कृषी विधेयक : राज्यसभेत जे झालं, ते संसदेच्या प्रतिष्ठेसाठी हानिकारक - राजनाथ सिंह

कृषी विधेयकांदरम्यान राज्यसभेच्या उपसभापतींच्या आसनावर चढणं, माईक तोडणं संसदेच्या प्रतिष्ठेसाठी हानिकारक आहे, असं वक्तव्य केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पत्रकार परिषदेत केलं आहे.

कृषी विधेयकांवरून शेतकऱ्यांमध्ये गैरसमज पसरवले जात आहे. एमएसपी आणि बाजार समित्या रद्द केल्या जातील, असे गैरसमज पसरवले जात आहेत. पण, असं काहीच होणार नाही. या दोन्ही गोष्टी कायम राहणार आहेत, असंही सिंह यांनी म्हटलं आहे.

या पत्रकार परिषदेत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, वाणिज्य मंत्री पीयुष गोयल, पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर, संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी, केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नकवी, सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गेहलोत उपस्थित होते.

राजनाथ सिंह यांनी पत्रकार परिषदेत मांडलेले मुद्दे -

1. राज्यसभेच्या उपसभापतींच्या आसनापर्यंत जाणं, तिथं जाऊन नियम पुस्तिका फाडणं, आसनावर चढणं, हे संसदीय इतिहासात कधीच झालं नाही. ज्या खासदारांनी असं केलं त्याचा मी निषेध करतो. यामुळे संसदेच्या प्रतिष्ठेला जखम झाली आहे.

2. राज्यसभेत असं होणं मोठी गोष्ट आहे. संसदीय परंपरेवर विश्वास ठेवणारा कुणीही माणूस आज दुखी झाला असेल. जे काही झालं ते लोकशाहीला धरून झालेलं नाही. संसदीय मर्यादेला धरून झालेलं नाही.

3. मी स्वत: शेतकरी आहे. मी ज्या सरकारमध्ये आहे ते सरकार कधीच शेतकऱ्यांना नुकसान पोहोचवेल, असं पाऊल उचलणार नाही.

4. मी देशातल्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की, कोणत्याही स्थितीत एमएसपी आणि बाजार समित्यांची व्यवस्था संपुष्टात येणार नाही.

कृषी सुधारणांशी संबंधित दोन विधेयकं राज्यसभेत आवाजी मतदानानं पारित झाली.

या विधेयकांवरील मतदानादरम्यान विरोधकांनी प्रचंड गदारोळ केला. ही विधेयक मंजूर झाल्यानंतर विरोधी पक्षांनी राज्यभेत उपसभापती हरिवंश नारायण सिंह यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव मांडला आहे.

विधेयक मंजूर करून घेताना त्यांनी ज्या पद्धतीचं वर्तन केलं, ते लोकशाही परंपरा आणि पद्घतींना हानी पोहोचवणारं होतं, असा आरोप काँग्रेसनं केला आहे.

काँग्रेसचे राज्यसभा खासदार अहमद पटेल यांनी म्हटलं, "राज्यसभेच्या उपसभापतींनी लोकशाहीच्या परंपरांचं रक्षण करणं आवश्यक आहे. मात्र त्याऐवजी त्यांच्या वर्तनामुळे लोकशाही परंपरांना हानी पोहोचली आहे."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)