You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
नरेंद्र मोदी सरकार आणि भारताविषयी चीनच्या जनतेला काय वाटतं?
- Author, सरोज सिंह
- Role, बीबीसी हिंदी प्रतिनिधी
ग्लोबल टाईम्स या चीनच्या सरकारी वृत्तपत्राने एक सर्व्हे केला आहे. यात चीनी जनतेला भारत-चीन संबंधांबाबत काय वाटतं, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या सर्व्हेमध्ये चीनमधल्या बिजिंग, वुहान, शांघाई यासारख्या दहा मोठ्या शहरांमधल्या जवळपास दोन हजार लोकांनी सहभाग घेतला.
सर्व्हेत भारताची प्रतिमा, गेल्या काही दिवसांपूर्वीचा सीमेवरील तणाव, भारतात चीनी वस्तुंचा बहिष्कार इथपासून ते दोन्ही देशांच्या संबंधात अमेरिकेचा हस्तक्षेप, अशा अनेक विषयांवर प्रश्न विचारण्यात आले.
या सर्व्हेचे निष्कर्ष ग्लोबल टाईम्सने छापले आहेत. चायना इन्स्टिट्युट ऑफ कॉन्टेम्पररी इंटरनॅशन रिलेशन्स (CICIR) यांच्या संयुक्त विद्यमाने केला आहे. 17 ते 20 ऑगस्ट या काळात हा सर्व्हे करण्यात आला आहे.
सर्वेक्षणात असं आढळून आलं की सर्व्हेमध्ये सहभागी झालेल्या 51% लोकांनी मोदी सरकारला पसंती दर्शवली आहे. तर दुसरीकडे भारताविरोधात युद्ध कारवाई योग्य आहे, असं 90% लोकांचं मत आहे.
मोदी सरकारला लोक पसंत करत असल्याची बातमी गुरुवारी दुपारपर्यंत ग्लोबल टाईम्स वृत्तपत्रात होती. मात्र, दुपारनंतर बातमीतला तो भाग काढून टाकण्यात आला. मात्र, या वृत्तपत्राने केलेल्या ट्वीटमध्ये मोदी सरकारला लोक पसंती देत असल्याचा उल्लेख अजूनही आहे.
इतकंच नाही तर सर्व्हेत सहभागी झालेल्या 70% लोकांना वाटतं की भारताची चीनप्रतिची वागणूक अधिक शत्रूत्वाची आहे. तसंच काही दिवसांपूर्वी चीनी सरकारने भारताविरोधात जी पावलं उचलली, त्याचं ते समर्थन करतात.
सर्व्हेतील इतर तपशील
भविष्यातही भारत चीनला चिथावत असेल आणि सीमेवर तणाव वाढत असेल तर चीनने प्रत्युत्तरादाखल कारवाई करणं योग्य आहे, असं 90% लोकांना वाटतं. मात्र, सर्व्हेतले 26% लोकांच्या मते भारत एक चांगला शेजारी देश आहे. चीनच्या 'मोस्ट फेबरेबल' राष्ट्रांच्या यादीत या लोकांनी भारताला चौथं स्थान दिलं आहे. त्याआधी रशिया, पाकिस्तान आणि जपानचा क्रमांक लागतो. मात्र, दक्षिण कोरियापेक्षा भारताचा क्रमांक वरचा आहे.
चीनमध्ये 56% जनतेला भारताविषयी बरीचशी माहिती असल्याचं समोर आलं आहे.
सर्व्हेचे निष्कर्ष CICIR चे साउथ एशिया स्टडीच्या संचालकांसाठीही आश्चर्यकारक आहेत. या निष्कर्षावर ग्लोबल टाईम्सला प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की दोन्ही देशांमध्ये 'पिपल टू पिपल' कॉन्टॅक उत्तम असल्याचाही हा परिणाम असू शकतो.
- वाचा-कोरोना व्हायरसची नवी लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोनावरची लस बनवण्याचं काम कुठवर आलं? येत्या सप्टेंबरपर्यंत लस येणार?
- वाचा- कोरोनाचं संकट कधी आणि कसं संपणार?
सर्व्हे करणाऱ्यांच्या मते सर्व्हेवरून असा अर्थ काढता येतो की दोन्ही देशांच्या सरकारमध्ये काहीही सुरू असलं तरी जनतेवर त्याचा फारसा परिणाम होत नाही आणि ते स्वतःच्या पातळीवरही संबंधांचं आकलन करतात.
या सर्व्हेतून असंही आढळून आलं आहे की चीनी जनतेला भारताच्या तुलनेत अमेरिका आणि युरोपची माहिती अधिक आहे. भारताबाबतही ही गोष्ट तेवढीच खरी आहे.
या सर्व्हेत एक प्रश्न असा विचारण्यात आला की भारत म्हटलं की सर्वांत आधी त्यांच्या मनात कुठली प्रतिमा तयार होते. जवळपास 31% लोकांचं उत्तर होतं - 'भारतीय समाजात स्त्रियांना दुय्यम वागणूक'. 28% लोकांचं उत्तर होतं - 'लोकसंख्येच्या बाबतीत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश'. 22% लोकांचं उत्तर होतं - 'भारतीय योग'.
भारत-चीन संबंध
यावर्षी मे महिन्यापासूनच भारत-चीन या दोन राष्ट्रांमध्ये लद्दाख सीमेवर तणाव होता.
15-16 जून रोजी लद्दाखमधल्या गलवान खोऱ्यात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर झालेल्या चकमकीत एका कर्नलसह 10 भारतीय जवानांचा मृत्यू झाला होता. तेव्हापासूनच दोन्ही देशांचे संबंध ताणले गेले आहेत. हा तणाव निवळण्यासाठी दोन्ही देशात सैन्य पातळीवर चर्चा सुरू आहे. मात्र, अजूनही या चर्चेला यश आलेलं नाही.
या तणावाच्या काळातच हा सर्व्हे करण्यात आला आहे. सर्व्हेचे निष्कर्ष दोन्ही देशांच्या संबंधांबाबत बरंच काही सांगतात. तणावाच्या या परिस्थितीतच केंद्र सरकारने 50 हून अधिक चीनी अप्सवर बंदी घातली.
तर अनेक सरकारी लिलावात भाग घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय कंपन्यांसाठीचे नियम कडक केले. केंद्र सरकारने उचललेल्या या दोन्ही पावलांकडे दोन्ही देशांच्या संबंधांवर बारकाईने लक्ष ठेवून असणारे जाणकार चीनशी बिघडत असलेल्या संबंधाशी जोडून बघतात.
मात्र, ऑगस्ट महिन्यात करण्यात आलेल्या या सर्व्हेत सहभागी झालेल्या जवळपास 25% लोकांना असं वाटतं की भविष्यात दोन्ही देशातले संबंध सुधारतील. मात्र, 57% लोकांना असंही वाटतं की भारताची सैन्य ताकद चीनसाठी धोका नाही.
भूतकाळाचा विचार केला तर या दोन्ही देशांमध्ये 1962 साली युद्ध झालं होतं. त्यात चीनचा विजय झाला होता. तर भारताला पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर 1965 आणि 1975 सालीदेखील दोन्ही देशांमध्ये हिंसक चकमक झाली होती. दोन्ही देशातल्या हिंसक चकमकीची जून 2020 ची घटना चौथी घटना ठरली.
चीनी वस्तूंवर बहिष्कार
चीनबरोबरच्या संघर्षावरून विरोधी पक्षांनी केंद्र सरकारला चांगलंच धारेवर धरलं. मात्र, चीनमधून अशा प्रकारचं कुठलंच वृत्त आलं नाही.
नुकतंच कोरोना काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकलसाठी व्होकल होण्याची हाक दिली तेव्हा त्यालाही चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याच्या अंगाने बघण्यात आलं. भारतात अनेक ठिकाणी चीनी वस्तूंच्या बहिष्काराच्या मोहीम राबवण्यात आली.
या सर्व्हेमध्ये चीन-भारत व्यापारासंबंधीही प्रश्न विचारण्यात आले होते. भारताने उचललेल्या पावलांवर 35% चीनी जनता नाराज आहे आणि चीननेही भारताला असंच प्रत्युत्तर द्यायला हवं, असं त्यांचं मत आहे. 50% चीनी जनतेला वाटतं की भारत आर्थिकदृष्ट्या चीनवर अवलंबून आहे.
चीनच्या लोकसंख्येच्या तुलनेत सर्व्हेमध्ये सहभागी झालेल्या लोकांची संख्या खूप कमी आहे. मात्र, भारत-चीन सीमावादाच्या दृष्टीने हा सर्व्हे महत्त्वाचा आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)