You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
हाथरस बलात्कारः खैरलांजी हत्याकांड खटल्याची सध्या काय परिस्थिती आहे?
- Author, प्रवीण मुधोळकर
- Role, बीबीसी मराठीसाठी
नागपूरपासून 37 किलोमीटर अंतरावरील तुमसर तालुक्यातील खैरलांजी गावात 14 वर्षांआधी 29 सप्टेंबर 2006 रोजी दलित कुटुंबातील चार जणांची दलितेतर समुहाकडून अमानुषपणे हत्या करण्यात आली होती.
संपूर्ण देशभरात या हत्याकांडाचे पडसाद उमटले होते आणि न्यायासाठी देशाच्या कानाकोपऱ्यात विविेध आंदोलनंही झाली होती.
पण चौदा वर्षानंतर या घटनेतील पीडित कुटुंबीयांपैकी कुणीही आज न्याय मिळविण्यासाठी हयात नाहीत. या हत्याकांडांतून बचावलेले भैयालाल भोतमांगे यांनी शेवटच्या श्वासापर्यंत न्यायासाठी संघर्ष केला. पण 20 जानेवारी 2017 रोजी हृदयधक्क्याने त्यांचा मृत्यू झाला. सध्या खैरलांजी गावात भयाण शांतता आहे.
नेमकं काय झालं होतं?
भंडारा जिल्हयात खैरलांजी गावातील शेतकरी भैयालाल भोतमांगे यांच्या कुटुंबात पत्नी सुरेखा, मुलगी प्रियंका, मुलगा रोशन आणि दिलीप असे पाच सदस्य होते.
गावातील सिद्धार्थ गजभिये यांचा स्थानिक गावकऱ्यांसोबत शेतातील रस्त्यांवरून वाद सुरू होता. याच गावकऱ्यांनी सिद्धार्थ गजभिये यांच्यावर हल्ला केला. त्यातून ते बचावले आणि नागपूर जिल्ह्यातील कामठी येथे गेले.
गजभिये यांनी पोलिसांत हल्लेखोर गावकऱ्यांविरोधात तक्रार दिली. याच प्रकरणात भैयालाल भोतमांगे यांची पत्नी सुरेखा भोतमांगे यांनी पोलिसांपुढे साक्ष दिली होती.
या प्रकरणात हल्लेखोर गावकऱ्यांना अटक झाली आणि नंतर ते जामिनावर सुटले. भोतमांगे कुटुंब दलित असूनही आपल्या विरुद्ध साक्ष देण्याची हिंमत हे लोक कशी काय करतात याचा राग आरोपींच्या मनात होता.
शिवाय भोतमांगे कुटुंबीय हे स्वत:च्या पायावर उभे असून सन्मानाने जगत असल्यामुळे त्याचा रागही गावातील याच दलितेतर गावकऱ्यांचा होता. त्यानंतर आरोपींचा राग अनावर झाला आणि हत्याकांडाची घटना घडली. खैरलांजी गावातील लोकसंख्या 800 च्या जवळपास आहे. यात केवळ पाच घरं आदिवासींची आणि दोन घरं दलितांची आहेत.
29 सप्टेंबरचा तो दिवस
हत्याकांडाच्या दिवशी गावातील दलितेतर लोकांच्या अकरा जणांच्या गटाने भैयालाल भोतमांगे यांच्या झोपडीला वेढा घातला. झोपडीत तेव्हा भैयालाल यांची पत्नी सुरेखा, मुलगी प्रियंका, मुलगा सुधीर आणि रोशन होते.
या समुहाने आधी भोतमांगे यांच्या झोपडीतील चौघांना अर्वाच्य शिवीगाळ केली. नंतर झोपडीवर हल्ला चढविला आणि झोपडीतील चौघांचीही अमानुषपणे हत्या केली.
त्यानंतर चारही मृतदेह शेजारील शेतात लपवून आरोपी घटनेनंतर पळून गेले होते. भैयालाल भोतमांगे हे या घटनेच्या वेळी शेतात काम करत होते त्यामुळे ते बचावले.
30 सप्टेंबर 2006 रोजी म्हणजेच घटनेच्या दुसऱ्या दिवशी सुरेखा भोतमांगे यांचा मृतदेह पोलिसांना सापडला. तर प्रियंका, सुधीर आणि रोशन यांचे मृतदेह दोन दिवसानंतर पोलिसांना सापडले. जातीय वादातून घडलेल्या या हत्याकांडाप्रकरणी भंडारा पोलिसांनी 46 आरोपींना अटक केली होती.
2006 मध्ये जनक्षोभ बघता राज्य सरकारने हे प्रकरण सीबीआयकडे सोपविले होते. यात हत्या, महिलांचा विनयभंग आणि पुरावे नष्ट करणं यासंदर्भातील कलमांन्वये 11 आरोपींविरोधात गुन्हे दाखल करून त्यासंदर्भातील आरोपपत्र न्यायालयात सादर करण्यात आले.
यावर भंडारा जलद गती न्यायालयाने या प्रकरणातील आठ आरोपींना फाशीची शिक्षा तर तीन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आरोपींकडून आव्हान देण्यात आले.
उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने हे प्रकरण दुर्मिळातील दुर्मिळ नसल्याने याचा फायदा आरोपींना देत आठ आरोपींना फाशीच्या शिक्षेएवजी जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या या निर्णयाविरोधात राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात धाव घेतली. सध्या हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे. अकरापैकी दोन आरोपींचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.
भोतमांगे कुटुंबीय
भैयालाल भोतमांगे मूळचे भंडारा जिल्ह्य़ातील तुमसरजवळच्या अंबागडचे रहिवाशी होते. खैरलांजी हे त्यांच्या मामाचं गाव होतं. याच खैरलांजी गावात भोतमांगे कुटुंबाची पाच एकर शेती होती.
भैयालाल यांच्या वडिलांच्या मृत्यूनंतर त्यातील प्रत्येकी एक एकर जागा पाच भावंडांच्या वाट्याला आली. शेती आणि शेतमजुरी करणारे भोतमांगे केवळ आठवीपर्यंत शिकलेले होते.
भोतमांगेंना आपली तीनही मुले शिकावीत असे वाटायचं. त्यासाठीच त्यांची संघर्षमय धडपड सुरू होती. पण गावातील सामाजिक विषमतेचे चटके सोसूनसुद्धा ताठमानेने जगण्याचा प्रयत्न करणाऱ्या भोतमांगे कुटुंबासाठी 2006 मधील 29 सप्टेंबरचा दिवस काळाकुट्ट ठरला.
राज्य सरकारने काय मदत केली?
तत्कालीन राज्य सरकारने भैयालाल यांना भंडारा येथील म्हाडा कॉलनीत तीन खोल्यांचं पक्के घर दिलं. तसंच त्यांना शासकीय वसतिगृहात सुरक्षारक्षकाची नोकरी देण्यात आली. त्यातून त्यांना 15 हजार रुपये महिन्याला मिळत असे. भैयालाल यांनी त्यांचे दीड एकर शेत 20 हजार रुपये प्रतिवर्ष या प्रमाणे भाडेपट्ट्याने दिले होते.
त्यांच्या उत्पन्नाचा बराचसा पैसा सर्वोच्च न्यायालयातील खटल्यासाठी दिल्ली आणि मुंबईला जाण्यात खर्च होत होता. राज्य सरकराने खैरलांजी हत्याकांडानंतर भैय्यालाल यांना कायम पोलिस सुरक्षा पुरविली होती. राज्य सरकारने या प्रकरणात विशेष सरकारी वरील ॲड. उज्वल निकम यांची नियुक्त केली होती. तर सीबीआयचे वकील ॲड. एजाज खान यांनी काम पाहिले होते.
14 वर्षानंतर खैरलांजीत काय परिस्थिती?
14 वर्षांनंतर खैरलांजी मधील भैयालाल भोतमांगे यांची राहती झोपडी पडली आहे. फक्त एक लोखंडी खाट या घटनेची साक्षीदार तेवढी उरली आहे. अमानुष हत्याकांडाची कटू आठवण म्हणून ती खाट तेथे ठेवण्यात आली आहे. भैय्यालाल भोतमांगे हयात असे पर्यंत तेही या ठिकाणी श्रद्धांजली वाहायला येत असत.
दरवर्षी 29 सप्टेंबरला भोतमांगे कुटुंबीयांना आंबेडकरवादी, दलित-बुद्धिस्ट संघटनांच्या वतीने मेणबत्ती लावून श्रद्धांजली अर्पण केली जाते.
न्यायदानातील टप्पे?
हे प्रकरण स्थानिक भंडारा पोलिसांकडून सीआयडीकडे आणि नंतर सीबीआयकडे हस्तांतरित करण्यात आलं. चौकशीदरम्यान आरोपींची संख्या 46 वरून 11 वर आली.
भंडारा येथील जलद गती न्यायालयाचे न्यायाधीश एस.एस. दास यांनी 20 सप्टेंबर 2008 रोजी आठ आरोपींनी खून केल्या प्रकरणी फाशीची शिक्षा सुनावली आणि इतर तिघांना निर्दोष ठरवण्यात आले.
पण या प्रकरणात ॲट्रॉसिटीचं कलम लावलं नाही. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जलदगती न्यायालयाचे सर्व पैलू मान्य केले. परंतु 14 जुलै 2010 रोजी फाशीऐवजी जन्मठेप सुनावली. आठ जणांना 25 वर्षांची जन्मठेप सुनावली. यातील दोघांचा मृत्यू झालाय तर सहा आरोपी नागपूच्या मध्यवर्ती तुरुंगात शिक्षा भोगत आहेत.
सुरेखा भोतमांगे यांचे पती भैयालाल, सरकार आणि आरोपी यांनी वेगवेगळ्या विशेष अनुमती याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केल्या आहेत. हे प्रकरण गेल्या 12 वर्षांपासून प्रलंबित असून सुनावणीला आलेले नाही.
खैरलांजीपासून ते हाथरसपर्यंत गेल्या चौदा वर्षांत दलित अत्याचारांच्या घटना देशात सातत्याने घडत आहेत.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)