कोरोना व्हायरस : 'आईवडिलांना विनाकारण कोव्हिड वॉर्डात दाखल केलं'

ताराबेन आणि गणपतभाई

फोटो स्रोत, Bhargav parekh

फोटो कॅप्शन, ताराबेन आणि गणपतभाई
    • Author, भार्गव पारेख
    • Role, बीबीसी गुजरातीसाठी

"माझ्या आईला हृदयाचा आजार होता. कुठलंच खाजगी हॉस्पिटल त्यांच्यावर उपचार करायला तयार नव्हतं. अखेर आम्ही तिला एका सरकारी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो आणि तिथे गेल्यावर त्या लोकांनी माझ्या आईला कोरोना वार्डात पाठवलं."

"माझ्या वडिलांची प्रकृती बिघडली होती. कारण त्यांच्यावर योग्य उपचार झाले नव्हते. आम्ही त्यांना हॉस्पिटलमध्येही घेऊन गेलो. त्यांनाही कोरोना वार्डात ठेवलं. दोघांचाही मृत्यू झाला. हॉस्पिटलने आम्हाला त्यांच्या अंगावरचे दागिनेही दिले नाहीत."

28 वर्षांच्या तेजल शुक्ला यांचं कोव्हिड-19 मुळे जे नुकसान झालं ते सांगण्यासाठी त्यांच्याकडे शब्दही नाहीत. अवघ्या 48 तासात तेजल यांनी आई आणि वडिल दोघांनाही गमावलं.

दोघांनाही संशयित कोव्हिड रुग्ण म्हणून सरकारी हॉस्पिटलच्या कोव्हिड वार्डात दाखल करण्यात आलं होतं. या प्रकरणाचा तपास व्हावा, अशी तेजल यांची मागणी आहे. त्यासाठी त्यांनी 20 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकाऱ्यांना पत्रही लिहिलं आहे.

गुजरातची राजधानी गांधीनगरमध्ये राहणाऱ्या तेजल शुक्ला यांच्या आई-वडिलांची शेवटची आठवण म्हणजेच त्यांच्या अंगावरचे दागिनेही हॉस्पिटलने परत केलेले नाहीत, असं तेजलचं म्हणणं आहे. आई-वडिलांची शेवटची आठवण म्हणून त्या दागिन्यांचं मोल पैशात मोजता येत नसल्याचं तेजल सांगतात.

गेले दोन महिने त्यांचा हा संघर्ष सुरू आहे. बीबीसीशी बोलताना त्या म्हणाल्या, "माझी आई ताराबेन अंगणवाडीत नोकरी करायची. तिथून ती निवृत्त झाली होती. माझे वडील गणपतभाई सरकारी ऑफिसमध्ये ड्रायव्हर होते. तेही सेवानिवृत्त होते."

कोरोना

फोटो स्रोत, Alamy

लाईन

ताराबेन आणि गणपतभाई यांना दोन मुली आहेत. तेजल आणि पूनम. पूनमचा घटस्फोट झाला आहे. तेव्हापासून ती आपल्या आई-वडिलांसोबतच राहायची.

आई-वडिलांच्या आजारपणाविषयी सांगताना तेजलने सांगितलं, "जवळपास चार वर्षांपूर्वी माझ्या आईला हृदयाशी संबंधित आजार असल्याचं कळालं. तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. 15 जून रोजी त्यांची प्रकृती अचानक ढासळली. कुठलाच खाजगी दवाखाना त्यांना दाखल करून घ्यायला तयार नव्हता. त्यामुळे आम्ही तिला गांधीनगरमधल्या सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं."

"हॉस्पिटलने आईला कोव्हिड-19 ची लागण झाली आहे का, याची शहानिशा न करताच कोव्हिड वॉर्डात दाखल केलं. आमच्यासाठी हा मोठा धक्का होता. पण, आमच्या हातात काहीच नव्हतं."

"माझ्या आईला हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याबरोबर घरी वडिलांचीही तब्येत बिघडली. कारण हॉस्पिटलने तिला कोव्हिड वार्डात शिफ्ट केल्यावर तिने घरी व्हीडियो कॉल केला आणि ती खूप रडली. माझ्या वडिलांना तिची ती परिस्थिती बघवली नाही."

तेजल शुक्ला

फोटो स्रोत, Bhargav parekh

फोटो कॅप्शन, तेजल शुक्ला

वडिलांना हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याबद्दल बोलताना तेजलने सांगितलं, "दुसऱ्या दिवशी एक वैद्यकीय पथक आमच्या घरी आलं. घर निर्जंतूक केलं. त्यानंतर घरातल्या सगळ्यांची तपासणी केली. माझ्या वडिलांनी अस्वस्थ वाटत असल्याचं आणि थकवा जाणवत असल्याचं सांगितलं. त्यांनाही ते हॉस्पिटलला घेऊन गेले आणि 17 जून रोजी त्यांनाही कोव्हिड वॉर्डात दाखल केलं."

कुटुंबातल्या कुणालाही त्यांना भेटण्याची परवानगी नव्हती.

तेजल पुढे सांगत होत्या, "मला सारखी आई-वडिलांची आठवण येते. ते हॉस्पिटलमधून व्हीडियो कॉल करून रडायचे, इथून घरी घेऊन जा म्हणायचे. त्यांचे ते चेहरे आठवतात आणि मग रात्र-रात्र झोप येत नाही."

"21 जूनला आई वारली आणि अवघ्या दोनच दिवसात 23 जूनला वडिलांनी जगाचा निरोप घेतला. आमचं सारं विश्वच उद्ध्वस्त झालं. शेवटी आम्हाला फक्त दुरून त्यांचे चेहेरे दाखवण्यात आले."

ताराबेन आणि गणपतभाई

फोटो स्रोत, Bhargav parekh

अस्पृश्य असल्याची भावना

आई-वडील गमावल्याचं दुःख तेजल आणि पूनम यांच्यासाठी मोठा धक्का होता. पण, त्याहून मोठा धक्का बसणं, अजून बाकी होतं. तेजल सांगत होत्या की त्यांचं सांत्वन करण्यासाठीही कुणी आलं नाही.

बीबीसी गुजरातीशी बोलताना त्या म्हणाल्या, "आमचं घरं कोव्हिड इन्फेक्टेड घोषित केल्याबरोबर मोहल्ल्यातले सगळे आमच्यापासून लांब राहू लागले. मित्रमंडळी, नातेवाईक इतकंच काय तर शेजारी-पाजारीही बोलत नव्हते. आम्ही पूर्णपणे अस्पृश्य झालो होतो."

हिंदू परंपरेनुसार ब्राह्मणाच्या घरी कुणाचा मृत्यू झाल्यास घरात 12 दिवस स्वयंपाक करत नाहीत. मात्र, हे 12 दिवसही कुणीच मदत केली नाही.

"आमची मुलं भुकेने व्याकुळ होऊन रडायची. पण कुणी बघायचंही नाही. पोरं उपाशीपोटी झोपू नये, म्हणून आम्ही हॉटेलमधून जेवण मागवायचो."

काही दिवसांनंतर तेजल आई-वडिलांच्या घरी गेल्या तेव्हा वडिलांची रिंग आणि चेन आणि आईचे पैंजण घरी नव्हते.

तेजलने सांगितलं की त्यांचे आई-वडिल दागिने सांभाळून ठेवायचे. तेजलच्या सासऱ्यांनी तिच्या वडिलांना अंगठी दिली होती. ते कधीच बोटातून अंगठी काढत नसत. "लग्नाच्या 25 व्या वाढदिवसाला माझ्या वडिलांनी आईला सोन्याची साखळी आणि चांदीचे पैंजण गिफ्ट केले होते. ते दागिने किती मोलाचे होते, ते फक्त आम्हालाच माहीत. ते दागिने आमच्या आई-वडिलांची शेवटची आठवण होते."

या दागिन्यांविषयी हॉस्पिटलच्या स्टाफला विचारपूस केली तेव्हा ते नीट बोललेही नाही, असं तेजलचं म्हणणं आहे.

तेजल म्हणाल्या, "हॉस्पिटलचा स्टाफ म्हणतो दोन महिन्यांहून जास्त काळ लोटला आहे. त्यामुळे आमच्याकडे रेकॉर्ड नाही. मला न्याय मिळावा, यासाठी मी जिल्हाधिकाऱ्यांनाही भेटले."

हॉस्पिटलने फेटाळले आरोप

गांधीनगरच्या सरकारी हॉस्पिटलमधल्या निवासी डॉक्टर सुधा शर्मा यांनी बीबीसी गुजरातीशी बोलताना सांगितलं की दोन्ही रुग्णांना आरोग्यविषयक अनेक समस्या होत्या. त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं त्यावेळी त्यांच्या प्रकृतीत बरेच कॉम्प्लिकेशन्स होते.

दोन्ही रुग्णांवर प्रोटोकॉलनुसार उपचार करण्यात आल्याचं त्यांचं म्हणणं आहे. "आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे अहवाल सादर करू. आमच्याकडे सर्व पावत्या आहेत. दागिने सुपूर्द केल्याचीही पावती आहे."

मात्र, शेवटच्या श्वासापर्यंत लढू, असं तेजल यांचं म्हणणं आहे.

"मी हॉस्पिटलच्या आवारात धरणं देईल आणि गरज पडली तर उपोषणही करेन. माझ्या आई-वडिलांचे दागिने मिळत नाहीत, तोवर मी शांत बसणार नाही."

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)