पाऊस : कोल्हापूर, साताऱ्यात 'रेड अलर्ट' जारी, नद्यांच्या पाणी पातळीत वाढ

    • Author, स्वाती पाटील
    • Role, बीबीसी मराठीसाठी, कोल्हापूरहून

कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात आज 'रेड अलर्ट' घोषित करण्यात आला आहे. कोल्हापूर, सातारा आणि सांगली या जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनानं सतर्कता बाळगली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा नदीची पाणी पातळी 36.9 इतकी आहे, तर कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होऊन ही पाणी पातळी 32 फुटांवर गेली आहे.

राधानगरी, कोयना, वारणा धरणांमधून मोठया प्रमाणात विसर्ग सुरू आहे. राधानगरी धरणाचे 4 दरवाजे सुरू आहेत. यातून होणाऱ्या विसर्गामुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे.

कोयना धरणाचे 6 दरवाजे 10 फुटांवर उघडण्यात आलेत. त्यातून 55 हजार क्युसेक विसर्ग सुरू आहे. अलमट्टी धरणातून 2 लाख 22 हजार क्युसेक विसर्ग सुरू आहे. पण सततच्या पावसामुळे सातारा, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे.

दरम्यान, नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यातील सर्व नद्या नाले दुथडी भरून वाहत आहेत.

राधानगरीचे 4 दरवाजे उघडले

कोल्हापूर जिल्ह्यात चंदगड तालुक्यातही मुसळधार पाऊस सुरू आहे. तिलारीनगर, हेरे, कानुर या भागात रात्री अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातल्या आजरा तालुक्यातील जवळपास चार बंधारे पाण्याखाली गेलेत. साळगाव बंधारा पाण्याखाली गेल्याने सहा गावांचा अंशतः संपर्क तुटला आहे.

बेळगाव वेंगुर्ला राज्यमार्गावर दाटे या गावाजवळ दुसऱ्यांदा पुराचं पाणी आल्याने वाहतूक पूर्णपणे बंद आहे

राधानगरी धरणातून27112 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणाचे 4 स्वयंचलित दरवाजे खुले झाले आहेत. धरणाला एकूण 7 दरवाजे आहेत. सतत पाऊस सुरू असल्याने आणखी दरवाजे उघडण्याची शक्यता आहे.

सांगलीत कृष्णा नदीने 31 फुटाची पाणी पातळी ओलांडली आहे. तर कोयना धरणातून विसर्ग सुरुच असल्याने आज आणखी पाणी पातळी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कृष्णा नदीची इशारा पाणी पातळी 40 फुटांची आहे.

या भागात नदी काठच्या लोकांचं स्थलांतर सुरू करण्यात आलं आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)