काश्मीरमध्ये सापडलेली स्फोटकं नागपूरमध्ये तयार झाली आहेत?

पुलवामा

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, पुलवामा हल्ला (संग्रहित छायाचित्र)
    • Author, प्रवीण मुधोळकर
    • Role, बीबीसी मराठीसाठी

भारतीय सैन्याने नुकताच काश्मीरमध्ये 'पुलवामा' सारख्या हल्ल्याचा कट उधळून लावला. काश्मीरच्या 'कारेवा' गावातील दोन पाण्याच्या टाक्यांमधून 52 किलो स्फोटकं आणि 50 डिटोनेटर्स भारतीय सैन्याने या कारवाईत जप्त केले.

प्रत्येकी 125 ग्रॅम वजन असणाऱ्या स्फोटकांच्या 416 पाकिटात ही स्फोटकं ठेवण्यात आली होती. ही सर्व स्फोटकं नागपूरच्या 'अमीन एक्सप्लोझिव्ह' या कंपनीमध्ये तयार करण्यात आल्याची माहिती या सर्व स्फोटकांच्या पाकिटांवर छापण्यात आली आहे.

नागपुरातील 'अमीन एक्सप्लोझिव्ह' या कंपनीचा या स्फोटकांशी काय संबंध आहे. दहशतवादी कारवाया करणाऱ्यांना भारतात अशी सहज स्फोटकं विकत घेता येतात काय? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न आम्ही केला.

14 फेब्रुवारी 2019 ला काश्मीरच्या पुलवामा भागात दहशतवाद्यांनी स्फोटकांनी भरलेली कार सीआरपीएफ जवानांच्या बसवर धडकवली होती. या हल्ल्यात 40 सीआरपीएफ जवान शहीद झाले होते.

या हल्ल्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी संपूर्ण जम्मू -काश्मीरमध्ये सुरक्षा दलांकडून अशा स्फोटकांचा वेळोवळी शोध घेतला जात होता. अशीच कारवाई करत गेल्या आठवड्यात भारतीय सैन्य, सीआरपीएफ आणि जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी एकत्रितपणे एक ॲापरेशन काश्मीरमध्ये राबविले.

या ॲापरेशनदरम्यान 'जैश-ए-मोहम्मद' या अतिरेकी संघटनेच्या काही हालचालींची माहिती सुरक्षा दलांना मिळाली. याच माहितीच्या आधारावर काश्मीरच्या 'कारेवा' या गावाजवळ कारवाई करतांना सुरक्षा दलाच्या जवानांना दोन पाण्याच्या टाक्यांमध्ये 52 किलो स्फोटकं सापडली.

स्थानिक अवंतीपूरा पोलीस ठाण्यात यासंदर्भात बेकायदेशी कारवाई प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

YouTube पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 1

नागपूरच्या कंपनीचं नाव का?

दहशतवाद्यांनी मोठा हल्ला घडविण्यासाठी दडवून ठेवलेली स्फोटकं नागपूरच्या अमीन एक्सप्लोझिव्ह कंपनीच्या फॅक्टरीत तयार झाले आहेत. तसा शिक्का स्फोटकांवर सापडला आहे.

नागपूरच्या बाजारगाव परिसरातील ही कंपनी खाणकाम, बांधकामासाठी वापरले जाणारे स्फोटकं ' तयार करते. जिलेटीनच्या कांड्या, गन पावडर आणि सेफ्टी फ्युज असे दारुगोळ्याचे विविध प्रकार या कंपनीत तयार केले जातात.

अमीन एक्सप्लोझिव्ह कंपनी

फोटो स्रोत, Praveen mudholkar

फोटो कॅप्शन, अमीन एक्सप्लोझिव्ह कंपनी

कंपनीचा इतिहास

2002 मध्ये 'अमीन एक्सप्लोझिव्ह' ही कंपनी नागपूरमधील बाजारगाव परिसरात शंभर हेक्टर परिसरात उभारण्यात आली. सोहेल अमीन या कंपनीचे मालक आहेत.

छत्तीसगडच्या रायपूरचे रहिवासी संजय चौधरी आणि अजय चौधरी यांच्या 'एस. बी. (स्पेशल ब्लास्ट) लिमिटेड' या एक्सप्लोझिव्ह कंपनीचेही काही समभाग 'अमीन एक्सप्लोझिव्ह' या कंपनीत होते.

विहिरी फोडणे, खाणी, मॅगनीज, WCL मेगास्ट्रक्चर जिलेटिनच्या कांड्या तयार करण्याचं काम करायचे. टेंडर निघतात, भरतात समजा मिळालं, PEPA कडे अर्ज करावा लागतो.

प्रत्येक पाकिटावर बारकोड असतो. त्याची हालचाल कळते. स्फोटकं कशी वापरायची हा त्यांचा प्रश्न आहे. त्यांचं वेगळं रेकॉर्ड असते. त्यांची एक्स्पायरी डेट असते.

2012 मध्ये 'अमीन एक्सप्लोझिव्ह' या कंपनीचे नाव बदलून ते 'एस. बी. एनर्जी लिमिटेड' असं करण्यात आलं. 2016 मध्ये सोहेल अमीन यांनी या संपूर्ण कंपनीतील 'सेफ्टी फ्युज युनिट' वगळता संजय चौधरी यांना ही पूर्ण कंपनी विकली. यातील सेफ्टी फ्यूजचा प्रकल्प नागपूरच्या सोलर - एक्सप्लोझिव्ह या कंपनीला विकला.

'एस. बी. एनर्जी लिमिटेड'

फोटो स्रोत, Praveen mudholkar

फोटो कॅप्शन, 'एस. बी. एनर्जी लिमिटेड'

खाजगी स्फोटकं आणि दारुगोळा उत्पादकांसाठीची नियमावली

विहिरी खोदणे, कोळशाच्या खाणीसाठी, धरणांसाठी अशा अनेक बाबींसाठी औद्योगिक वापरासाठीच्या स्फोटकांची निर्मिती खाजगी कंपन्याकडून केली जाते.

देशाच्या संरक्षणासाठी संरक्षण दलांना वापरण्यासाठीचे स्फोटकं आणि दारुगोळा हा संरक्षण खात्याच्या आयुध निर्माण विभागामधून किंवा खाजगी स्फोटकं तयार करणा-या कंपन्यांकडून खरेदी केला जातो.

खाजगी उद्योगांना किंवा संरक्षण दलांना स्फोटकं विकण्याआधी केंद्र सरकारच्या 'पेट्रोलियम आणि विस्फोटक सुरक्षा संस्था' PESA या विभागाकडून परवानगी घ्यावी लागते. या परवानगीनंतर पुरवठादार कंपनी आणि खरेदीदार यांची माहिती दोन्ही ठिकाणच्या स्थानिक पोलीस ठाण्यात द्यावी लागते.

स्फोटकांची वाहतूक खरेदीदाराकडे सुरू झाल्यावरही पोलिसांना माहिती द्यावी लागते. स्फोटकांच्या पाकिटावर बारकोड असतो. या बारकोडमुळे स्फोटक कोणत्या मार्गाने आणि कुठे गेली हेही कळतं.

स्फोटकांची निर्मिती आणि वाहतूक हा विषय अत्यंत संवेदनशील असतो. त्यामुळे यासंबधीची नियमावली कडक असते.

भारतातील एकूण औद्योगिक स्फोटकांपैकी 50 टक्के नागपूर जिल्हयात तयार होतात. नागपूर जिल्ह्यातील सोलर, एमएमए, विदर्भ एक्स्पोझिव्ह, एसबीएल, अमिन, इकॉनोमिक एक्सप्लोझिव्ह डायनामिक्स ,एएमए, सुओ, आणि सी डेट या दहा प्रमुख कंपन्या एक्सप्लोझिव्ह तयार करतात.

कंपनी

फोटो स्रोत, Praveen mudholkar

कंपनीच्या मालकांची प्रतिक्रिया

या संपूर्ण प्रकरणावर अमीन एक्सप्लोसिव्ह कंपनीचे मालक सोहेल अमीन यांची प्रतिक्रिया जाणून घेतली.

ते म्हणाले, "काश्मीरमध्ये स्फोटकांच्या साठ्यात 'अमीन एक्सप्लोझिव्ह' या कंपनीचे स्फोटकं आणि डिटोनेटर्स सापडले आहेत हे सांगण्यासाठी नागपूर पोलिसांच्या बॉम्बशोधक पथक कार्यालाकडून, आणि दिल्लीच्या शासकीय कार्यालयाकडून फोन आले. भारतीय सैन्य किंवा NIA कडून फोन आलेला नाही.

" मी 2016 मध्ये 'अमीन एक्सप्लोझिव्ह' या कपंनीच्या संचालक पदासह सर्व पदांचा राजीनामा दिलाय. आता 'अमीन एक्सप्लोझिव्ह' ही कंपनी कोण चालवितं ती कुठे आहे याची मला माहिती नाही.

मी राजीनामा दिल्यावर 'अमीन एक्सप्लोझिव्ह' या कंपनीत कोण आलं त्याचे नवे मालक कोण याची मला कल्पना नाही. माझा आणि 'अमीन एक्सप्लोझिव्ह' या कंपनीचा संबंध संपुष्टात आला आहे. " असंही ते पुढे म्हणाले.

कंपनी

फोटो स्रोत, Praveen mudholkar

2007 साली हैदराबाद येथे झालेल्या दुहेरी बाँम्बस्फोटात 'अमीन एक्सप्लोझिव्ह' या कंपनीचे स्फोटकं वापरण्यात आल्याप्रकरणी नागपूर पोलिसांनी आपली चौकशी केली होती. मात्र या बाातम्या प्रसारमाध्यमांनीच तयार केल्या होत्या आणि तत्कालीन पोलीस आयुक्त सत्यपाल सिंह यांनी तेव्हाच क्लीन चीट दिल्याची माहिती त्यांनी दिली.

सोहेल अमीन यांनी नागपूरच्या 'सोलर एक्सप्लोझिव्ह' या कंपनीला विकली होती. या कंपनीचे चेअरमन सत्यनारायण नुवाल यांची प्रतिक्रियाही बीबीसी मराठीने जाणून घेतली.

" 2016 मध्ये आम्हाला भारतीय सैन्याला दारुगोळा पुरविण्याचे कंत्राट मिळाले होते, यात आम्हाला सेफ्टी फ्युजसुद्धा मोठ्या प्रमाणात पुरवायचे होते. याच काळात बाजारगावजवळ 'अमीन एक्सप्लोझिव्ह' या कंपनीचा 'सेफ्टी फ्युज' तयार करणारा प्रकल्प विकायचा असल्याच आम्हाला कळलं आणि तो आम्ही विकत घेतला.

"या युनिटचं नाव नंतर आम्ही 'इकॉनॉमिक एक्सप्लोझिव्ह लिमिटेड असं केलं. काश्मीरच्या 'कारेवा' याठिकाणी 52 किलो स्फोटकं आणि 50 डिटोनेटर्स सापडले असतील, यावर 'अमीन एक्सप्लोझिव्ह' या कंपनीचा निर्माता म्हणून उल्लेख असेल तर याचा अर्थ ही स्फोटकं 2012 च्या आधी तयार झालेली आहेत. कारण 2012 नंतर या कंपनीचे नाव हे 'एस. बी. (स्पेशल ब्लास्ट) लिमिटेड' असं झालं आहे. "

"आम्ही गेली पन्नास वर्षे दारुगोळा आणि स्फोटकांच्या व्यवसायात आहोत. PESA कडे आम्ही तयार करत असलेल्या प्रत्येक स्फोटकांची, त्याच्या कच्च्या मालाची माहिती असते आणि ती दररोज अपडेट होत असते".

पेसाचं कार्यालय

फोटो स्रोत, Praveen mudholkar

PESA या विेभागाची प्रतिक्रिया

केंद्र सरकारच्या 'पेट्रोलियम आणि विस्फोटक सुरक्षा संस्था' PESA (Petroleum and Explosive Sefety Organisation) या विभागाचे मुख्य कार्यालय नागपुरात आहे. या विभागाचे एक्स्प्लोझिव्ह कंट्रोलर.ए. बी. तामगाडगे यांची प्रतिक्रिया बीबीसी मराठीने जाणून घेतली.

'अमीन एक्सप्लोझिव्ह' ही कंपनी नागपूर - अमरावती रोडवरील उजव्या बाजूच्या रस्त्यावर असल्याची नोंद आमच्याकडे आहे.देशभरातील औद्योगिक वापरासाठीच्या आणि संरक्षण विभागाला लागणा-या दारूगोळ्याची, स्फोटकं, डिटोनेटर्स आणि अशाच इतर सर्व गोष्टींच्या उत्पादनावर आमचं बारीक लक्ष असतं".

"काश्मीर मधील 'कारेवा' गावाजवळ जर असा स्फोटकांचा साठा सापडला असेल तर त्यावर बारकोड असेलच. कारण बारकोड शिवाय आम्ही कुठलेही स्फोटक किंवा दारूगोळा फॅक्टरीच्या बाहेरच येऊ देत नाही, स्फोटकांवर बारकोड नसेल तर ही बाब गंभीर आहे.

आता हे प्रकरण भारतीय सैन्य आणि जम्मू काश्मीर पोलिसांच्या अधीन असून ते तपास करत आहेत. या स्फोटकांवर आणि डिटोनेटर्सवर जर अमीन एक्स्प्लोझिव्ह कंपनीचा शिक्का असेल तर ते तिथपर्यंत कसे पोहोचले हे पाहणं महत्त्वाचं आहे."

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 2

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)