You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
जमिनीचा फेरफार उतारा ऑनलाईन असा पाहा
- Author, श्रीकांत बंगाळे
- Role, बीबीसी मराठी
गावपातळीवर फेरफार म्हणजेच गाव नमुना-6 अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. एखाद्या व्यक्तीच्या जमीन अधिकार अभिलेखात जे बदल होतात, त्याची नोंद फेरफारात ठेवली जाते.
फेरफार नमुन्यात जमिनीची खरेदी-विक्री, वारस नोंदी, शेतजमिनीवर बोजा लावणं अशा बदलांची सविस्तर माहिती दिलेली असते.
आता तुम्हाला घरबसल्या तुमच्या गावातील फेरफार नोंदीची माहिती ऑनलाईन पाहता येणार आहे.
त्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागानं 'आपली चावडी' ही प्रणाली विकसित केली आहे.
फेरफार ऑनलाईन कसा पाहायचा?
फेरफार ऑनलाईन पाहण्यासाठी सगळ्यात अगोदर तुम्हाला गुगलवर bhulekh.mahabhumi.gov.in असं सर्च करायचं आहे.
त्यानंतर महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागाची वेबसाईट तुमच्यासमोर ओपन होईल. या वेबसाईटवर उजवीकडे आपली चावडी नावाचा पर्याय तुम्हाला दिसेल.
त्यावर क्लिक केल्यास आपली चावडी (Digital Notice Board) नावाचं एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल.
आता तुमच्या गावातील फेरफार नोंदी कशा जाणून घ्यायच्या ते पाहूया.
या पेजवर जिल्हा निवडा हा पर्याय आहे. त्याखालील जिल्हा या रकान्यासमोर तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे, तालुका या रकान्यासमोर तालुका निवडायचा आहे, तर गावाच्या रकानासमोर गावाचं नाव निवडायचं आहे.
ही माहिती भरून झाली की "आपली चावडी पहा" या पर्यायावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्यासमोर त्या गावातील फेरफाराच्या नोंदी ओपन होतील.
यामध्ये तुम्ही पाहू शकता की, फेरफार नंबर सुरुवातीला दिलेला असतो. त्यानंतर फेरफाराचा प्रकार म्हणजे शेतमजिनीवर बोजा चढवला किंवा कमी केला आहे काय, वारस नोंद केली आहे काय, जमीन खरेदी केली आहे काय, याप्रमाणे प्रकार नोंदवलेला असतो. त्यापुढे फेरफाराचा दिनांक, हरकत नोंदवण्याचे शेवटची तारीख आणि ज्या सर्वे किंवा गट क्रमांकशी संबंधित जमिनीचा व्यवहार झाला आहे तो सर्वे किंवा गट क्रमांक यांची माहिती दिलेली असते.
यानंतर सगळ्यात शेवटी पहा हा पर्याय तिथं दिलेला असतो. आता आपण अलीकडे म्हणजे 24 ऑगस्ट 2020ला नोंदवलेल्या फेरफाराविषयीची माहिती जाणून घेऊया.
या फेरफाराचा नंबर 3177 असून फेऱफाराचा प्रकार बोजा असा आहे. 178 या गट क्रमांकाशी संबंधित हा फेरफार आहे.
यासमोरील पहा या पर्यायावर क्लिक केल्यास तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल.
गाव नमुना 9 म्हणजेच फेरफाराची नोटीस असं या पेजचं शीर्षक आहे.
यामध्ये सुरुवातीला तालुक्याचं नाव आणि त्यापुढे गावाचं नाव नमूद केलेलं असतं. आता ही फेरफार नोटीस तीन रकान्यांत विभागलेला आहे.
यातील पहिल्या रकान्यात फेरफाराचा नंबर दिलेला असतो. त्यानंतर दुसऱ्या रकान्यात जमीन संपादित केलेल्या अधिकाराचं स्वरूप सांगितलेलं असतं. यामध्ये जमिनीच्या कोणत्या प्रकारच्या व्यवहार झाला आणि तो कोणाकोणात झाला, याविषयीची सविस्तर माहिती दिलेली असते.
यात पुढे हा व्यवहार कुणाकुणात झाला याची माहिती दिली आहे.
त्यानंतर तिसऱ्या रकान्यात ज्या शेतजमिनीवरील अधिकार संपादित केले आहे, त्या शेतजमिनीचा गट क्रमांक दिलेला असतो.
त्यानंतर त्याखाली या फेरफार नोंदीशी संबंधित काही हरकत असल्यास ती स्थानिक तलाठ्याकडे 15 दिवसांच्या आत कळवावी, अन्यथा तुमची कोणतीही हरकत नाही, असं समजलं जाईल, अशी सूचना तिथं दिलेली असते.
3 प्रकारच्या सुविधा
आपली चावडी उपक्रमाअंतर्गत नागरिकांना घरबसल्या डिजिटल सुविधा मिळणार आहेत.
सध्या तीन सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
यात नोटीस पहा या रकान्यात नागरिक फेरफाराची नोटीस पाहू शकतात. ही माहिती आपण नुकतीच पाहिली आहे.
त्यानंतर फेरफाराची स्थितीमध्ये फेरफाराच्या नोटीशीवर कुणी हरकत घेतली आहे का, हरकतीचा शेरा आणि तिचा तपशील दिलेला असतो. हरकतीसाठी 15 दिवसांचा अवधी दिला जातो. या कालावधीत कुणी हरकत घेतली नसेल तर फेरफारावरील नोंद प्रमाणित केली जाते आणि मग ती सातबाऱ्यावर नोंदवली जाते.
त्यानंतर तिसरा पर्याय आहे मोजणीची नोटीस. यात तुमच्या गावात जमीन मोजणी कुणी आणली आहे, याची सविस्तर माहिती दिलेली असते.
यात मोजणीचा प्रकार, मोजणीचा रेजिस्ट्रेशन क्रमांक, तालुका आणि गावाचं नाव, ज्या गट क्रमांकावर मोजणी करायची आहे तो गट क्रमांक, मोजणीचा दिनांक आणि मोजणीस येणाऱ्या कर्मचाऱ्याचं नाव आणि मोबाईल क्रमांक दिलेला असतो.
यानंतर शेतजमिनीचे लगतचे खातेदार आणि सहधारक यांची माहिती नमूद केलेली असते.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)