मुधोळ हाऊंड : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षा ताफ्यात समाविष्ट झालेला मुधोळ हाऊंड कुत्रा कसा असतो?

मुधोळ हाऊंड

फोटो स्रोत, Pinterest

फोटो कॅप्शन, मुधोळ हाऊंड

मुधोळ हाऊंड. दिसायला सडपातळ, सामान्य कुत्र्यापेक्षा थोडी जास्त उंची, लांबसडक शरीर लाभलेली ही श्वानाची एक भारतीय प्रजाती. सध्या 'मुधोल हाऊंड' या भारतीय श्वानाची चर्चा होण्याचं कारण म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षा ताफ्यात त्यांचा झालेला समावेश,

यापूर्वी त्यांनी या प्रजातीचा 'मन की बात' कार्यक्रमात उल्लेख केला होता.

प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी पंतप्रधान मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमाचं प्रसारण होतं.

या कार्यक्रमात मोदी यांनी लॉकडाऊन, आदिवासी समाज, शेती आणि रोजगार यांसारख्या विषयांवर माहिती दिली.

यावेळी पंतप्रधान मोदी यांनी भारतीय लष्करातील सोफी आणि विदा या श्वानांचा उल्लेख केला. श्वानांनी कशाप्रकारे देशाच्या रक्षणात योगदान दिलं, याबाबत मोदींनी माहिती दिली. दरम्यान मोदींनी मुधोळ हाऊंड या भारतीय प्रजातीचा उल्लेख केला.

यावेळी मोदी म्हणाले, "श्वानांच्या भारतीय प्रजातीसुद्धा अत्यंत सक्षम असतात. यामध्ये मुधोळ हाऊंड, हिमाचली हाऊंड, राजापलायम, कन्नी, चिप्पी पराई, कोम्बाई यांचा समावेश आहे.

या श्वानांना पाळण्याचा खर्च कमी असतो. भारतीय वातावरणाची या श्वानांना सवय असते. त्यामुळे भारतीय सुरक्षा बलाने या भारतीय श्वानांना आपल्या पथकात समाविष्ट करून घेण्याचा निर्णय घेतला आहे.

नरेंद्र मोदी

फोटो स्रोत, Twitter

गेल्या काही वर्षांत भारतीय लष्कर, CISF, NSG ने मुधोळ हाऊंडला आपल्या श्वानपथकात समाविष्ट केलं. तुम्ही या श्वानांबाबत इंटरनेटवरून माहिती मिळवा, यांची क्षमता आणि सौंदर्य पाहून तुम्हाला खरंच आश्चर्य वाटेल. पुढच्या वेळी श्वान पाळण्याचा विचार करत असताना तुम्हाला या प्रजाती नक्कीच पाळू वाटतील," असं मोदी म्हणाले होते.

मोदींनी उल्लेख केलेल्या वरील प्रजातींपैकी महाराष्ट्र आणि परिसरात हमखास आढळणारी प्रजात म्हणजे मुधोळ हाऊंड.

कर्नाटकच्या बागलकोट जिल्ह्यातील मुधोळ या गावावरून या प्रजातीचं नाव ठेवण्यात आलं आहे.

मुधोळ हाऊंड शिकार आणि सुरक्षा करण्यासंबंधीत कौशल्यामुळे अत्यंत लोकप्रिय आहेत. मुधोळ हाऊंड कुत्रे अत्यंत वेगाने धावू शकतात. यांची हालचाल अतिशय चपळ असते. यांच्यातील उर्जा, तीक्ष्ण नजर आणि गंध ओळखण्याची क्षमता खूप जास्त आहे.

इंडियन एक्सप्रेस मधील एका बातमीनुसार, वरील गुणांमुळेच या प्रजातीच्या काही पिलांना 2016 मध्ये मेरठमध्ये भारतीय लष्कराच्या रिमाऊंट अँड वेटर्नरी कोअर (RVC) मध्ये नेण्यात आलं.

RVC च्या इतिहासात पहिल्यांदाच इथं एखादी भारतीय श्वानाची प्रजात आणली गेली होती. याठिकाणी लॅब्राडोर आणि जर्मन शेफर्ड यांच्यासारख्या विदेश प्रजातीच्या कुत्र्यांना प्रशिक्षण देण्यात येतं. पुढे हे कुत्रे प्रशिक्षित होऊन भारतीय लष्कराचा भाग बनतात.

लष्करातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशिक्षणात सहभागी झालेल्या आठपैकी सहा मुधोळ हाऊंड कुत्र्यांना श्रीनगर हेडक्वार्टर 15 कोअर आणि नगरोटा हेडक्वार्टर 16 कोअर मध्ये फिल्ड एव्हल्यूशन आणि सुटेबिलिटी ट्रायलसाठी तयार करण्यात आलं.

या कुत्र्यांना पश्मी किंवा करवानी नावानेसुद्धा ओळखलं जातं. दख्खनच्या पठारी प्रदेशात अनेक गावांमध्ये हे कुत्रे पाळली जातात.

त्यांना अत्यंत प्रेमाने आणि सन्मानाने पाळल्यास हे अतिशय प्रामाणिकपणे वागतात, असं म्हटलं जातं. पण या कुत्र्यांची वागणूक थोडी रागीट असते. अनोळखी लोकांनी हात लावणं या कुत्र्यांना आवडत नाही.

काय आहे इतिहास?

मुधोळ हाऊंड कुत्रे राखणदारी करण्यासाठी साध्या कुत्र्यांच्या तुलनेत प्रचंड हुशार असतात. ते अत्यंत गंभीर व चाणाक्ष असतात.

कर्नाटकातील मुधोळ गावात 750 कुटुंब या कुत्र्यांचं पालन करत आहेत. थोडे मोठे झाल्यानंतर या कुत्र्यांची विक्री केली जाते.

पण हा कुत्रा दक्षिण भारतात कसा पोहोचला, याची कहाणी अत्यंत रंजक आहे.

मध्य आशिया आणि अरेबिया हे मुधोळ हाऊंड प्रजातीचं मूळ स्थान असल्याचं सांगितलं जातं. या परिसरातून हा कुत्रा भारताच्या पश्चिमेपर्यंत आला. पुढे महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात तो दाखल झाला. हा कुत्रा याच परिसरात मोठ्या प्रमाणात पाळला जातो.

मुधोळ प्रांताचे राजे श्रीमंत मालोजीराजे घोरपडे यांनी या प्रजातीची सर्वप्रथम दखल घेतली होती. काही आदिवासी लोक या कुत्र्याची प्रजात पाळत असल्याचं त्यांना दिसलं. त्यांनी या कुत्र्याबाबत माहिती घेऊन याला 'बेडर' असं नाव दिलं. बेडर म्हणजेच निर्भिड किंवा निडर.

1900 च्या सुरुवातीला मुधोळचे महाराज इंग्लंडच्या दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी किंग जॉर्ज पंचम यांना मुधोळ हाऊंड प्रजातीचे दोन कुत्रे भेट स्वरूपात देण्यात आले होते.

भारतीय लष्करानेही या कुत्र्यांमध्ये रस दाखवला आहे. सीमा सुरक्षा आणि तपासकामाच्या माध्यमातून मुधोळ हाऊंड प्रजातीचा उपयोग देशासाठी केला जात आहे.

पूर्वीसुद्धा उल्लेख

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकच्या जमखंडी गावातील प्रचारसभेतही मुधोळ हाऊंड प्रजातींचा उल्लेख केला होता.

या श्वान प्रजातीला लष्करात वापरलं जात असल्याचं सांगत त्यांनी काँग्रेसवर जहरी टीका केली होती.

त्यावेळी केलेल्या भाषणात मोदी म्हणाले होते, "आपल्या देशात राष्ट्रभक्तीचा उल्लेख होतो, तेव्हा काही लोकांना काळजी वाटू लागते. स्वातंत्र्यानंतर काँग्रेस या पातळीवर जाईल असा कुणी विचार केला होता का? आज त्यांचे नेते भारताचे तुकडे होतील, अशा घोषणा करणाऱ्यांमध्ये जाऊन आशीर्वाद देतात."

"काँग्रेसचा अहंकार शीगेला पोहोचला आहे. देशाच्या जनतेने त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. पण ते अजूनही जमिनीवर आलेले नाहीत. त्यामुळे काँग्रेस मुधोळ हाऊंड कुत्र्यांकडून काही शिकवण घेईल, अशी अपेक्षा आपण करू शकत नाही," असं मोदी म्हणाले होते.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)