांनी व्यक्त केली आहे.

चौकशी होऊ दे, हातच्या काकणाला आरसा कशाला? अहवाल आल्यावर आघाडी सरकार तोंडावर आपटेल, असंही आशिष शेलार यांनी म्हटलं.

आशिष शेलार

फोटो स्रोत, Getty Images

आशिष शेलार यांनी म्हटलं, "ज्या पध्दतीने मेट्रो कारशेडसाठी नेमलेल्या समितीच्या अहवालानंतर आघाडी सरकार तोंडावर पडले तसेच याही चौकशीतून होईल. आम्ही मेट्रो कारशेडचा खरा अहवाल उघड केला. सरकारचा हट्ट उघडा पाडला त्यामुळे हे उघडे पडले. आता ते झाकण्यासाठी अशा धडपडी सुरु आहेत.

आशिष शेलार यांनी कॅगच्या अहवालावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.

त्यांनी म्हटलं, "राज्यात जलयुक्त शिवारची एकूण 6,41,560 कामं झाली. त्यापैकी कॅगने तपासलेली कामे 1128 इतकी आहेत. म्हणजेच केवळ 0.17 टक्के कामांवरून कँगने संपूर्ण जलयुक्त शिवारचे केलेले मूल्यमापन विश्वासार्ह कसे ठरेल? याचा अर्थ 99.83 टक्के कामं तपासलीच नाहीत. जलयुक्त शिवारची कामे 22,589 गावांमध्ये झाली. त्यातील कॅगने तपासली केवळ 120 गावांमध्ये. याचा अर्थ केवळ 0.53 टक्के गावं पाहिली गेली. 99.47 टक्के गावांमध्ये न जाताच तयार केलेला अहवाल वस्तुस्थितीदर्शक नव्हता."

अहवालात अजून काय म्हटलं?

डिसेंबर 2019मध्ये फडणवीस सरकार सत्तेत असतानाच कॅगनं जलयुक्त शिवार मोहिमेच्या कामाचं मूल्यमापन केलं होतं. या अहवालातील निष्कर्ष यंदाच्या जूनमध्ये राज्य सरकारला सादर करण्यात आले होते.

जलयुक्त शिवार

फोटो स्रोत, CMO MAHARASHTRA

  • जलयुक्त शिवार मोहिमेअंतर्गत 22,586 गावांमध्ये 6.41 लाख कामे सुरू करण्यात आली. यापैकी 98 टक्के म्हणजेच 6.3 लाख कामं पूर्ण करण्यात आली. यासाठी 9,633.75 कोटी रुपये खर्च करण्यात आले होते.
  • या योजनेची अंमलबजावणी करताना त्यात पारदर्शकतेचा अभाव आणि राज्य पाणीपुरवठा विभागाचं अपुरं नियंत्रण होतं, असंही या अहवालात म्हटलं आहे.
  • या अभ्यासासाठी निवडण्यात आलेल्या 120 गावांपैकी 83 गावांमध्ये ग्रामविकास आराखड्यात नमूद केल्याप्रमाणे पाण्याचा पुरेसा साठा निर्माण झालेला नाही.
  • जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत अंमलबजावणीच्या प्रगतीवर लक्ष ठेवण्यासाठी जिल्हा अधिकाऱ्यांना नियमितपणे कामाचा अहवाल मिळाला नाही.
  • ज्या 80 गावांना पाण्यानं स्वयंपूर्ण झाल्याचं जाहीर केलं होतं, त्यापैकी केवळ 29 गावांनी हे स्टेटस पूर्ण केलं. उरलेली 51 गावं अजूनही पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झालेली नाहीयेत.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)