यूएस ओपन: फेडरर- नदालविना कशी पार पडणार स्पर्धा ?

    • Author, जान्हवी मुळे
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

फेडरर नाही, नदाल नाही आणि प्रेक्षकही नाहीत... न्यूयॉर्कमध्ये यूएस ओपन टेनिस स्पर्धेला 31 ऑगस्टपासून सुरूवात होते आहे, ती कोरोना व्हायरसच्या साथीच्या सावटाखाली.

या स्पर्धेत कोणते खेळाडू खेळणार आहेत आणि त्यांच्या सुरक्षिततेसाठी काय उपाययोजना केल्या आहेत, हे आपण जाणून घेणार आहोत. पण मुळात यंदा ही स्पर्धा खेळांच्या दृष्टीनं एवढी महत्त्वाची का आहे?

'कोव्हिड हॉटस्पॉट'मध्ये होणारी स्पर्धा

अमेरिकेत सुरुवातीला कोरोना व्हायरसच्या साथीचा मोठा उद्रेक न्यूयॉर्कमध्ये पाहायला मिळाला होता. त्यातही न्यूयॉर्कचा 'क्वीन्स' भाग सर्वात जास्त प्रभवित झाला होता.

त्याच क्वीन्समधल्या 'फ्लशिंग मीडोज'मध्ये बिली जिन किंग टेनिस सेंटर आहे, जिथे दरवर्षी यूएस ओपन स्पर्धांचं आयोजन होतं.

कोव्हिडचा मोठा हॉटस्पॉट ठरलेल्या शहरात स्पर्धेचं यशस्वी आयोजन झालं, तर इतर खेळांच्या मोठ्या स्पर्धांचा मार्गही मोकळा होईल.

कोव्हिडनंतरची सर्वात मोठी स्पर्धा

कोव्हिडचं संकट जगभर पसरल्यावर आयोजित होणारी ही पहिलीच मोठी स्पर्धा आहे.

खरं तर लॉकडाऊनच्या दिवसांत जगभरात जवळपास सर्वच खेळ पूर्णपणे बंद होते. पण आता हळूहळू, खबरदारी घेत काही ठिकाणी स्पर्धा खेळवल्या जातायत. इंग्लंडमध्ये क्रिकेट सामने सुरू झाले आहेत आणि युरोपात दोन-अडीच महिन्यांपासून वेगवगळ्या फुटबॉल लीग्सचं आयोजन होतंय.

पण या स्पर्धांपेक्षाही यूएस ओपनवर सगळ्यांचं लक्ष आहे, कारण ही खऱ्या अर्थानं 'ग्लोबल' स्पर्धांपैकी एक आहे. जगभरातले खेळाडू त्यात सहभागी होतात. आणि जगभरातले चाहते प्रत्यक्षात किंवा टीव्हीवरून ते सामने पाहतात. अर्थात यंदा मात्र प्रेक्षकांना या लढती प्रत्यक्ष पाहता येणार नाहीत

'आर्थर ॲश'वर शांतता

यूएस ओपनचं मुख्य कोर्ट, म्हणजे आर्थर ॲश स्टेडियम हे जगातलं सर्वात मोठं टेनिस स्टेडियम आहे. त्यात तेवीस हजार प्रेक्षकांसमोर खेळणं हा कुठल्याही टेनिसपटूसाठी विलक्षण अनुभव असतो.

ईडन गार्डन्स किंवा मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर क्रिकेटच्या सामन्यांत चाहते जसा मोठा जल्लोष करतात, तसंच उत्साहाचं चित्र इथे टेनिसच्या सामन्यांदरम्यान पाहायला मिळतं. फक्त आर्थर ॲश स्टेडियमच नाही, तर हा सगळा परिसरच एरवी या स्पर्धेदरम्यान टेनिस चाहत्यांनी फुलून जातो.

चाहत्यांचा उत्साह खेळाडूंनाही चांगली कामगिरी करण्यासाठी प्रेरणा देतो. त्यामुळे चाहत्यांची उणीव चांगलीच जाणवेल असं ब्रिटनचा टेनिसस्टार अँडी मरेनं म्हटलं आहे.

फेडरर, नदालविना यूएस ओपन

स्वित्झर्लंडचा दिग्गज टेनिसस्टार आणि यूएस ओपनमध्ये पुरुष एकेरीत पाच विजेतेपदं मिळवणारा रॉजर फेडरर यंदा या स्पर्धेत खेळणार नाही. गुडघ्यावरील शस्त्रक्रियेतून अजून सावरला नसल्यानं त्यानं या वर्षातील उर्वरीत सामन्यांतून माघार घेतली असल्याचं जाहीर केलं होत.

तर फेडररचा कट्टर प्रतिस्पर्धी आणि चारवेळा यूएस ओपन जिंकणाऱ्या राफेल नदालनं कोरोना व्हायरसच्या संसर्गाचा धोका टाळण्यासाठी या स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. फेडरर किंवा नदालपैकी कुणीही यूएस ओपन न खेळण्याची 1999 नंतर म्हणजे वीस वर्षांमधली ही पहिलीच वेळ असणार आहे.

स्वित्झर्लंडच्या स्टॅनिस्लास वावरिंकानंही स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. तर ऑस्ट्रेलियाच्या निक किर्गियोसनं "या साथीत मृत्यूमुखी पडलेल्या शेकडो, हजारो लोकांसाठी मी या स्पर्धेत खेळणार नाही" असं म्हणत आपण माघार घेत असल्याचं कळवलं होतं.

दिग्गज महिला खेळाडूंची माघार

नदाल आणि निक किर्गियोसप्रमाणेच इतरही अनेक खेळाडूंनी स्पर्धेसाठी न्यूयॉर्कला न जाण्याचा निर्णय घेतला आहे. विशेषतः महिला एकेरीत आघाडीच्या दहा खेळाडूंपैकी सहाजणींनी स्पर्धेतून माघार घेतली आहे.

कॅनडाची टेनिस तारका आणि यूएस ओपनची गतवेळची विजेती बियांका अँड्रेस्क्यू, जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेली ऑस्ट्रेलियाची ॲशली बार्टी आणि दुसऱ्या स्थानावर असलेली माजी विम्बल्डन विजेती सिमोना या तिघींनीही न खेळण्याचा निर्णय घेतला आहे.

सेरेना, जोकोविच, मरेवर नजर

अनेक तगड्या खेळाडूंनी माघार घेतली असली, तरी सेरेना विल्यम्सची उपस्थिती हे या स्पर्धेचं ठळक वैशिष्ट्य ठरू शकत. आपल्या घरच्या मैदानात 24वं विक्रमी ग्रँडस्लॅम विजेतेपद जिंकण्याची संधी सेरेना साधणार का, हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल.

पुरुष एकेरीत फेडरर आणि नदाल खेळत नसले तरी वर्ल्ड नंबर वन नोवाक जोकोविच मात्र या स्पर्धेत खेळणार आहे. गेल्या महिन्यातच तो कोरोना विषाणूच्या संसर्गातून बरा झाला होता. यंदाचं ऑस्ट्रेलियन ओपन जिंकणाऱ्या जोकोविचला यूएस ओपनमध्येही विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानलं जातंय.

ब्रिटनचा माजी वर्ल्ड नंबर वन अँडी मरे दुखापतींमुळे गेल्या वर्षी नोव्हेंबरपासून टेनिस कोर्टवर फारसा दिसलेला नाही. त्यामुळं जागतिक क्रमवारीत तो 134व्या स्थानावर आहे, मात्र यूएस ओपनमध्ये तो जोकोविचला मोठं आव्हान देऊ शकतो.

खेळाडूंच्या सुरक्षिततेचं काय?

यूएस ओपनसाठी आयोजकांनी 'बबल' तयार केलं आहे. म्हणजे स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंना बाकीच्या जगाशी कमीत कमी संपर्क ठेवायचा आहे. हे नियम मोडले जाणार नाहीत याचीही काळजी घेतली जाते आहे.

बहुतांश खेळाडू लाँग आयलंड भागातल्या दोन हॉटेल्समध्ये राहात आहेत, पण जोकोविच आणि सेरेनासारखे काहीजण स्वतःच्या घरी राहात आहेत.

स्पर्धेसाठी जमा झालेल्या खेळाडूंची आणि त्यांच्या सपोर्ट स्टाफची आधीच दोनदा कोव्हिडसाठी तपासणी करण्यात आली असून कुणालाही सध्या संसर्ग झालेला नाही, याची खात्री करून घेतली आहे. स्पर्धेदरम्यान कुणाला लागण झाली, तर त्या खेळाडूला स्पर्धेतून माघार घ्यावी लागेल.

कोर्टवर पंचांसाठीही काही विशिष्ट नियम आखण्यात आले आहेत. एरवी बॉल कोर्टच्या आत आहे की बाहेर हे सांगण्याचं काम लाईन जजेस करतात. पण यंदा आर्थर ॲश स्टेडियम आणि लुई आर्मस्ट्राँग स्टेडियम ही मुख्य कोर्ट्स वगळता इतर कोर्ट्सवर लाईन जजेसऐवजी इलेक्ट्रॉनिक सिस्टिमचा वापर करण्यात आला आहे.

तसंच या सामन्यांमध्ये नेहमीच्या सहा बॉल बॉईजऐवजी चारच बॉल बॉईज असतील. पुरुष आणि महिला दुहेरीच्या सामन्यांची संख्या कमी करण्यात आली आहे. तर मिश्र दुहेरी स्पर्धेचं आयोजन होणार नाही.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)