उत्तर प्रदेशात 13वर्षीय दलित मुलीवर बलात्कार; ऊसाच्या शेतात सापडला मृतदेह

    • Author, समितात्मज मिश्र
    • Role, बीबीसी हिंदीसाठी

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी इथे 13वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे. कुकर्मानंतर मुलीचा मृतदेह ऊसाच्या शेतात फेकून देण्यात आला. पोलिसांनी याप्रकरणासंदर्भात दोघांना अटक केली आहे.

सदरहू घटना ईसानगर पोलीस ठाणे क्षेत्रातील पकरिया गावातील आहे. दुपारी ही मुलगी शौचाला जाण्यासाठी म्हणून घरातून बाहेर पडली. ती परत आल्याने घरच्यांनी शोधाशोध सुरू केली आणि पोलिसात तक्रार केली.

पोलिसांनी कुटुंबीयांच्या बरोबरीने मुलीचा शोध घ्यायला सुरुवात केली तेव्हा ऊसाच्या शेतात मुलीचा मृतदेह आढळला. पोलिसांनी यासंदर्भात गुन्हा दाखल केला आहे. पकरिया गावातीलच दोघांना अटक करण्यात आली आहे असं लखीमपूर खिरीचे पोलीस अधीक्षक सत्येंद्र कुमार यांनी बीबीसीला सांगितलं.

शवविच्छेदन अहवालानंतर मुलीवर अत्याचार झाल्याचं स्पष्ट झालं असं अधीक्षक सत्येंद्र कुमार यांनी सांगितलं. तिचा मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत मिळाला होता. अत्याचार केल्यानंतर तिला क्रूर पद्धतीने मारण्यात आलं. मुलीच्या डोळ्यांना जखमा दिसत होत्या, गळ्याला ओढणी करकचून बांधलेली होती, दोन्ही पायही बांधलेले होते असं कुटुंबीयांनी सांगितलं.

पोलिसांनी मुलीच्या कुटुंबीयांनी केलेल्या डोळे काढण्यात आल्याच्या किंवा जीभ छाटल्याच्या आरोपांचा इन्कार केला आहे. शवविच्छेदन अहवालात मुलीच्या डोळ्यांना जखम झाल्याचं दिसतं आहे. मात्र जीभ छाटणे किंवा डोळे फोडल्याचा पुरावा मिळालेला नाही असं पोलिसांनी सांगितलं.

सामूहिक बलात्कार आणि हत्येच्या आरोपांखाली दोनजणांना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर एनएसएअंतर्गत कारवाई करण्यात येईल असं अधीक्षकांनी सांगितलं.

या घटनेवरून उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे.

त्यांनी ट्वीट करून म्हटलं आहे की, "उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी मधील एका गावात दलित अल्पवयीन मुलीवर बलात्काराची घटना घडली आहे. अत्याचारानंतर अतिशय निर्घूण पद्धतीने तिची हत्या करण्यात आली आहे.

ही अत्यंत दु:खद आणि लाजिरवाणी घटना आहे. अशा घटनांमुळे समाजवादी पक्ष आणि सध्याचं भाजप सरकार यांच्या प्रशासनात काय फरक राहातो? आझमगढच्या बरोबरीने खिरीतील दोषींवरही कठोर कारवाई व्हावी अशी बहुजन समाजवादी पक्षाची मागणी आहे".

गेल्या आठवड्यात दिल्लीजवळच्या हापुड भागात सहावर्षीय मुलीवर बलात्काराचं प्रकरण समोर आलं होतं. त्याघटनेसंदर्भात पोलिसांनी रविवारी सकाळी एका आरोपीला अटक केली आहे.

दलपत नावाच्या एका आरोपीला घटनास्थळी चौकशी-पडताळणीसाठी नेण्यात आलं. त्याठिकाणी त्याने पोलिसांची बंदूक हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. पळून जाण्याकरता पोलिसांवर गोळीबाराचाही प्रयत्न केला. पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत आरोपी जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)