रामदास आठवले : 'मराठा आरक्षणासाठी मोठी आंदोलनं नकोत, कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट होईल'

कोरोना काळात मराठा समाजानं मोठी आंदोलनं केली तर महाराष्ट्रात कोरोना पुन्हा वाढेल आणि त्याची संख्या दुप्पट होण्याची शक्यता आहे, असं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. बीबीसी मराठीचे प्रतिनिधी नीलेश धोत्रे यांना दिलेल्या मुलाखतीत त्यांनी मुंबई पोलीस, दीपिका पदुकोणची चौकशी आणि सुशांतसिंह राजपूत प्रकरणावर त्यांची मतं मांडली.

फिल्म इंडस्ट्रीमधल्या ड्रग्जच्या स्मग्लिंगला पोलिसांची साथ असल्याचा दावासुद्धा त्यांनी केला आहे. तसंच मुंबई पोलिसांवर पूर्ण विश्वास आहे. पण दोन केसमध्ये त्यांच्यावर विश्वास नसल्याचं आठवले यांनी म्हटलं आहे. त्यांच्या मुलाखतीचा हा संपादित अंश -

प्रश्न - प्रकाश आंबेडकरांनी ओबीसींमध्ये मराठ्यांना आरक्षण देऊ नका, अशी भूमिका घेतली आहे. याबाबत तुमची काय भूमिका आहे?

रामदास आठवले - मराठा समाजाला आरक्षण मिळालचं पाहिजे, ही माझी भूमिका आहे. ही मागणी सर्वात आधी मी केली होती. मंडल आयोगाच्या शिफारसी लागू करा या मागणीसाठी भारतीय दलित पँथरच्या काळात आम्ही अनेक आंदोलनं केली होती. तेव्हा जे ओबीसी होते त्यांनासुद्धा वाटत होतं की आम्ही बॅकवर्ड नाही. पण त्यावेळेला प्रत्येक मोर्चामध्ये आमची मागणी असायची की मंडल आयोगाच्या शिफारसी लागू करा.

मराठा समाजालासुद्धा असंच वाटायचं की आम्ही मागासवर्गीय नाही आहोत. पण मी सांगितलं की मराठा समाज जरी सबळ असला आर्थिकदृष्ट्या मजबूत असला किंवा मंत्रिमंडळात आणि सत्तेच्या राजकारणात त्यांचा बोलबाला असला तरी मराठा समाजात 60 ते 65 टक्के लोक असे आहेत ज्यांना आपल्या मुलांचं शिक्षण करणं अशक्य आहे. त्यांना आजारपणावर लाख-दोन लाख खर्च करणं अशक्य आहे. पावसाच्या भरवशावर अनेक शेतकरी आहे. त्यामुळे मराठा समाजात अनेक जण आर्थिकदृष्ट्या मागासलेले आहेत. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे.

पण ते आरक्षण ओबीसीमध्ये देऊ नये. ओबीसींना त्यांच्या लोकसंख्येच्या तुलनेत आरक्षण नाही. त्यामुळे मराठ्यांना ओबीसींमध्ये टाकून आरक्षण देणं हे अत्यंत अयोग्य आहे. दोघांच्या वादामध्ये अनेक अडचणी निर्माण होतील. पण मराठा समाजाला आरक्षण दिलंच पाहिजे या मताचा मी आहे. सगळ्या श्रीमंत मराठ्यांना देऊ नका पण गरिबांना द्या. मराठा समाजानं पुकारलेल्या आंदोलनाला माझा पूर्णपणे पाठिंबा आहे.

प्रश्न - अनेक मराठा संघटना पुन्हा आंदोलन करण्यासाठी एकत्र येत आहेत, त्यांना तुम्ही काय आवाहन कराल? तुम्ही यामध्ये मध्यस्थी करायला तयार आहात का?

रामदास आठवले - मध्यस्थी म्हणजे आता त्यांनी आंदोलन करणं आवश्यक आहे. मराठा समाजामध्ये जो उद्रेक आहे तो अजूनही सुरू आहे. आपली मागणी मान्य झाली पाहिजे अशी त्यांची भावना आहे. मराठा समाजाचं सुरुवातीचं आंदोलन अत्यंत शांतपणाचं होतं.

प्रश्न - पण तो काळ वेगळा होता. आताचा काळ हा कोरोना व्हायरसचा काळ आहे. मग अशा काळात मोर्चे होणार असतील तर रामदास आठवले मध्यस्थी करणार आहेत का?

रामदास आठवले - माझी भूमिका हीच आहे की त्यांनी आपल्या भावना वगैरे व्यक्त करायला हरकत नाही. पण सोशल डिस्टंसिंग ठेवून आंदोलन केलं पाहिजे. मोठ्या प्रमाणात गर्दी करून आंदोलन करण्यात अर्थ नाहीये. अशा पद्धतीनं आंदोलन केलं तर आपणच आपला घात करू शकतो.

कारण कोरोना मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे मराठा संघटनांना माझं आवाहन आहे की, आपण आंदोलन करा पण ते अत्यंत शांतेतनं आंदोलन असलं पाहिजे. मोठ्या गर्दीचं ते आंदोलन असता कामा नये. 25-50-100 लोकांचं ते आंदोलन असेल. ते आपण करा आणि आपल्या भावना व्यक्त करा. नाहीतर कोरोना पुन्हा महाराष्ट्रात वाढेल आणि त्याची संख्या दुप्पट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मराठा नेत्यांना माझं आवाहन आहे की या कोरोनाच्या काळात आपण थोडं शांतं राहिलं पाहिजे.

आंदोलन करायचं असेल तर ते सोशल डिस्टंसिंग ठेवून केलं पाहिजे. कमीतकमी 100 लोकांपेक्षा जास्त लोक तिथं जमा होऊ नयेत. अशाच पद्धतीनं त्यांनी आंदोलन करावं, असं आमचं त्यांना आवाहन आहे आणि आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत.

प्रश्न - दीपिका पदुकोणची चौकशी सूडाच्या भावनेनं केली जातेय असा आरोप सोशल मीडियात होतोय. केवळ सरकारच्या विरोधात भूमिका घेतलेल्यांनाच नोटीसा का जात आहेत? असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

रामदास आठवले - मला असं वाटतं की, दीपिका पदुकोण ही अत्यंत उत्कृष्ट अभिनेत्री आहे. तिने अनेक भूमिका अत्यंत चांगल्या वठवलेल्या आहेत. पण ड्रग्ज घेण्याची भूमिका मला आवडलेली नाही. तिचं जे नाव आलेलं आहे ते रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ तसंच इतर लोक पकडले गेले त्यांच्या चौकशीत पुढे आलेलं आहे. एकमेकांनी एकमेकांची नावं सांगितली आहेत. त्यामुळे दीपिकाचं नाव समोर आलेलं आहे.

त्यामुळे सूड उगवण्याच्या दृष्टीकोनातून ना महाराष्ट्र सरकारनं कारवाई केलीय ना केंद्र सरकारनं. आणि सुशांत सिंह राजपूत प्रकरणाच्या चौकशीसाठी गेलेली CBI आहे. पण CBI ची चौकशी राहिली बाजूला आणि आता NCB ची चौकशी सुरू आहे. ती करा एका बाजूला. सुशांत प्रकरणाची चौकशी होणं अपेक्षित आहे.

पण दीपिका पदुकोणसुद्धा नशेमध्ये असायची, अशी माहिती मिळालेली आहे आणि ती ड्रग्ज घेत होती अशा पद्धतीनं माहिती मिळाल्यामुळे तिला बोलावण्यात आलेलं आहे.

प्रश्न - तुम्ही आणि तुमचा पक्ष दीपिकाला पाठिंबा देणार का, कंगना राणावतला, पायल घोषला तुम्ही पाठिंबा दिला होता. आता तुम्ही दीपिकालासुद्धा पाठिंबा देणार का?

रामदास आठवले - ड्रग्जच्या संबंधांमध्ये मी काही कुणाला पाठिंबा देणार नाही. पण तिच्यावर अन्याय होऊ नये ही भूमिका आमची आहे.

फिल्म इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्ज वापरलं जातं अशी माहिती आहे. त्यामुळे त्याचं स्मगलिंग थांबलं पाहिजे. कधीकधी पोलीस ते पकडतात. पण अनेक वेळेला पोलीस त्या स्मगलिंगवाल्यांना साथ देतात. पैसे घेतात. गुपित पद्धतीनं हे ड्रग्ज आणलं जातं. त्यामुळे त्यावर पूर्णपणे बंदी आली पाहिजे.

प्रश्न - तुम्ही म्हणताय पोलिसांची ड्रग् स्मगलिंगला साथ आहे. जर तुम्हाला हे माहिती आहे. तर याआधीच त्यावर कारवाई का झाली नाही? आधी 5 वर्षं तुमचं सरकार होतं महाराष्ट्रात.

रामदास आठवले - सरकार कुणाचंही असो स्मगलिंग चालूच आहे. कुणाचंही सरकार असल तरी दलितांवर अत्याचर होतच आहेत. त्यामुळे हा एक सोशल अँगलचा विषय आहे. आणि आता हे ड्रगचं जे स्मगलिंग आहे ते पोलिसांनी कितीही वेळाला प्रयत्न केले तरी ते स्मग्लिंग करणारे लोक ड्रग्ज इथं आणतातच.

प्रत्येक वेळेला पोलीस सहभागी असतातच असं नाहीये. पण आपण अनेक फिल्ममध्ये ते पाहिलेलं आहे की एक दोन पोलीस गँगवॉरवाल्यांशी कनेक्ट असतोच असतो.

प्रश्न - तुम्ही हा मुद्दा फिल्मचा सांगत आहात, पण तुम्ही मंत्री आहात तुमच्याकडे याची काही ठोस माहिती आहे का, असेल तर तुम्ही कारवाईचं आश्वासन देता का?

रामदास आठवले - आपली मागणी अशीच आहे.

प्रश्न - पण तुम्ही मंत्री आहात.

रामदास आठवले - मी मंत्री आहे. त्यामुळे माझी सूचना ही आहे की स्मगलिंग करणाऱ्या किंवा त्यांना पाठिंबा देणाऱ्या पोलिसांवर कारवाई होण अत्यंत आवश्यक आहे. सर्वच पोलीस असं करतात असं माझं मत अजिबात नाही. पोलिसांना बदनाम करण्याचा प्रयत्न अनेकवेळेला होत असतो.

एखाद्याने पैसे घेतले तर सर्वच पोलीस पैसे घेतात असं नाहीये. मुंबई पोलिसांवर माझा पूर्ण विश्वास आहे. पण या दोन केसमध्ये माझा मुंबई पोलिसांवर विश्वास नाही. कारण 2 महिन्यांमध्ये त्यांना सुशांतच्या केसमध्ये अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचता आलेलं नाही.

प्रश्न - जर तुमचा दावा आहे की सुशांतची हत्या झाली आहे. तुम्ही एक मंत्री आहात. ज्या अर्थी तुम्ही हा दावा करत आहात त्या अर्थी तुमच्याकडे काहीतरी ठोस माहिती असणार आहे नाही तर तुम्ही असं बोलणार नाहीत. पण मग तसं असेल तर तुम्ही ते तपास यंत्रणांना आतापर्यंत का सांगितलेलं नाहीये.

रामदास आठवले - NCBच्या तपासामुळे सगळा रोख तिकडेच आहे आता. NCB चौकशीमुळे सुशांत प्रकरणाची CBI चौकशी थांबल्यासारखं वाटत आहे. त्यामुळे CBIने सुद्धा लवकरात लवकर तपास करावा. आमचा संशय आहे की ही हत्या असावी.

प्रश्न - नेमकं काय आहे तुमचा संशय आहे की दावा आहे?

रामदास आठवले - संशय आहे. आता दावा असायला आम्ही काही त्याठिकाणी नव्हतो. पण सगळ्या हिस्ट्रीचा विचार केल्यानंतर आपलं मत असंच आहे की ती हत्याच असली पाहिजे. त्या दिशेनं चौकशी करावी आणि कुणावर अन्याय होऊ नये अशी आमची भूमिका आहे.

प्रश्न - या प्रकरणात NCB कडून फक्त महिलांनाच नोटीस का जात आहेत. पुरुष ड्रग्ज घेत नाहीत का असाही प्रश्न विचारला जात आहे, राजीव खांडेकरांसारख्या ज्येष्ठ पत्रकारांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला आहे.

रामदास आठवले - त्यात काही पुरुषांचीसुद्ध नावं आलेली आहेत. पण एकमेकांच्या चौकशीत महिलांचीच नावं पुढे आलेली आहेत. मलाही शंका आहे की महिलांचीच का नावं येत आहेत? पण त्यामध्ये पुरुषांची नावंसुद्धा येणं अपेक्षित आहे. NCBनं ती माहिती लवकरात लवकर घ्यावी आणि फक्त महिलांवरच कारवाई न करता पुरुषांवरसुद्धा कारवाई केली पाहिजे अशा मताचा मी आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)