IPL 2020: राहुल टेवाटिया; पाच षटकारांनी मॅच फिरवणारा किमयागार

राहुल टेवाटिया, राजस्थान, पंजाब

फोटो स्रोत, BCCI/IPL

फोटो कॅप्शन, राहुल टेवाटिया

राहुल टेवाटिया हे नाव रविवारी झालेल्या पंजाब-राजस्थान मॅचनंतर जगभरातल्या क्रिकेटरसिकांच्या मनात कायमचं कोरलं गेलं.

पंजाबने मयांक अगरवालच्या शतकाच्या बळावर 223 धावांचा डोंगर उभारला होता. राजस्थानने स्टीव्हन स्मिथ आणि संजू सॅमसनच्या भागीदारीच्या बळावर शंभरपर्यंत मजल मारली. स्मिथ आऊट झाला आणि रॉबिन उथप्पाऐवजी राहुल टेवाटियाच्या आगमनाने सगळ्यांनीच भुवया उंचावल्या.

पिंच हिंटर अर्थात कमी बॉलमध्ये जास्तीत जास्त रन्स करण्यासाठी पाठवलेला प्लेयर याकरता टेवाटिया आला मात्र पंजाबच्या बॉलर्सनी त्याची चांगलीच कोंडी केली. रवी बिश्नोई, ग्लेन मॅक्सवेल आणि जेमी नीशाम यांनी त्याला अडचणीत टाकलं. त्याला चौकार-षटकार मारता येईना आणि आऊटही होत नव्हता. रनरेट प्रतिओव्हर 17 असा गगनाला भिडला होता. संजू सॅमसन एकीकडे थंड डोक्याने षटकारांची लयलूट करत होता. पण त्याच्यावरचं दडपण वाढत चाललं होतं. एका क्षणी टेवाटियाच्या नावावर 23 बॉलमध्ये 17 रन्स होत्या.

सोशल मीडियावर टेवाटियाचा उद्धार केला गेला. राजस्थानने टेवाटियाला पाठवून हातची मॅच घालवली असं अनेकांचं म्हणणं पडलं. टेवाटियाला 'रिटायर्ड हर्ट' करा असा नाराही काहींनी दिली. काहींनी तर थेट ही मॅच फिक्स असल्याचं सांगितलं. सुदैवाने हे सगळं टेवाटियापर्यंत पोहोचलं नाही.

टेवाटियाने शेल्डॉन कॉट्रेलने टाकलेल्या 18व्या ओव्हरमध्ये तब्बल 5 सिक्स लगावले आणि 30 धावा कुटल्या. एक बॉल डॉट पडला. अविश्वसनीय अशा फटकेबाजीमुळे पंजाबचे खेळाडू अवाक झाले. मॅचचं पारडं पंजाबकडून राजस्थानच्या दिशेने झुकलं. 31 बॉलमध्ये 53 रन्सची खेळी करून टेवाटिया आऊट झाला तेव्हा राजस्थानच्या सर्व खेळाडूंनी स्टँडिंग ओव्हेशन दिलं. टेवाटियाचं अर्धवट राहिलेलं काम जोफ्रा आर्चर आणि टॉम करन या आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी पूर्ण केलं आणि राजस्थानने पंजाबने दिलेलं विक्रमी 224 धावांचं लक्ष्य पेललं.

कोण आहे टेवाटिया?

या मॅचचा चमत्कार ठरला असता तर टेवाटियासाठी आयपीएल नवीन नाही. 2014 मध्ये टेवाटियाने राजस्थान रॉयल्ससाठी खेळतानाच आयपीएल पदार्पण केलं. तीन मॅचमध्ये टेवाटियाला संधी मिळाली आणि त्याने 2 विकेट्स काढल्या. पुढच्या वर्षीही तो राजस्थानकडूनच खेळला.

2015 हंगामात त्याला केवळ एकमेव मॅचमध्ये संधी मिळाली. एका विकेटवर समाधान मानावं लागलं. 2016 हंगामात त्याला कोणत्याही संघाने विकत घेतलं नाही. 2017मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबने त्याला ताफ्यात दाखल करून घेतलं. त्याला तीन मॅचमध्ये खेळवलं आणि त्याने 3 विकेट्स घेतल्या.

2018 मध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्सने त्याला करारबद्ध केलं. 8 मॅचेस खेळण्याची संधी मिळाली आणि टेवाटियाने 6 विकेट्स घेतल्या. अंतिम अकरात त्याचं स्थान पक्कं होऊ शकलं नाही. 2019 मध्येही टेवाटिया दिल्लीकडेच होता. 5 मॅचमध्ये खेळला आणि 2 विकेट्स घेतल्या.

राहुल टेवाटिया, राजस्थान, पंजाब

फोटो स्रोत, BCCI/IPL

फोटो कॅप्शन, राहुल टेवाटिया

2020 लिलावापूर्वी दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांनी करार केला. यानुसार राहुल टेवाटिया आणि मकरंद मार्कंडेय या फिरकीपटूंना दिल्लीने राजस्थानला देऊन टाकलं. त्याबदल्यात राजस्थानने अनुभवी अजिंक्य रहाणेला दिल्लीला दिलं.

यंदाच्या पहिल्या मॅचमध्ये राजस्थानने टेवाटियावर विश्वास ठेवला आणि अंतिम अकरात त्याला स्थान दिलं. संघव्यवस्थापनाचा विश्वास कायम राखत टेवाटियाने 37 रन्सच्या मोबदल्यात शेन वॉटसन, सॅम करन आणि ऋतुराज गायकवाडला तंबूत परतावलं.

डोमेस्टिक क्रिकेटमध्ये हरयाणाकडून खेळणाऱ्या राहुलने फिरकीपटू म्हणून छाप उमटवली आहे. त्याच्या नावावर 7 फर्स्ट क्लास मॅचचा अनुभव असला तरी ट्वेन्टी-20 क्रिकेटमध्ये त्याच्या बॉलिंगचा सामना करणं भल्याभल्या बॅट्समनला कठीण जातं.

ट्रेड ऑफ

आयपीएल लिलावापूर्वी ट्रेड ऑफ नावाचा प्रकार असतो. बार्टर सिस्टमसारखी खेळाडूंची देवाणघेवाण केली जाते. राजस्थानने अजिंक्य रहाणेला दिल्लीला देऊन टाकलं. अजिंक्यची पत जास्त होती म्हणून दिल्लीने त्याबदल्यात मकरंद मार्कंडेय आणि राहुल टेवाटिया अशा दोघांना राजस्थानला दिलं.

राजस्थानसाठी सर्वाधिक रन्स करणाऱ्यांच्या यादीत अव्वल तीनमध्ये तसंच कर्णधारपद भूषवलेल्या अजिंक्यला गेल्या वर्षी हंगामाच्या अर्ध्यातच कर्णधारपदावरून डच्चू देण्यात आला. स्टीव्हन स्मिथकडे कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली. राजस्थानच्या योजनांमध्ये रहाणे बसत नसल्याने त्यांनी दिल्लीला देऊन टाकलं. रहाणेसारखा अतिशय अनुभवी आणि टीम इंडियाचा टेस्ट कॅप्टन्सी राहिलेल्या खेळाडूला दिल्लीने ताफ्यात समाविष्ट केलं. त्याच्या बदल्यात दोन खेळाडू राजस्थानला दिले. त्याअंतर्गत टेवाटिया राजस्थानकडे परतला.

काय म्हणाला टेवाटिया?

"आता मला बरं वाटतं आहे. सुरुवातीचे 20 बॉल माझ्या करिअरमधला सगळ्यात खराब खेळ केला. मात्र त्यानंतर मी सिक्सेस मारायला सुरुवात केली आणि मग मारतच सुटलो. संघव्यवस्थापनाला माझ्या बॅटिंगवर विश्वास होता. मलाही माझ्या क्षमतेवर विश्वास होता. एक सिक्स लागण्याचा अवकाश. तो लागला आणि सूर गवसला", असं टेवाटियाने मॅचनंतर बोलताना सांगितलं.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)