You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
नोवाक जोकोविचला युएस ओपन स्पर्धेतून बाहेर का पडावं लागलं?
जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या नोवाक जोकोविचवर शिस्तभंगाची कारवाई झाल्याने त्याचं युएस ओपन स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलं आहे.
जोकोविच आणि स्पेनचा पाब्लो कारेनो बुस्टा यांच्यातली मॅच सुरू होती. पहिल्या सेटमध्ये जोकोविच 5-6 असा पिछाडीवर होता. त्यावेळी जोकोविचने मारलेला बॉल महिला लाईन्समनला लागला. बॉल त्यांच्या गळ्याला लागला आणि त्या खाली कोसळल्या. अचानक झालेल्या बॉलमुळे त्यांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागला.
त्या बऱ्या आहेत ना हे पाहण्यासाठी जोकोविचने तातडीने धाव घेतली. काही मिनिटांनंतर त्या स्वत: उठून उपचारांसाठी कोर्टाबाहेर गेल्या.
सामनाधिकाऱ्यांशी झालेल्या दहा मिनिटांच्या चर्चेनंतर अंपायरने कारेनो बुस्टा विजयी असल्याचं घोषित केलं.
शिस्तभंगाची कारवाई होऊन ग्रँड स्लॅम स्पर्धा सोडावी लागणारा जोकोविच केवळ तिसरा टेनिसपटू आहे. याआधी 1990 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेतून जॉन मॅकेन्रो यांना तर 2000 मध्ये फ्रेंच ओपन स्पर्धेत स्टेफान कोयुबेक यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली होती.
जोकोविच कारकीर्दीतील 18वं ग्रँड स्लॅम पटकावण्यासाठी उत्सुक होता. मात्र या अनपेक्षित घटनेनंतर जोकोव्हिचला रित्या हातानेच माघारी परतावं लागणार आहे.
दरम्यान, जोकोविचवर ही कारवाई झाल्यानंतर जगभरातून त्याला पाठिंबाही मिळत आहे आणि त्याच्यावर टीकाही होते आहे. जोकोविचच्या हातून नकळत चूक झाली, त्यासाठी एवढी मोठी शिक्षा द्यायला नको असा काही चाहत्यांचा सूर आहे तर जोकोविचला आपल्या रागावर नियंत्रण ठेवता येत नाही, त्याच्यावर झालेली कारवाई योग्यच आहे असं काहींचं म्हणणं आहे.
ग्रँड स्लॅम पटकावणाऱ्यांमध्ये रॉजर फेडरर (20), रफाल नदाल (19) तर जोकोव्हिच (17) आहे.
"या संपूर्ण प्रकरणाने मी अतिशय दु:खी झालो आहे आणि मी काहीतरी गमावून रिता झाल्याची भावना मनात आहे. मी लाईन्सपर्सनच्या प्रकृतीविषयी विचारलं. देवाच्या दयेने त्यांची तब्येत आता स्थिर असल्याचं त्यांनी मला सांगितलं. माझ्यामुळे त्यांना त्रास झाला, तीव्र वेदनांतून जावं लागलं. पण हे नकळतपणे झालं. किती चुकीचं. त्यांची गोपनीयता राखण्यादृष्टीने मी त्यांचं नाव मी सांगणार नाही. शिस्तभंगाच्या कारवाईबद्दल बोलायचं तर मला परतल्यानंतर माझ्या रागावर नियंत्रण ठेवणं शिकावं लागेल.
या प्रसंगातून बोध घेत अधिक चांगला खेळाडू आणि माणूस म्हणून पुनरागमन करेन. माझ्या वर्तनासाठी, युएस ओपन स्पर्धेशी संलग्न प्रत्येकाची मी माफी मागतो. माझ्या कारकीर्दीत प्रत्येक प्रसंगात माझ्या पाठीमागे ठामपणे उभी राहणारी माझी टीम. कुटुंबीय आणि चाहते यांचा मी ऋणी आहे. थँक्यू आणि सॉरी", अशा शब्दात जोकोविचने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत."
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)