IPL : 'पराभवानंतर अनुष्काला दोष देता, मग विजयाचं श्रेयही द्या'

विराट कोहलीसाठी शनिवारचा (10 ऑक्टोबर) दिवस स्पेशल होता. मैदानावरची फलंदाजी तर धडाकेबाज होतीच, पण त्याच्या चेहऱ्यावरील हास्यही स्पेशल होतं. अगदी आनंद जाहीर करण्याची स्टाईलही स्पेशल आणि चेन्नईविरोधात मिळवलेला विजयही स्पेशल.

इतकं 'स्पेशल' का, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. सहाजिक आहे. पण याचं उत्तर खरंतर सोशल मीडिया युजर्सनीच शोधलं आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर्सचा कर्णधार असलेल्या विराट कोहलीने काल म्हणजे शनिवारी आयपीएलच्या 13 व्या हंगामातील आपल्या सर्वाधिक धावांची नोंद केली. विराटने नाबाद 90 धावा केल्या.

तसंच, कर्णधार म्हणून विराटनं चेन्नई सुपर किंग्जविरोधातील आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय (37 धावांनी) मिळवला.

हे इतकंच कारण विराटसाठी कालचा दिवस 'स्पेशल' असण्याला होतं का? तर विराटच्या चाहत्यांच्या मते, तसं नाहीय. विराटच्या 'स्पेशल' दिवसाचं कारण चाहत्यांनी शोधलंय.

विराटच्या चाहत्यांच्या मते, त्याच्या 'स्पेशल शो'चं सर्व श्रेय जातं विराटच्या पत्नीला, म्हणजेच अभिनेत्री अनुष्का शर्माला.

अनुष्का शर्मा शनिवारी (10 ऑक्टोबर) दुबईतील सामना पाहण्यासाठी हजर होती. विराटच्या चाहत्यांच्या दाव्यानुसार, ब्रॉडकास्टरने कॅमेऱ्यात अनुष्काला दाखवल्यानंतर सामन्याचं चित्र अगदी 180 अंशात बदललं.

अर्थात, सामन्याची दिशाच बदलण्याला अनुष्काची उपस्थिती किती कारणीभूत, हे काही आपल्याला सांगता येणार नाही. मात्र, हे खरंय की, शनिवारी विराट कोहलीच्या खेळीमध्ये अगदी दोन भाग दिसले.

बंगळुरूच्या संघाने 16 ओव्हरमध्ये केवळ 103 धावा केल्या होत्या. यात विराट कोहलीने 30 चेंडूत 34 धावा केल्या होत्या. मात्र, पुढच्या 22 चेंडूत विराटच्या फलंदाजीने अक्षरश: कमाल केली आणि 52 चेंडूत नाबाद 90 धावा नावावर केल्या. शेवटच्या चार ओव्हरमध्ये बंगळुरूच्या संघाने 66 धावा करून धावसंख्या 169 वर पोहोचवली.

विराटच्या चाहत्यांच्या मते, जर अनुष्का उपस्थित असताना विराटची कामगिरी वाईट झाली, तर सोशल मीडियावरून तिला दोष दिलं जातं, मग आता तिला श्रेयही दिलं गेलं पाहिजे.

प्रत्येक भूमिकेत विराट हिट

विराटनं एकीकडे धडाकेबाज फलंदाजी, तर दुसरीकडे कर्णधारपदही योग्यपणे सांभाळलं.

दुबईतल्या सामन्यासाठी संघात क्रिस मॉरिसला समाविष्ट करण्याचा निर्णय फायद्याचा ठरला. मॉरिसनं केवळ 19 धावा देत तीन विकेट्स घेतल्या. तसंच, 16 धावा देऊन दोन विकेट्स घेणाऱ्या वॉशिंग्टन सुंदरही महत्त्वाचा ठरला.

सहा सामन्यात चार विजय मिळवून विराट कोहलीच्या संघानं दोन अंकी गुण मिळवले असून, क्रमवारीत चौथ्या स्थानावर संघ पोहोचला आहे.

चेन्नईविरोधात मोठ्या फरकाने विजय मिळवल्याने रन रेटही सुधारला आहे.

धोनीचं 'मॅजिक' हरवलं?

दुसरीकडे, सर्व सामन्यात आशा पल्लवीत करणाऱ्या महेंद्रसिंग धोनी मात्र विराटच्या संघासमोर पूर्णपणे अयशस्वी ठरला.

बंगळुरूविरोधात 16 व्या ओव्हरपर्यंत धोनीची रणनीती यशस्वी दिसत होती. मात्र, एबी डिव्हिलियर्स आणि अॅरोन फिंच यांसारखे दिग्गज फलंदाज धोनीच्या रणनीतीने माघारी गेले होते. शार्दुलच्या चेंडूवर डिव्हिलियर्सची झेल तर स्वत: धोनीनेच झेलली होती.

मात्र, शेवटच्या चार ओव्हरमध्ये विराट कोहली आणि शिवम दुबे यांनी धोनीची आधीची सर्व मेहनत वाया घालवली.

गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात झालेलं नुकसान खरंतर फलंदाजीतून भरून काढता आलं असतं. मात्र, तिथेही धोनी अयशस्वी ठरला. 6 चेंडूत केवळ 10 धावाच धोनी करू शकला. शिवाय, संघातील इतरही कुणी फलंदाज फारशी चमकदार कामगिरी करू शखला नाही. त्यामुळे बंगळुरूचा विजय आणखीच सोपा झाला.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)